
Susheela-Sujeet : बाल्कनीमधून ‘सुशीला-सुजीत’ का ओरडत आहेत हे लवकरच कळणार!
स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच ‘सुशीला-सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र झळकणार आहेत…. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रसाद ओक आणि स्वप्नील यांनी चित्रपटाच्या स्पॉट दादाच्या हस्ते लाँच केला…. घराच्या बाल्कनीतून सुशीला आणि सुजित नेमकी का ओरडत आहेत याचा उलगडा १८ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे….

‘सुशीला-सुजीत’ च्या ट्रेलरमध्ये आई पोलिसांकडे जाते आणि आपला मुलगा हरवलाय म्हणून तक्रार करते. पोलिस तिला घरात भांडण वगैरे काही झालं होतं का? म्हणून विचारतात. पार्श्वभूमीवर आवाज येतो की, मुलगा हरवलेल्या गोष्टीला तब्बल ३५ तास उलटून गेलेत. तर, तिकडे स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी एका घरात अडकल्याचे पाहायला मिळते. त्यांचे मोबाईल बाहेर राहिले आहेत. त्यांचे सुटका करून घेण्याचे नाना प्रकार चालू आहेत. लॅच उघडून बाहेर पडायचा, गॅलरीतून काही मार्ग निघतो का पाहायचा प्रयत्न होतो. पण लॅच तुटते, गॅलरीतील कुंडी खाली राहणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडते, अशा अनेक गमतीजमती समोर येतात.
==================
हे देखील वाचा : Prasad Oak : सहाय्यक दिग्दर्शकापासून सुरु झाला होता प्रसाद ओकचा अभिनय प्रवास
==================
एका प्रसंगात बाबाच्या भूमिकेत प्रसाद ओक अवतरतो. “कुठेही जाऊ नका, लवकर परत या…भविष्य बघाते सांगतायत नखाते” असा बाबांचा संवाद ऐकू येतो. त्यातून हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे आणि प्रसाद वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार, हे कळून चुकते. ‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ ने या चित्रपटाची निर्मिती केली असून कथा व दिग्दर्शन प्रसाद ओकचे आहे.