Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकात Dr. Girish Oak आणि Dr. Shweta Pendse पुन्हा एकत्र येणार !
मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेसृष्टीत एक बहुआयामी आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून रत्नाकर मतकरी हे नाव कायमच लक्षात राहिलं आहे. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार आणि निर्माते या विविध भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडत मराठी सृजनविश्वात मोलाचं योगदान दिलं. विशेषत: गूढ साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मतकरी यांच्या कथा फक्त भीतीवर आधारित नसून, त्या मानवी मनोवृत्तींचं नेमकं चित्रण, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणाऱ्या शैलीच्या साहाय्याने अधिक प्रभावी ठरतात. अशाच त्यांच्या साहित्यिक प्रवासाला आणि स्मृतीला कलात्मक श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ घेऊन येत आहे एक खास नाट्य सादरीकरण ‘श्श… घाबरायचं नाही’. या सादरीकरणामध्ये मतकरी लिखित दोन गूढ कथा ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ रंगमंचावर सादर केल्या जाणार आहेत. केवळ वाचनापुरतं न ठेवता अभिनय, प्रकाशयोजना आणि दृश्य प्रभावाच्या माध्यमातून या कथा प्रेक्षकांसाठी थेट अनुभवापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.( Girish Oak & Shweta Pendse Together)

गूढतेचा अनुभव रंगमंचावरही तितकाच प्रभावी ठरावा, यासाठी विशेष प्रकाशयोजना आणि साउंड डिझाईनचा वापर करून एक रहस्यमय वातावरण उभं केलं जात आहे. आवाज, प्रकाश आणि अभिनय यांचा सुरेख मिलाफ या सादरीकरणाला एक अस्वस्थ करणारी आणि लक्ष वेधून घेणारी उंची देतो. या नाट्यसृष्टीचं दिग्दर्शन विजय केंकरे या कसलेल्या दिग्दर्शकांकडून करण्यात येत आहे. केंकरे यांचं दिग्दर्शन हे तांत्रिक सौंदर्य आणि भावनिक खोली यांचा उत्तम समन्वय साधत, प्रेक्षकांना कथेत अधिक खोलवर घेऊन जाण्याची ताकद राखून आहे.

कलाकारांच्या बाबतीतही हा प्रयोग विशेष लक्षवेधी असणार आहे. पुष्कर श्रोत्री अभिनय, आवाज आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात आपली छाप पाडणारा कलाकार. डॉ. श्वेता पेंडसे, ज्यांची अभिनयातील समज आणि आवाजातील सूक्ष्म अभिव्यक्ती विशेष कौतुकास्पद आहे. आणि डॉ. गिरीश ओक, ज्यांचं रंगभूमीवरील अस्तित्व आजही तितकंच भारदस्त आणि प्रभावी आहे. या सादरीकरणाचं एक वेगळंच वैशिष्ट्य म्हणजे, गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे दोन सशक्त कलाकार पुन्हा एकदा एकत्र रंगमंचावर येणार आहेत. त्यांची केमिस्ट्री आणि सादरीकरणातील आत्मीयता, प्रेक्षकांना कथा अनुभवताना अधिक खोलवर घेऊन जाईल, याची खात्री आहे.(Girish Oak & Shweta Pendse Together)
====================================
====================================
‘श्श… घाबरायचं नाही’ हे नाटक म्हणजे मतकरी यांच्या शैलीचा, विचारांचा आणि त्यांच्या लेखनशैलीच्या खोल परिणामांचा एक सृजनशील पुनर्पाठ आहे. जुन्या पिढीसाठी आठवणींचा ठेवा तर नव्या पिढीसाठी त्यांच्या साहित्याशी जोडणारा एक अनोखा पूल ठरणार आहे. या नाटकाचा प्रथम प्रयोग बुधवार, ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता, ओपेरा हाऊस, मुंबई येथे रंगमंचावर सादर होणार आहे.