
Nilu Phule : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट ‘खलनायक’!
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट खलनायक म्हणजे निळू फुले (Nilu Phule)… ज्यांच्या अभिनयाचा खरं तर कुणाशीही सामना होणं शक्य नाही… कुठल्याही एका ठराविक कथेचा पिंजरा कवटाळून न घेता भारदस्त आवाज आणि कौशल अभिनय याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं… अभिनयासोबतच स्वातंत्र्यचळवळीतही सहभाग घेणारे निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे खापर पणतू… त्यामुळे नसानसात देशाप्रती प्रेम ओतप्रोत भरलेल्या निळू फुले यांचं अभिनयावरही तितकंच प्रेम होतं… माळीकाम करणारा एक सामान्य माणूस पुढे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टीतला अजरामर हिरा होईल असं कधीच वाटलं नव्हतं… आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी जाणून घेऊयात निळू फुले यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता…(Marathi Entertainment News)

निळू फुले हे सुरुवातीपासूनच राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतलं होतं. खरं तर, फुले आडनावावरून नेहमीच सगळ्यांना प्रश्न पडायचा की, महात्मा फुलेंचे हे वंशज तर नाहीत ना? तर याच प्रश्नाचं उत्तर खुद्द निळू फुलेंनी एका मुलाखतीत दिलं आहे. फुले यात म्हणाले की, “मी ओढून ताणून नाही..महात्मा फुलेंचा खापर पणतू आहे …डायरेक्ट अगदी . तीन चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो. त्याच्या आधी ही त्यांचं गाव आहे तिथं मंडळी राहत होता, आजही काहीजण आहेत. फुले जेव्हा पुण्यात राहायला आली, तेव्हापासून फुले मंडळी पुण्यात स्थायिक झाली.त्याच्यामधला मी”.

महात्मा फुलेंसोबतच्या नात्यानंतर आता वळूयात निळू फुले यांच्या अभिनयाकडे… निळू फुले यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती… आणि त्याचमुळे वगनाट्यांमधून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती… त्यानंतर नाटक आणि मग चित्रपट असा अभिनयाचा उल्लेखनीय प्रवास त्यांनी केलाच… सखाराम बाईंडर हे त्यांचं गाजलेलं नाटक… खरं तर लोकांचा विरोध या नाटकाला झाला खरा पण निळू फुले यांनी कधीच माघार घेतली नाही… लोकांना अगदी आपल्यातलाच वाटेल असा पुढारी, सरपंच आणि कपटी खलनायक त्यांनी रंगवला… त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका इतक्या खऱ्या होत्या की लोकांना खरंच निळू फुले तसेच आहेत असं वाटायचं; अर्थात हे त्यांच्या अभिनयाचं कौशल्य होतं…
================================
हे देखील वाचा: Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”; निळू फुलेंचा खास किस्सा
=================================
निळू फुले यांनी ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘भुजंग’, ‘माझा पती करोडपती’, ‘हमाल दे धमाल’, ‘सुत्रधार’, ‘कळत-नकळत’, ‘सारांश’, ‘सोंगाड्या’, ‘मा बेटी’ अशा १४० पेक्षा अधिक मराठी-हिंदी चित्रपटांत कामं केली होती…अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी चित्रपटात काम केलं होतं.. तो चित्रपट होता ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांच्याही प्रमुख भूमिका होत्या… हा चित्रपट निळू फुले यांच्या सिनेकारकिर्दितील शेवटचा चित्रपट ठरला… त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाचं निदान झालं आणि त्यानंतर उपचाराअंती १३ जुलै २००९ मध्ये त्यांचं निधन झालं… ४०-५० वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीला बहाल करणाऱ्या निळू फुले यांच्यासारखा नट परत होणे शक्य नाही…(Nilu Phule Movies)