
Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक केतकरनं व्यक्त केली कृतज्ञता !
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार करत मोठं यश मिळवलं आहे. १४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झालेली ही मालिका आज घराघरात पोहोचली असून, रमा आणि अक्षय या जोडीसह संपूर्ण मुकादम कुटुंब प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेलं आहे. या मालिकेत अक्षय मुकादमची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर यासाठी हा एक विशेष टप्पा आहे. मराठी मालिकांमधील त्याच्या आजवरच्या प्रवासात ‘मुरांबा’ ही सर्वात जास्त भागांची मालिका ठरली आहे. या यशाबद्दल शशांकने सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये आपल्या भावना व्यक्त करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.(Muramba Serial)

“प्रत्येक नवीन प्रोजेक्ट सुरू करताना कलाकाराच्या मनात एक अनामिक धाकधूक असते. पण मुरांबा सुरू करताना ती फारशी जाणवली नाही, कारण स्टार प्रवाहसारखी मजबूत साथ, अनुभवी दिग्दर्शक, आणि सशक्त लेखन आमच्या पाठीशी होतं,” अशा भावना शशांकने व्यक्त केल्या आहेत. ‘मुरांबा’ केवळ मालिकाच नव्हे, तर एक कुटुंब बनलं’ असं तो पुढे म्हणतो. “मुकादम कुटुंबात अशा व्यक्तिरेखा होत्या, ज्या हसवतात, रडवतात, विचार करायला भाग पाडतात आणि नात्यांमधली गुंतागुंत सहजतेने सांगतात. प्रत्येक सदस्याने आपलं काम केवळ अभिनय म्हणून केलं नाही, तर त्या पात्रात शिरून ते जगलं. याचं फलित म्हणजे आज मिळालेलं प्रेक्षकांचं उदंड प्रेम.”

शशांक विशेषतः रमा-अक्षय या जोडीसाठी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे. “जिथे जिथे आम्ही गेलो, तिथे प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं. हेच आमचं खरं पारितोषिक आहे. पुरस्कारांपेक्षा ही भावना अधिक मौल्यवान आहे,” असं ही तो सांगतो. आज ११०० भाग पूर्ण झाल्यावरही पहिल्या दिवसाची तीच उत्सुकता, तोच उत्साह शशांकच्या बोलण्यातून जाणवतो. “आज जो आत्मविश्वास आहे, तो प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आहे. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं,” असं म्हणत त्याने प्रेक्षकांचे आणि स्टार प्रवाह वाहिनीचे मन:पूर्वक आभार मानले.(Muramba Serial)
==============================
हे देखील वाचा: Siddharth Jadhav चा पहिला गाजलेला ‘तो’ सिनेमा आता दिसणार छोट्या पडद्यावर !
==============================
आता ‘मुरांबा’ मालिकेच्या पुढच्या पर्वात काय घडणार, याची उत्कंठा वाढली आहे. रमा आणि अक्षयच्या आयुष्यात एक मोठा वळण येणार असून, त्यांच्या नात्याची नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही गोड-तोड मालिका पाहणं अजूनच रोचक होणार आहे.‘मुरांबा’, दररोज दुपारी १.३० वाजता, फक्त स्टार प्रवाहवर पाहता येईल.