Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Sridevi : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार!
रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आणि चार दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मनमोहक अभिनेत्री म्हणजे पद्मश्री श्रीदेवी (Sridevi)… वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या आणि ‘हवा हवाई’ सारख्या गाण्यांपासून ते ‘मॉम’ सारख्या दमदार भूमिकेपर्यंतचा प्रवास करणारी ही ‘चांदनी’ अचानक एक दिवस कायमची निघून गेली. ती बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात श्रीदेवी यांची सिनेकारकीर्द आणि एका कलाकारासाठी त्यांनी केलेल्या उपवासाचा खास किस्सा..(Sridevi)

लहान वयातच प्रेक्षकांनी श्रीदेवी यांच्या डोळ्यांतील भाव, संवादफेक आणि सहज अभिनय पाहून त्यांना डोक्यावर घेतलं होतं. श्रीदेवीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड अशा अनेक South Indian भाषांतील चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आणि त्यांना एक नवी ओळख मिळाली. श्रीदेवींना त्यांच्या दमदार अभिनयामुळे साऊथ चित्रपटसृष्टीत ‘लेडी अमिताभ’ या नावाने ओळख मिळाली. साऊथ इंडस्ट्रीमधील पॉप्युलर अभिनेते रजनीकांत ज्यांनी तामिळ सिनेमासह हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांतही आपली छाप पाडली आहे. त्याकाळात रजनीकांत आणि श्रीदेवी यांनी मिळून २५ पेक्षा जास्त चित्रपट केले, आणि त्यांची जोडी चाहत्यांच्या हृदयात कायमची घर करून बसली.

एकदा २०११ मध्ये शुटिंगदरम्यान रजनीकांत यांची तब्येत अचानक खालावली. परिस्थिती इतकी गंभीर होती की त्यांना उपचारासाठी सिंगापूरला हलवण्यात आलं. ही बातमी ऐकताच श्रीदेवी खूप अस्वस्थ झाल्या. त्यांनी रजनीकांत यांच्या आरोग्यासाठी आठवडाभराचा उपवास ठेवला ! इतकंच नाही, तर त्या थेट शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला गेल्या आणि त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली.काही दिवसांनी रजनीकांत बरे होऊन परत आले, तेव्हा श्रीदेवी आणि बोनी कपूर स्वतः त्यांच्या घरी भेटायला गेले.

आता पुन्हा वळूयात त्यांच्या चित्रपटांकडे… तर, १९७९ साली ‘सोलवा सावन’ या चित्रपटातून श्रीदेवींनी हिंदी चित्रपटसृष्टीक पदार्पण केलं, पण त्यांना खरा ब्रेक मिळाला तो १९८३ च्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून. जितेंद्र यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि नंतर श्रीदेवी म्हणजे सुपरहिट चित्रपट हे समीकरण पक्कं झालं… ‘नगीना’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘खुदा गवाह’, ‘जुदाई’ हे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील माईलस्टोन ठरले. प्रत्येक चित्रपटात श्रीदेवींनी वेगवेगळ्या भूमिकांमधून रोमँटिक हिरोईनपासून ते धाडसी आणि सशक्त स्त्रीपर्यंत अशा भूमिका चोखपणे साकारल्या.

श्रीदेवी अभिनय करताना फक्त संवाद बोलत नसे, तर प्रत्येक दृश्य अनुभवत होत्या. कमर्शियल चित्रपटात झळकतानाच श्रीदेवींनी अर्थपूर्ण भूमिकाही मोठ्या ताकदीने साकारल्या. ‘सदमा’ या चित्रपटात स्मृतिभ्रंश झालेल्या मुलीची त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहे. त्यानंतर आलेल्या ‘चालबाज’ मध्ये दुहेरी भूमिका, मिस्टर इंडियामधील तिचं ‘हवा हवाई’ गाणं, चांदनीमधील तिची मोहक नृत्यशैली आणि लम्हेमध्ये एका मोठ्या वयाच्या पुरुषावर प्रेम करणारी मुलगी या सगळ्या विविध भूमिका त्यांनी तितक्याच समर्पकतेने वठवल्या आणि या सगळ्यामुळे त्यांना ‘परफेक्ट पॅकेज’ अशी ओळख दिली.
================================
हे देखील वाचा : Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
=================================
श्रीदेवी यांनी ‘रूप की रानी, चोरों का राजा’ या चित्रपटासाठी १ कोटी मानधन आकारले. कोटींच्या घरात मानधन घेणाऱ्या त्या भारतातील पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या. शाहरुख, सलमान, आमिर आणि इतर सुपरस्टार्सपेक्षा देखील अधिक पैसे आकारणाऱ्या त्या अभिनेत्री होत्या. ९०च्या दशकात इतर मुख्य पुरुष कलाकारांना ५०-७५ लाखांपर्यंत मानधन मिळत होतं. परंतु श्रीदेवींच्या स्टारडम आणि प्रभावामुळे निर्मात्यांमध्ये त्यांची मागणी वाढली. ‘चिरंजीवी’ नंतर श्रीदेवी या एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांनी १ कोटी मानधनाचे आर्थिक यश मिळवले. श्रीदेवीचं आयुष्य जितकं पडद्यावर यशस्वी होतं, तितकंच पडद्यामागे अनेक चढउतारांनी भरलेलं होतं.

बोनी कपूर यांच्याशी लग्न आणि त्यानंतर त्यांचं चित्रपटसृष्टीपासून काही काळ लांब जाणं, हे तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं. पण एक पत्नी, आई आणि अभिनेत्री या सगळ्या भूमिका त्यांनी संपूर्ण समर्पणाने पार पाडल्या. २००४ मध्ये त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं, पण २०१२ मध्ये आलेल्या ‘English Vinglish’ मुळे श्रीदेवींचं कमबॅक अधिकच दमदार ठरलं. श्रीदेवी यांना जिवंतपणी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता; मात्र ‘मॉम’ चित्रपटासाठी मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय श्रीदेवींना चित्रकलेची खूप आवड होती आणि त्यांच्या काही पेंटिंग्ज आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात विकल्या गेल्या होत्या. तमाम प्रेक्षकांच्या मनावर नृत्य आणि अभिनय कौशल्याने अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवी यांच्या कारिकिर्दीला कलाकृती मीडिया कडून सलाम!
-साक्षी पोंक्षे