
“वरण-भात म्हणजे गरीबांचं जेवण”; Vivek Agnihotriच्या विधानावर मराठी कलाकारांचा संताप
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द वॅक्सिन वॉर’ असे जळजळीत विषय आपल्या चित्रपटांमधून मांडणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सध्या मराठी जेवणावर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे… मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही अग्निहोत्रींची बायको… नुकत्याच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चक्क विवेक अग्नीहोत्री मराठी जेवणाला गरीबांचं जेवण समजतात असा खुलासा स्वत: पल्लवी जोशींनी केला होता… एकीकडे या जोडीचा ‘द बंगाल फाईल्स’ (The Bengal Files) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अकडला आहेच आणि आता विवेक अग्निहोत्रींच्या या विधानामुळे वातावरण अधिक तापलं आहे… नेमकं विवेक काय म्हणाले आणि त्यांना मराठी कलाकारांनी काय खडे बोल सुनावले आहेत जाणून घेऊयात…(Bollywood News)

तर, ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी जोशींना असं विचारण्यात आलं की लग्नानंतर घरी मराठी पद्धतीचं जेवण बनू लागल्यावर विवेक यांची रिएक्शन काय होती? त्यावर पल्लवी म्हणाल्या की, “विवेकना मराठी जेवण आवडायचं नाही… ते नेहमी असं म्हणायचे की काय हे गरीबांचं जेवण बनवलंय…”. पल्लवींच्या या वाक्याला जोड देत विवेक असं म्हणाले, “मी दिल्लीचा असल्यानं कबाब, मटण, चिकण, असं तेलाचा थर असलेलं जेवणं करायची सवय. आता वरण भात त्यांच्या वरणात मीठ देखील नसते. यांची कढीपण एकदम साधी. कढी म्हटलं की माझ्या डोळ्यावर तेलाचा थर तरंगतोय लाल मिरची असं दिसतं पण यांची कढी पण एकदम साधी. हे फुड कल्चर पाहून खरं तर मला धक्काच बसलेला. हे लोक शेतकऱ्यासारखे गरिब जेवण जेवतात, कोणाशी लग्न केलंय मी, असा विचार केला”. (Vivek Gnihotri News)

आता विवेक अग्निहोत्री यांनी थेट शेतकऱ्यांचा आणि मराठी जेवणाचा केलेला अपमान मराठी कलाकारांना सहन झाला नाही आहे.. शिवाय, आपल्या मराठी जेवणाला आणि शेतकऱ्यांना नावं ठेवणाऱ्या विवेक यांच्या या विधानांवर पल्लवी जोशी हसतायत हे पाहून तर लोकांचं टाळकं अधिकच फिरलंय… त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री नेहा शितोळे हिने सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट करत अग्नीहोत्रींचा चांगलाच समाचार घेतला आहे.. नेहा तिच्या पोस्टमध्ये म्हाणालीये की, “मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृती विषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस… पुढे अजुन एका रील मधे हा म्हणतोय की मी सात्विक अन्न खातो… (Plant based food) (ह्याला सावजी खायला घाला आणि तांबडा पांढरा रस्सा पाजा एकदा), आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगतेय?”. पुढे नेहा असंही म्हणालीये की, “हा माणूस काश्मीरचं सत्य आपल्या समोर आणतो आहे म्हणून आपण ह्याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या मनात मुळात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार आपल्याला??? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी ह्याचे सिनेमे Boycott करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना “धडा शिकवण्याचा” आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार “वरण भाताची” किंमत आणि महत्त्व???”.

तर, अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग (Pushkar Jog) याने “महाराष्ट्रात येऊन पैसा कमावतात पण मराठीचा मान राखला जात नाही”, अशा शब्दांत अग्नीहोत्रींवर टीका केलीये… आणि शेवटी तो असंही म्हणालाय की, ‘एवढी गरिबी आहे म्हणूनच अख्ख्या देशाचा भार मुंबई आणि महाराष्ट्राने उचललाय… असो… .’ या दोघांनंतर दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही आपली नाराजी व्यक्त केलीये.. त्यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, “कुठं गेला विवेक? ‘कश्मीर फाईल’ सिनेमाचे मोफत शो आयोजित करून विवेक अग्निहोत्री याला आर्थिक हातभार लावणारे मराठी नेते, त्याच अग्निहोत्रीने ‘मराठी जेवण हे गरिबांचे जेवण ‘ असा उल्लेख केल्यावर त्या अग्निहोत्रीच्या कानाखाली ‘अग्नि’ काढणार की तिथे नवरा मराठीची इज्जत काढत असताना शेजारी दात विचकत बसलेल्या पल्लवी जोशीचा साडी चोळी असा ‘माहेरचा आहेर’ देऊन सत्कार करणार”.
================================
हे देखील वाचा : Stree to Thama : बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स!
=================================
आता विवेक अग्निहोत्री मराठी माणसांची माफी मागणार का? शिवाय पल्लवी जोशी या संपूर्ण प्रकरणावर काही स्पष्टीकरण देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Latest Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi