
Bin Lagnachi Goshta Trailer: नात्यांचा गोडवा आणि प्रेमाच्या रंगाने रंगलेल्या बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
नात्यांचा गोडवा, प्रेमाचा रंग, थोडीशी नोकझोक आणि त्यातून उमलणारा भावनिक प्रवास… अशी सुंदर कहाणी घेऊन ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने चाहत्यांच्या उत्कंठेला नवा उधाण दिलं आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे रिअल लाइफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा रील लाइफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री यापूर्वीही प्रेक्षकांना भावली होती आणि त्यामुळेच या सिनेमाकडे अपेक्षेने पाहिलं जात आहे.(Bin Lagnachi Goshta Trailer)

ट्रेलरमध्ये कथा प्रिया, उमेश, गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या भोवती फिरताना दिसते. प्रिया प्रेग्नन्ट आहे, छोट्या छोट्या गोष्टींवरून उमेशसोबत तिची नोकझोक सुरू असते आणि त्यातच घरात गिरीश ओक व निवेदिता सराफ यांच्या पात्रांचा प्रवेश होतो. त्यांच्या अटी-शर्ती, प्रिया-उमेशमधील दुरावा आणि या चौघांच्या आयुष्यात उलगडणाऱ्या घटना प्रेक्षकांना हसवत, विचार करायला लावणाऱ्या ठरणार आहेत. ट्रेलरमध्ये निवेदिता सराफ यांच्या व्यक्तिरेखेच्या भूतकाळाची चाहूल दिली आहे, तर गिरीश-निवेदिताची अनोखी केमिस्ट्री आणि प्रिया-उमेशचा गोड संसार प्रेक्षकांना भरपूर रंगतदार क्षण देणार हेही स्पष्ट होतं.

दिग्दर्शक आदित्य इंगळे सांगतात, “एकदा प्रिया-उमेशच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या वागण्यातली सहजता आणि नैसर्गिक संवाद पाहून ही कथा त्यांच्या शिवाय कुणी करूच शकत नाही, असं वाटलं. त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यातून हा सिनेमा आकाराला आला. निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जोडी प्रेक्षकांना आधीपासूनच आवडते. त्यामुळे ही चौकडी परफेक्ट ठरली. या कथेत प्रेक्षकांना नात्यांची वास्तवता, विश्वास आणि जिव्हाळ्याचा गाभा अनुभवायला मिळणार आहे.” निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही तर आजच्या नात्यांच्या बदलत्या व्याख्येवरही भाष्य करणारा आहे. आधुनिक पिढीचं जगणं, नात्यांमधले संघर्ष, त्यातील गोड-तिखट अनुभव आणि एकमेकांवरील विश्वासाचा पाया हे सर्व यात मांडलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना हसवेल, विचार करायला लावेल आणि नात्यांची सुंदरता नव्या नजरेतून दाखवेल.”(Bin Lagnachi Goshta Trailer)
================================
================================
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. समीर कुलकर्णी यांच्या कथेला आदित्य इंगळे यांनी दिग्दर्शन दिलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट नात्यांची नवी सफर ठरेल, यात शंका नाही.