
Nashibvan Marathi Serial: नशिबवान मालिकेत अभिनेत्री सोनाली खरे झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !
Star Pravah वर नवनव्या मालिकांचा ओघ सातत्याने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकतेय. त्यात आता आणखी दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नशिबवान आणि लपंडाव. या दोन्ही मालिकांच्या प्रोमोने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे, नशिबवान मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. (Actress Sonali Khare)

सोनाली खरे यांना मालिकेत झळकत पाहण्यासाठी प्रेक्षक सदैव उत्सुक असतात. त्यांचं करिअर मालिकांपासूनच सुरू झालं होतं. स्टार प्रवाहवरील बे दुणे दहा मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी चित्रपट, वेबसीरिज, निर्मिती संस्था अशा विविध क्षेत्रांत काम केलं आणि मालिकांपासून थोडं दूर राहिल्या. जवळपास दहा वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा मालिकेत झळकणार आहेत आणि यावेळी त्यांच्या भूमिकेत एक मोठा ट्विस्ट आहे.

नशिबवान मालिकेत सोनाली खरे प्रथमच खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. उर्वशी हे त्यांच्या पात्राचं नाव असून, दिसायला अतिशय सुंदर पण मनाने प्रचंड स्वार्थी अशी ती व्यक्तिरेखा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी ती कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे मालिकेत तणाव, कटकारस्थानं आणि नाट्यमय वळणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या नव्या प्रवासाबद्दल बोलताना सोनाली खरे म्हणाल्या, “स्टार प्रवाह परिवारात पुन्हा एकदा सामील होताना मला खूप आनंद होत आहे. मालिकेत काम करण्याची इच्छा होतीच, पण नशिबवानचा विषय आणि उर्वशी ही व्यक्तिरेखा मला खूप भावली. माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असलेलं हे पात्र साकारणं ही माझ्यासाठी मोठी उत्सुकतेची आणि आव्हानात्मक गोष्ट आहे.”(Actress Sonali Khare)
==================================
हे देखील वाचा: ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून…
==================================
नशिबवान मालिकेचं निर्मिती काम कोठारे व्हिजन्स या नामांकित निर्मिती संस्थेकडे आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात मालिकेचा शुभारंभ होणार असल्याने तो सोनाली खरे आणि त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे. तर, प्रेक्षकांना सोनाली खरे यांच्या नव्या आणि वेगळ्या अवतारातली झलक नशिबवान मालिकेतून १५ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.