
Devmanus 3: देवमाणसाचा खेळ खल्लास करायला येतोय इन्स्पेक्टर मार्तंड जामकर !
‘देवमाणूस’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरली. खोट्या डॉक्टर अजित कुमार देवच्या गुन्ह्यांवर आधारित ही कथा पहिल्या भागापासूनच लोकप्रिय झाली होती. दुसऱ्या सीझनमध्ये मालिकेने अधिक रंग पकडला आणि त्यात इन्स्पेक्टर मार्तंड जामकर या पात्राची एन्ट्री प्रेक्षकांना फारच भावली होती. अभिनेता मिलिंद शिंदे (Actor Milind Shinde) यांनी साकारलेलं हे पात्र म्हणजे मालिकेचं एक ‘टर्निंग पॉईंट’ ठरलं होतं. आता मालिकेच्या तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा जामकरची एन्ट्री झाली आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला असून त्यात थेट जाहीर करण्यात आलंय की “देवमाणसाचा खेळ खल्लास करायला इन्स्पेक्टर जामकर परत आलाय”. या एका वाक्यानं प्रेक्षकांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे.(Devmanus 3 )

पहिल्या भागात दिव्या सिंग या महिला इन्स्पेक्टरनं केस हाती घेतला होता, पण खोट्या डॉक्टरनं तिलाच आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये जामकरची दमदार एन्ट्री झाली होती. त्याने डॉक्टरविरोधात पुरावे गोळा केले, त्याला अटकही केली, पण शेवटी डॉक्टर सुटून गेला. याच कारणामुळे आता प्रेक्षक विचार करतायत की, तिसऱ्या सीझनमध्ये अखेर डॉक्टरच्या गुन्ह्यांचा शेवट होणार का?

सध्या सोशल मीडियावरही या एन्ट्रीवर चर्चा रंगल्या आहेत. “जामकर परत आलाय म्हणजे आता खरी मजा येणार”, “डॉक्टरचा खेळ खल्लास होणारच” अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून दिल्या जात आहेत. खरं तर, तिसरा सीझन सुरू झाल्यापासून मालिकेबद्दल थोडी नाराजी व्यक्त होत होती. पण आता जामकर परतल्याने कथानकात नवीन ट्विस्ट येणार, अशी मोठी अपेक्षा आहे.(Devmanus 3)
==============================
==============================
मार्तंड जामकर हे पात्र केवळ एक पोलीस अधिकारी नाही, तर तो प्रेक्षकांसाठी न्यायाची आशा आहे. त्यामुळे त्याच्या एन्ट्रीनं मालिकेचं कथानक अधिक थरारक होणार यात शंका नाही. आता पुढच्या भागांत नेमकं काय घडणार आणि अखेर डॉक्टरच्या गुन्ह्यांना पूर्णविराम मिळणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.