Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

“इस बिल्डिंग में एक ही मर्द है और वो है Smita Talwalkar!”; कुख्यात गुंडही नमला होता….
वृत्तनिवेदिका म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर (Smita Talwalkar) यांनी आपलं करिअर सुरु केलं होतं… पुढे मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शनाने त्यांनी स्वत:चं विश्व तयार केलं… आजवर २५ पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती करणाऱ्या स्मिता यांच्यापुढे एक गुंड देखील झुकला होता… आणि त्याने स्मिताताईंचं कौतुकही केलं होतं.. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात…
आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या स्मिता तळवलकर यांनी सक्षम महिलांचं प्रतिनिधत्व करत समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची नजर बदलली. स्त्री कशी खंबीर वागू शकते हे त्यांनी त्यांच्या भूमिकांमधून दाखवून दिलं… स्मिता तळवलकर यांनी ‘चौकट राजा’, ‘सवत माझी लाडकी’, ‘कळत नकळत’, ‘तू तिथे मी’ असे दर्जेदार चित्रपट दिले… त्या खऱ्या आयुष्यातही त्या कणखर आणि धाडसी होत्या. ‘चौकट राजा’ चित्रपटाच्या वेळी तर त्या थेट कुख्यात गुंडांशी भिडल्या होत्या.

‘चौकट राजा’ चित्रपटात स्मिता यांच्यासोबत दिलीप प्रभावळकर, दिलीप कुलकर्णी, अशोक सराफ, सुलभा देशपांडे, नयना आपटे अशा दमदार कलाकारांची फौज होती. त्याकाळी मराठी चित्रपटांना फार थिएटर मिळत नव्हतं… ‘चौकट राजा’ याची निर्मिती स्मिता यांनी केली होती आणि तेव्हा त्यांना प्रदर्शनासाठी दादरमधलं ‘प्लाझा’ हे एकच थिएटर आणि तिथला मॅटिनी शो मिळाला होता. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी स्मिता त्यांच्या ऑफिसला पोहोचल्या तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये चित्रपटाचं पोस्टर लावणारी तरुण मुलं जखमी अवस्थेत त्यांची वाट बघत थांबली होती.
स्मिता यांनी पाहिलं की, त्या मुलांच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. रात्री पोस्टर लावायला गेल्यावर एका व्हॅनमधून काही माणसं हत्यारं घेऊन आली आणि त्यांनी आपल्याला मारहाण केली असं मुलांनी स्मिता यांना सांगितलं. त्या भागात पोस्टर लावण्याच्या बाबतीत एका विशिष्ट माणसाची वट होती आणि आपल्याला ते काम दिलं गेलं नाही म्हणून स्मिता यांच्यासाठी काम करणाऱ्या मुलांना त्यांनी मारहाण केली होती. हे ऐकताच स्मिता यांनी थेट त्या माणसाला फोन लावला.

स्मिता यांनी फोन केल्यावर त्या माणसाने अर्वाच् भाषेत त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे स्मिता संतापल्या आणि त्यांनी मुलांना घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं. स्मिता यांनी पोलिसांना त्या माणसाविरोधात तक्रार लिहून घ्यायला सांगताच पोलिसही घाबरले.. आधी पोलिसांनीही स्मिता यांची समजूत घालायचा प्रयत्न केला पण त्या मागे हटल्या नाहीत. पोलिसांशी बोलून आल्यावर काहीच तासांत त्या माणसानं स्मिताताईंना फोन करत गोड बोलायला सुरुवात केली… इतकंच नाही स्वतःहून पोस्टर लावून देतो असंही सांगितलं.
स्मिता यांना प्रश्न पडला की त्या माणसाच्या बोलण्यात असा बदल अचानक कसा झाला?. पण त्यांनीही प्रकरण फार न खेचता त्याला परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी घरच्यांकडून स्मिताताईंना आपण ज्याच्याविरोधात पंगा घेतला, तो माणूस कुप्रसिद्ध गुंड असून त्याचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कळलं आणि त्या दचकल्या. स्मिता यांना याबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. त्यांच्या या वागण्याचा परिणाम उलटही होऊ शकला असता. पण त्या माणसाने स्मिता यांच्यापुढे नमतं घेतलं होतं.
====================================
====================================
पुढे, स्मिता यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी तो आपणहून त्यांना फोन करून पोस्टर लावून द्यायचा आणि पैसेही मागायचा नाही. स्मिता या त्याला कधीही भेटल्या नाहीत पण त्याने सगळ्यांसमोर त्यांचं कौतुक करत म्हटलं होतं, ‘इस नाझ बिल्डींगमें चारसौ डिस्ट्रीब्युटर्स के ऑफिसेस है, लेकिन मर्द सिर्फ स्मिताताई है!’ स्मिता यांचा ‘चौकट राजा’ उत्कृष्ट चित्रपट म्हणून नावाजला गेला खरा मात्र तो बॉक्स ऑफिस कलेक्शन करू शकला नाही. त्यामुळे स्मिता यांना खूप मोठा फटका बसला. त्यानंतर लगेचच ‘सवत माझी लाडकी’ सिनेमा आला आणि त्याच्या यशानं आधीचं नुकसान भरून निघालं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi