
Majhi Tujhi Reshimgath मालिकेचा सिक्वेल येणार? श्रेयस,प्रार्थनाच्या ‘या’ व्हिडिओने चर्चांना उधाण
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही खास स्थान राखून आहे. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी घराघरात लोकप्रियता मिळवली होती. दिग्दर्शक अजय मयेकर यांच्या दिग्दर्शनाखाली ही मालिका ऑगस्ट 2021 ते जानेवारी 2023 या काळात प्रसारित झाली आणि अल्पावधीतच मराठी मालिकांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचली. या मालिकेची लोकप्रियता एवढी होती की, मालिकेच्या बंद होण्याच्या बातमीनेच प्रेक्षकांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली होती. प्रेक्षकांच्या मागणीमुळेच निर्मात्यांना ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. विशेष म्हणजे, श्रेयस आणि प्रार्थना या जोडीने अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. आजतागायतही ही जोडी प्रेक्षकांची ‘फेव्हरेट ऑनस्क्रीन कपल’ आहे.(Majhi Tujhi Reshimgath Serial)

अशा या हिट जोडीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अजय मयेकर हे तिघे मुंबईतील एका श्री स्वामी समर्थ मठातून एकत्र बाहेर पडताना दिसले. त्यावेळी श्रेयसच्या हातात एक कागदांचा गठ्ठा असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. हा गठ्ठा त्यांच्या आगामी प्रोजेक्टची स्क्रिप्ट असावी, अशी चर्चा चाहत्यांमध्ये जोरात सुरू आहे. या वेळी काही इतर मंडळी देखील उपस्थित होती आणि सर्वांनी पापाराझींसमोर आनंदाने पोज दिल्या. यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. हे तिघेजण पुन्हा एखाद्या नव्या मालिकेसाठी एकत्र येत आहेत का? ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा रिमेक तयार होतोय का? किंवा पूर्णपणे वेगळ्या संकल्पनेवर आधारित नवा प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत का? अद्याप या तिघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण चर्चांना उधाण आलं आहे हे मात्र नक्की.

दरम्यान, ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये श्रेयस, प्रार्थना आणि मायरा यांच्यासह संकर्षण कऱ्हाडे, काजल काटे, मोहन जोशी, शीतल क्षीरसागर, अतुल महाजन, स्वाती देवल अशी दमदार स्टारकास्ट होती. आता या जुन्या कलाकारांसह नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, किंवा पूर्णपणे नवी स्टारकास्ट घेऊन श्रेयस–प्रार्थना जोडी पुन्हा जादू निर्माण करणार का, हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचं ठरेल.(Majhi Tujhi Reshimgath Serial)
============================
हे देखील वाचा: ‘या’ मालिकेतील कलाकारांनी एका सीनसाठी केले तब्बल २४ तास नॉनस्टॉप शूटिंग !
============================
एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, श्रेयस, प्रार्थना आणि अजय मयेकर हे तिघे पुन्हा एकत्र आल्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रचंड उत्स्फूर्त असेल. चाहत्यांना आजही ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची गोडी लागलेली आहे आणि त्यांना आपल्या लाडक्या जोडीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.