Dilip Prabhavalkar : ८१व्या वर्षी प्रभावळकरांचा ‘दशावतार’, बॉडी डबल न

Movie Review : ‘आर पार’ गोंधळलेल्या प्रेमाची गुंतवून ठेवणारी लव्हस्टोरी
कॉलेजमधला एक चार्मिंग श्रीमंत मुलगा अमर रणदिवे (ललित प्रभाकर) प्राची (हृता दुर्गुळे) नावाच्या गोड पण गोंधळलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. दोघांच्या मधोमध वैचारिक आणि भावनिक दरीसुद्धा असते. पण तरीही दोघांची परफेक्ट लव्हस्टोरी सुरु असताना अचानक एक भलता माणूस त्यांच्यामध्ये येतो आणि इथे सुरु होता अमर आणि प्राचीच्या प्रेमाचा खेळखंडोबा ! सध्याची प्रेमाची व्याख्या थोडीशी बदललेली आहे. ब्रेक-अप, पॅच अप, ब्रेक-अपच्या विळख्याभोवती फिरत असलेल्या आयुष्यात हे कपल कशाप्रकारे गुंतून, गुंफून जातात, याचीच ही स्ट्रेट पण कन्फ्युजिंग प्रेमाची स्टोरी दिग्दर्शक गौरव पतकी यांनी चितारली आहे. प्रेमाचा अतिरेक झाला की तो कोणत्या टोकाला जातो पण त्यातून सगळं स्टेबल व्हायला मार्ग कसा काढतो, हेच दिग्दर्शकांनी ‘आर-पार’ आणि उत्तमरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रेमातला वेडेपणा, भांडणं, बिघडणं, सावरणं सगळ्या फेजेस तुम्हाला या चित्रपटात पहायला मिळतील. कधी कधी प्रेमात असताना आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातंय की काय, असाही प्रसंग येतो. त्यानंतर आपल्याकडून अनवधानाने काहीतरी असं घडतं, ज्यामुळे दुरावा निर्माण होतो. याच दुराव्यापासून जवळ आलेल्या अमर आणि प्राचीची ही प्रेमकथा आहे. अभिनेता ललित प्रभाकरने मालिका विश्वापासूनच मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. अमरच्या आत असलेली अस्वस्थता त्याच्या प्रत्येक एक्सप्रेशनमध्ये दिसून आली आहे. सोबतच हृता दुर्गुळे हीसुद्धा मराठी मालिका आणि सिनेमातली नामांकित अभिनेत्री…प्राची प्रेमात थोडीशी कन्फ्युज पण तरीही अमरवर वेड्यासारखी जीव लावणारी आहे. दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर योग्यरित्या जुळून आली आहे. दोघांच्या संवादांमध्येही ते जाणवतं. विशेषकरून एका सीनमध्ये अमर प्राचीवर प्रचंड ओरडतो, तेव्हा त्याच्या आत असलेलं फ्रस्ट्रेशन दिसून येतं, जे ललितने उत्कृष्टपणे साकारलं आहे.

फर्स्ट हाफ थोडासा संथ गतीने जातो. इथे तुम्हाला दोघांचं लव्ह बॉंडिंग आणि कन्फ्लिक्ट पहायला मिळतात. पण सेकंड हाफमध्ये बरेच ट्वीस्ट आहेत. या ट्वीस्टससोबत अमर आणि प्राचीच्या प्रेमाची गाडी कशी पुढे जाते, हे दाखवलं आहे. इतर कास्टबद्दल बोलायचं झालं तर सुहिता थत्ते, विना नायर, स्नेहलता वसईकर, माधव अभ्यंकर यांनीही चित्रपटात उत्तम काम केलं आहे. म्युझिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाणी कास्टच्या अभिनयाप्रमाणे छाप पाडू शकली नाहीत. म्युझिक थोडंस रटाळ वाटतं. एखादं विरह गीत चित्रपटात दाखवण्याची आवश्यकता होती. पण तरीही आर-पार टायटल ट्रॅक तुम्हाला बांधून ठेऊ शकतं. दिग्दर्शक गौरव पतकी यांनी आजच्या जनरेशनला कनेक्ट होण्याच्या दृष्टीकोनातून ही प्रेमकथा मांडली आहे. आजच्या युगातील प्रेमी युगुलांमध्ये कशाप्रकारे भावनिक अडथळे येतात, त्यांची वैचारिक पातळी कशी असते, ते कशाप्रकारे भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करतात याचं वास्तववादी चित्रण गौरव यांनी केलेलं आहे.
मराठीत यापूर्वीही उत्तम रोमँटिक चित्रपट आलेले आहेत. त्यात ‘आर-पार’च्या ड्रामाचीही आता भर पडली आहे. एकंदरीत आरपार हा भावनांचा कल्लोळ आहे. कदाचित प्रेमामध्ये नापास झालेल्यांना याची झळ पोहोचू शकते. हृता आणि ललित या जोडीचा हा पहिलाच चित्रपट आणि विशेष म्हणजे दोघांच्याही वाढदिवशी १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा रोमँटिक फॅमिली ड्रामा तुम्ही थिएटरमध्ये नक्कीच बघा. कलाकृती मीडिया ‘आर-पार’ला देत आहे ५ पैकी ३.५ स्टार्स !
====================================
हे देखील वाचा : Bobby Deol ‘या’ अभिनेत्रीच्या होता प्रेमात; ५ वर्षांचं रिलेशनशिप, लग्नही ठरलेलं पण…
====================================
चित्रपट : आरपार
लेखन-दिग्दर्शक – गौरव पतकी
कलाकार – ललित प्रभाकर, ऋता दुर्गुळे, सुहिता थत्ते, स्नेहलता वसईकर, माधव अभ्यंकर, वीणा नायर, जान्हवी सावंत
संगीत – गुलराज सिंग
निर्मिती – ललित प्रभाकर, नामदेव काटकर, रितेश चौधरी
सिनेमॅटोग्राफर – राहुल चौहान
एडिटर – फैसल महाडिक
वेशभूषा – स्नेहा निकम
–सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi