
स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट; भावनिक पोस्ट करत दिली माहिती
मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री कुंजिका काळंविट लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर ती आई होणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. हिरव्या साडीतील तिचा पारंपरिक लुक, फुलांचे दागिने आणि सुंदर हसरा चेहरा यामुळे तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. आता मातृत्वाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना तिनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Actress Kunjika Kalwint)

कुंजिकाने तिच्या अभिनय करिअरला काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. ती सध्या ‘शुभविवाह‘ या मालिकेत ‘पौर्णिमा पटवर्धन’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. गेली सुमारे अडीच ते तीन वर्षे ती या मालिकेचा अविभाज्य भाग राहिली आहे. मात्र आता या प्रवासाला थोडा विराम देत ती मालिकेतून बाहेर पडत आहे. तिनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या निर्णयाची माहिती दिली. पोस्टमध्ये ती म्हणते, “गेल्या तीन वर्षांपासून पौर्णिमा, पुन्नो हे नाव माझ्या दैनंदिन जीवनाचा एक भाग राहिलं. हे पात्र केवळ एक भूमिका नव्हती, तर माझी नवी ओळख होती. आज पुन्नो म्हणून माझा शेवटचा भाग आहे. जरी तो कडू-गोड असला तरी, हा शेवट नाही, फक्त एक सुंदर विराम आहे. तारे पुन्हा जुळतील तेंव्हा नवीन अध्याय सुरू होईल.”

या पोस्टमधून तिनं मालिकेतील सहकलाकार, टीम आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मातृत्वाचा प्रवास सुरू करताना अभिनयापासून काही काळ लांब जाणं हा तिचा वैयक्तिक आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचं स्पष्ट दिसतं. (Actress Kunjika Kalwint)
================================
हे देखील वाचा: Last Stop Khanda: ‘शालू झोका दे गो मैना’, Prabhakar More यांची शालू आहे तरी कोण?
================================
कुंजिकाचं हे नवं जीवनपर्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार असल्याने तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तिच्या पुढील आयुष्यासाठी सर्वजण प्रेमाने आणि आशिर्वादाने साथ देत आहेत.