
Smita Shewale साकारणार ‘अभंग तुकाराम’मध्ये तुकारामांची आवली!
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग मेकर्सकडून केले जात आहेत. अशात आता लवकरच योगेश सोमण आणि स्मिता शेवाळे यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या या चित्रपटात स्मिता शेवाळे एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र वारंवार रंगमंचावर आणि पडद्यावर साकारले गेले आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा ‘आवली’ प्रेक्षकांसमोर फारशी उलगडली नाही. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात प्रथमच आवलीचे वास्तवाशी घट्ट जोडलेले चित्रण पाहायला मिळणार आहे. ही भूमिका स्मिता शेवाळे साकारणार आहे.

तुकारामांच्या संतत्वाला समाजमान्यता मिळाली, त्यांचे अभंग वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग झाले, यात आवलीच्या त्यागाचे मोलाचे योगदान आहे. संसाराचा गाडा हसत-रडत ओढताना तिने दाखविलेली चिकाटी आणि त्याचवेळी पतीच्या साधनेला दिलेली साथ, हे त्यांच्या नात्यातील गूढ आणि गहिरेपण प्रकट करते.

या चित्रपटात स्मिता शेवाळेने साकारलेली आवली ही आजवर कधीही पडद्यावर दिसलेली नाही. तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना एका ताकदीच्या, संघर्षशील आणि कोमल स्त्रीचे दर्शन होणार आहे. तिची संवादशैली आणि देहबोली आवलीच्या व्यक्तिरेखेला सत्यतेचा आणि अध्यात्मिकतेचा स्पर्श देतात. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘अभंग तुकाराम’ मधून वारकरी परंपरेतील एका दुर्लक्षित स्त्रीपात्राला नव्या दृष्टीने मांडणार आहेत. त्यांच्या दृष्टीने आवली ही फक्त घर सांभाळणारी स्त्री नसून, पतीच्या अध्यात्माला आधार देणारे आणि त्याला वास्तवाचे भान देणारे प्रपंचातील अध्यात्मिक पात्र आहे.
================================
हे देखील वाचा : ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman
=================================
‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.