‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ – डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट; पण तरीही…
“हमारी सोसायटी में हम घाटी लोगो को नहीं रखते…”; जो हे वाक्य म्हणतो, त्याच्या खाडकन् कानाखाली पडते… आणि कानाखाली लगावणारे असतात छत्रपती शिवाजी महाराज! हो आपण आज महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल बोलतोय. पहिलं तर शिवराय आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशा महाराष्ट्रातल्या दोन संवेदनशील विषयांवर चित्रपट बनवण्याचं धाडस त्यांनी केलं. पण तरीही ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाची जी Legacy होती, जो वारसा होता, तो मांजरेकरांना कुठेतरी या चित्रपटात जपता आला नाही ही खंत वाटते… आता मांजरेकरांनी स्पष्टीकरण दिल्यानुसार, जरी हा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’चा सीक्वेल नसला तरी शिवराय हा समान धागा आहेच की… असो.. जाणून घेऊया सोशिओ-पॉलिटिकल ड्रामा असलेल्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’बद्दल… पण हो या संपूर्ण आर्टिकलमध्ये चित्रपटाच्या कथानकाबद्दल स्पॉयलर अलर्ट असणार हे त्यामुळे तुमच्या जबाबदारीवर पुढे वाचा…(Mahesh Manjrekar Movie)
तर चित्रपट सुरू होतो, एका शेतकरी कुटुंबाच्या कथेपासून… दोन पोरं, आजोबा, पत्नी आणि शेतात राबणारा शेतकरी असं हे कुटुंब… एकीकडे सावकाराकडे कर्ज काढलेलं असतं आणि त्यातच त्याच्या माथी आणखी एक ओझं येतं, ते म्हणजे एका भयानक आजारपणाचं… आणि त्यातच घरचा कर्ता पुरुष नाईलाजाने आत्महत्या करतो, पत्नीला हे सहन होत नाही आणि त्याच्यापाठोपाठ तीसुद्धा आत्महत्या करते. अखेर पोरं मात्र अनाथ होतात… त्या गावात एक वकील असतो जो शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देत असतो, पण त्याच्यासोबत काही भयंकर घडल्यामुळे तो सतत दारुच्या नशेत तुटुंब बुडालेला असतो.. तो गावातल्या शेतकऱ्यांना वारंवार स्थानिक लबाड आमदाराच्या नादी न लागण्याचं आवाहन करत असतो, पण गावातली लोकं सहसा त्याचं ऐकत नसतात… पोलीससुद्धा साथ देत नाहीत. यानंतर त्या आत्महत्या करणाऱ्या आई-बापाची छोटी मुलगी रखमा ही शिवरायांच्या फोटोजवळ आर्जव करते आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे कान्होजी जेधे यांच्यासोबत त्यांच्या आणि इतर शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. पुढे काय काय घडतं यासाठी तुम्हाला चित्रपट नक्की पाहावा लागेल… (Punha Shivajiraje Bhosle Movie Review)

कथानकानंतर आता वळूयात कास्टिंगकडे… छोट्या भावा बहिणीची ही जोडी आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांची.. ही जोडी आपण आधी ‘नाळ’ मध्येही पाहिली आहे… तर, कथेत आत्महत्या करणारा बाप आहे अभिनेता पृथ्वीक प्रताप जो नाईलाजाने आत्महत्या, करतो… आजोबांच्या भूमिकेत आहेत शशांक शेंडे… पोलीस आहेत सयाजी शिंदे… बॅरिस्टर आहेत मंगेश देसाई… आमदाराच्या भूमिकेत दिसतात विक्रम गायकवाड… गावतला गुंड खिलारे आहे सिद्धार्थ जाधव आणि यांच्या जोडीला आहेत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची भूमिका साकारली आहे सिद्धार्थ बोडके याने! ‘नाळ २’ सारखाच त्रिशाने पुन्हा एकदा ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ या देखील चित्रपटात करून दाखवला आहे. तिचा अभिनय फारच इम्पॅक्टफुल असून एकूणच चित्रपटाचा ती फार महत्वाचा भाग असल्याचं तिने आपल्या अभिनयातून दाखवून दिलं आहे… (Treesha Thosar & Bhargav Jagtap)
दुसरीकडे शशांक शेंडे आणि मंगेश देसाई यांनीही उत्तमरित्या आपापल्या भूमिका सादर केल्या आहेत… एक हतबल आणि सपोर्टीव्ह आजोबा म्हणून शशांक शेंडे चित्रपटात उठून दिसतात. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा माणूस म्हणून मंगेश देसाई यांनीही आपल्या अभिनयाची छाप इथे उमटवली आहे… पण दुसरीकडे सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारखे तगडे आणि वजनदार अभिनेते मात्र आपापल्या भूमिकांना न्याय देऊ शकले नाहीत, किंवा असं म्हणायलाही हरकत नाही की, दिग्दर्शकांनी त्यांच्या अभिनयकौशल्याचा योग्यरित्या चित्रपटात वापर करुन घेतला नाही… महत्वाचं म्हणजे सिद्धार्थ जाधवचा व्हायकिंग्जसारखा लुक या चित्रपटात मांजरेकरांना का करावासा वाटला? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. साध्या ग्रामीण भागातला डेंजर डॉन दाखवण्याचा नादात सिद्धार्थ जाधवचा ऑरा सबंध चित्रपटात दिसूनच येत नाही, जो खरतर ‘मी शिवाजीराजे भोसले…’ मधील उस्मान पारकरमध्ये पाहायला मिळाला होता… आणखी एक ताकदीचे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे.. त्यांचही पोलिसाचं पात्र अपेक्षित प्रभाव पाडू शकलं नाही ही खंतच म्हणावी लागेल… (Punha Shivajiraje Bhosle Movie Cast)

आता वळूयात या चित्रपटाच्या महत्वाच्या गाभ्याकडे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या सिद्धार्थ बोडके याच्याकडे… आजवर शिवरायांचं पात्र साकारण्याचं धनुष्य अनेकांनी पेललं. काही यात यशस्वी झाले तर काहींना ते झेपलं नाही असंच म्हणावं लागेल. खरं तर या चित्रपटात महेश मांजरेकर यांना शिवरायांचा उग्र, रुद्रावतार दाखवायचा होता… परंतु, सिद्धार्थ बोडकेने तो जास्तच उग्र केला असं भासतं… शिवरायांचं महत्त्वाचं पात्र फार लाऊड वाटतं. सततचे त्यांच्या मुखी वेगवेगळे डायलॉग्ज, गरजेचे नसणारे Action सिन्स, भडक अंदाज या सगळ्यामुळे छत्रपतींचा ऑरा किंवा त्यांचा दबदबा चित्रपटात अनुभवता येत नाही… काही प्रसंग वगळता सिद्धार्थ बोडकेचा आवाज डबिंग केल्यासारखा वाटत असल्यामुळे शिवराय मोठ्या पडदयावर साकारण्यास सिद्धार्थ जरा कमी पडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही…
================================
हे देखील वाचा : Thamma : हॉरर कॉमेडीच्या नावाने अपेक्षाभंग करणारा सिनेमा!
================================
छत्रपती शिवाजी महाराज हा खरं तर प्रत्येक मराठी बांधवाचा जिव्हाळ्याचा विषय आहे… मराठी चित्रपटांमध्येही छत्रपती शिवाजी महाराज हा विषय खूपच भावनिकरित्या हाताळला जातो… पण भावनेच्या भरात आपण शिवरायांची छबी, त्यांचे विचार, आदर्श यांचं सादरीकरण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सांगड घालण्यास चुक करतो.. तीच कमतरता इथे सिद्धार्थ बोडकेच्या भूमिकेत दिसून आली आहे… संपूर्ण चित्रपटाचा स्क्रीनप्ले तुम्हाला नक्कीच खेळवत ठेवतो. मात्र, चित्रपटात असे काही प्रसंग आहेत ज्यांची खरंतर काहीच गरज नव्हती असं तुम्हाला नक्की वाटेल… एखादं उदाहरण सांगायचं झालं, तर सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज केवळ तीन जणांना दिसत असतात. यानंतर काही कारणास्तव महाराजांना आपलं मूळ रूप सर्वासमोर आणावं लागतं. आणि यासाठी ते चक्क देवाच्या दरबारात जातात आणि परवानगी मागतात की, मला पुन्हा माणसाचं रूप मिळावं. सोबतच हॉस्पिटलमध्ये एक काल्पनिक यमराजाचा सीन दाखवणं, जे चित्रपटाच्या कथेच्या चौकटीतच बसत नाही… तुम्ही जर का ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ पाहिला असेल तर त्यात महाराज फक्त दिनकर भोसलेला दिसतात पण या चित्रपटात राजे सगळ्यांनाच दिसतात…
एकंदरीत हा चित्रपट एक ACTION चित्रपट आहे, असं म्हणायला हरकत नाही. मध्यांतरापूर्वी महेश मांजरेकर यांनी स्टोरी बिल्डींग करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, जशी कथा पुढे सरकते तसं प्रेक्षक पुढे काय होणार याचा अंदाज बांधू शकतात… कथा, अभिनय याबद्दल जाणून घेतलं.. आता जरा संगीताबद्दल बोलूयात.. तर, हितेश मोडक यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून दुर्दैवाने यामध्ये असं एकही गाणं नाही, जे प्रेक्षकांवर प्रभाव पाडू शकेल. जसं की,'”‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटात ‘ओ राजे’ आणि ‘अफझलखानच्या वधाचा पोवाडा’ होता. पण तसं करणं या चित्रपटात संगीतकाराला जमलं नाहीये… शिवाय, भावनिक दृश्यांच्या वेळी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या पार्शवसंगीताचाही वापर केला गेला नाही… काही Action सीन्सही ऐतिहासिक संगीताचा अभाव जाणवतो… परंतु, ज्या द ग्रेट महेश मांजरेकरांना सगळे ओळखतात.. ज्यांनी इतके ग्रेट चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून दिले आहेत, त्यांना मात्र या चित्रपटात आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडता आली नाही.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने षटकार एका बाबतीत नक्कीच मारला आहे आणि तो म्हणजे चित्रपटाचा विषय जो आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विषय… आणि हा विषय योग्यरीत्या मांडण्यात मेकर्स यशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न, आत्महत्येची कारणं, त्यांची परिस्थिती आणि या सर्व परिस्थितीत छत्रपती शिवाजी शहाजी भोसले हे व्यक्तिमत्त्व त्यांच्यासाठी कसं धावून येतं, हे उत्तमपणे दाखवलं आहे. यासोबतच अनेक ठिकाणी शिवरायांच्या मुखी असणारे महत्त्वाचे आणि भावनिक संवाद प्रेक्षकांच्या मनाला भावते… शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच मराठी माणसाच्या महाराष्ट्रातील अस्तित्वाबाबतही चित्रपट भाष्य करतो. २००९ साली महेश मांजरेकर यांचा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ प्रचंड गाजला होता. इतकंच काय तर तो त्यावेळचा सर्वात जास्त कमाई करणार मराठी चित्रपट ठरला होता. पण ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ महाराष्ट्रात काय जादू करेल, हे आता महाराष्ट्राच्या मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांकडूनच कळेल. काही का असेना पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सर्वांनी एकदातरी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा.
कलाकृती मीडिया ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाला देत आहे पाच पैकी तीन स्टार्स !
-सागर जाधव
