Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

दहा वर्षानंतरचा Dimple Kapadia चा ‘कमबॅक’ आणि यशस्वी सेकंड इनिंग!
हिंदी सिनेमामध्ये हिरो भलेही वयाची पन्नाशी पार केलेला असला तरी पडद्यावर त्याला नायक म्हणून स्वीकारले जाते! आता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तिघेही पन्नाशीच्या आत बाहेर आहेत पण तरीही बॉलीवूडमध्ये त्यांच्या नावाने चित्रपट विकला जातो. नायक म्हणून त्यांना स्वीकारलं जातं. नायिकांच्या बाबत मात्र तसं नसतं. वयाची तिशी ओलांडली किंवा लग्न झाले तर नायिका म्हणून तिचे करिअर संपुष्टात येतं. मग चरित्र अभिनेत्री म्हणून ती भूमिका करू शकते. अर्थात याला देखील काही अपवाद नक्कीच आहेत. (शर्मिला,नूतन) पण एकूणच बॉलीवूडमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा चष्मा दिसतो.

यात नायिका जर ब्रेक घेऊन पुनरागमन ‘कमबॅक’ करत असेल तर आणखीच कठीण परिस्थिती असते. कारण मधल्या काळामध्ये संपूर्ण चित्र सगळं बदललेलं असतं. बऱ्याच नव्या नायिका आलेल्या असतात. त्या सर्वांसोबत टक्कर देत पुन्हा स्वतःला सिद्ध करणे तसं कठीण काम असतं. पण एका अभिनेत्रीने मात्र आपला कमबॅक जबरदस्त यशस्वी करून दाखवला होता. तब्बल दहा वर्षांच्या गॅप नंतर ती सिनेमात येत होती. कोण होती ती अभिनेत्री? आणि कशी होती त तिची सेकंड इनिंग? आणि कोणता होता तिचा कमबॅकचा चित्रपट?

आर के फिल्म च्या १९७३ सालच्या ‘बॉबी’ या चित्रपटाने संपूर्ण भारत वर्षामध्ये एकच धुमाकूळ घातला होता. टीन एज लव्ह स्टोरी हा नवीन कन्सेप्ट राज कपूरने यात दाखवला होता. या चित्रपटाची नायिका डिंपल कपाडिया त्यावेळी अवघ्या पंधरा वर्षाची होती. डिंपलने रातोरात प्रचंड मोठे यश मिळवले. तिचा कातील लूक, तिची अदाकारी, तिची फिगर… प्रेक्षक या सर्वांच्या प्रेमात पडले. डिंपलच्या मिनी स्कर्ट आणि डॉटेड पोलका याची मोठी फॅशन संपूर्ण देशात आली. ऋषी कपूर या चित्रपटाचा नायक होता. या जोडीने चित्रपटाला बंपर यश मिळवून दिले. ही जोडी भविष्यामध्ये मोठा करिष्मा करणार याची खूणगाठ सगळ्यांनी बांधली होती. पण याला मोठा ब्रेक लागला.

चित्रपटाचे शूटिंग चालू असतानाच तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्नाने डिंपल कपाडिया सोबत २३ जानेवारी १९७३ रोजी चक्क लग्न करून टाकले. हे लग्न म्हणजे त्या काळातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती. कारण डिंपल त्यावेळेला फक्त पंधरा वर्षाची होती तर राजेश खन्ना तीस वर्षाचा होता. नुसतं वयात अंतर नव्हतं तर राजेश खन्नाचा करिष्मा त्या काळात प्रचंड मोठा होता. ‘नीचे काका उपरा काका’ अशी त्या वेळेला परिस्थिती होती. राजेश खन्नाचे जबरदस्त फॅन फॉलोईंग भन्नाट होते, विशेषतः त्यात मुलींचे प्रमाण प्रचंड होतं. त्या काळात मुली राजेश खन्नाच्या फोटो सोबत लग्न लावून घेत. त्याच्या कारवर आपल्या ओठांनी चुंबनांचा वर्षाव करत. त्याला रक्ताने पत्र पाठवत. एकूणच राजेश खन्ना त्यावेळेला कम्प्लीटली छा गया था. अशा या करोडो मुलींच्या स्वप्नातील राजकुमाराने डिम्पल सोबत लग्न केले होते!

या लग्नानंतर डिंपलने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेऊन आणखी एक धक्का दिला. राजेश आणि डिंपलचा संसार सुखाने सुरू झाला. ट्विंकल आणि रिंकल हि दोन कन्यारत्न झाली. पण लग्नाच्या नंतर राजेश खन्नाचा डाऊन फॉल सुरू झाला. राजेश खन्नाच्या कुठल्याही चित्रपटाला त्या काळात यश मिळतं नव्हतं. त्यामुळे तो व्यावसायिक पातळीवर अयशस्वी ठरत होता. पण त्याच्यातील गुरुर अहंकार कायम होता. यातूनच पती-पत्नीमध्ये बेबनाव सुरू झाला आणि १९८२ साली डिंपल राजेश खन्नाचे घर सोडून निघून गेली. सोबत आपल्या दोन मुलींना घेऊन गेली !

राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या लग्नाला जेवढी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी त्यांच्या वेगळं होण्याला मिळाली. डिंपलने आता पुन्हा एकदा चित्रपटात कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दहा वर्षानंतर दोन मुलींची आई पुन्हा नायिका म्हणून कम बॅक करते आहे ही मोठी ब्रेकिंग न्यूज त्या काळात होती. रमेश सिप्पी यांनी लगेच डिंपल कपाडियाला ऍप्रोच करून आपल्या नवीन ‘सागर’ या चित्रपटाची नायिका म्हणून तिला साइन केले. या चित्रपटात तिच्यासोबत पुन्हा ऋषी कपूरला घेऊन त्यांना ‘बॉबी’ची लोकप्रियता इन कॅश करायची होती. सोबत साउथचा सुपरस्टार कमल हसनला घेतले. चित्रपटाचे शूट सुरू झाले. पण चित्रपट खूप धीम्या गतीने तयार होत होता. डिंपल कपाडियाला त्या काळात पैशाची गरज असल्यामुळे तिने रमेश सिप्पी यांना न सांगता साउथकडील एक चित्रपट साइन केला. चित्रपट होता ‘जखमी शेर’ यामध्ये तिचा नायक होता जितेंद्र..
खरंतर रमेश सिप्पी यांनी डिंपलला बजावून सांगितले होते की ,”तुझा कमबॅक आमच्या ‘सागर’ या चित्रपटातूनच होणार आहे त्यामुळे दुसरा कुठलाही चित्रपट तू साइन करायचा नाही!” परंतु डिंपलने त्यांच्या अपरोक्ष चित्रपट साइन केला. साउथकडील चित्रपट बनण्याची सिस्टीम खूप शिस्तबद्ध असते. त्यामुळे ‘सागर’ या चित्रपटांनंतर शूटिंग सुरू झालेला ‘जखमी शेर’ सागरच्या आधीच जवळपास बनून तयार झाला! जेव्हा रमेश सिप्पी यांना कळाले की आपल्याला न सांगता डिंपलने एक साउथ इंडियन सिनेमा साइन केला आहे असं कळाल्यानंतर त्यांचे पित्त खवळले आणि त्यांनी डिंपलला बोलावून खूप खडसावले. “तुझ्या अशा कृत्यामुळे आमचे सर्व प्लॅनिंग चौपट होत आहे!”

डिंपल नंतर जखमी शेर या चित्रपटाच्या डबिंगला जायला टाळाटाळ करू लागली. या चित्रपटाचे क्लायमॅक्स शूट व्हायचे होते. त्याला देखील डिंपल उपस्थित राहिली नाही. ‘जखमी शेर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दासरी नारायणराव यांनी एक निर्णय घेतला त्यांनी डिंपलच्या अनुपस्थितीत तिची बॉडी डबल वापरून क्लायमॅक्स परस्पर शूट करून टाकला तसेच डबिंग एका डबिंग आर्टिस्ट कडून करून घेतले! हा चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. हा सिनेमा जर तुम्ही बघितला तर त्यात डिंपलचा आवाज तुम्हाला वेगळा वाटेल ; कारण तो डिंपल चा आवाज नाही तर एका डबिंग ऑंटीस्टचा आहे.
================================
हे देखील वाचा : Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे
================================
रमेश सिप्पी यांचा विरोध असताना देखील २८ सप्टेंबर १९८४ या दिवशी ‘जखमी शेर’ प्रदर्शित झाला. यानंतर तब्बल एक वर्षांनी ‘सागर’ ९ ऑगस्ट १९८५ रोजी प्रदर्शित झाला. अर्थात ‘जखमी शेर’ या चित्रपटाला फारसे व्यवसायिक यश न मिळाल्यामुळे ‘सागर’ या चित्रपटाचा इंतजार डिंपलच्या रसिकांना होताच. ‘सागर’ या चित्रपटात तिची मुख्य भूमिका होती ‘जखमी शेर ‘ मध्ये ती फक्त जितेंद्रची नायिका होती. त्यामुळे हा चित्रपट कधी आला कधी गेला कळाला नाही ‘सागर’ मात्र तिचा कमबॅकचा हिट चित्रपट ठरला!