Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’ हे गाणं कोणत्या पाश्चात्य गाण्यावरून घेतलं होतं?
संगीतकार राहुल देव बर्मन यांनी भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीचा सुरेख मेळ सांभाळत अनेक अप्रतिम गाणे स्वरबद्ध केली. त्यांच्या संगीतातील ऑर्केस्ट्रेशन खूप जबरदस्त असायचे. भारतीय चित्रपट संगीताला एक नवा आयाम देण्याचे काम पंचम यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून केले. हास्य अभिनेता मेहमूद यांच्या ‘छोटे नवाब’ (१९६१) या चित्रपटापासून त्यांनी संगीतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. सत्तरच्या दशकातील तर ते आघाडीचे संगीतकार होते. त्यांच्या अनेक रचनांवर पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव दिसून येतो. पण हे गाणे निव्वळ कॉपी टाईप नव्हते तर ते एक इन्स्पिरेशन होतं.
पंचम यांच्याकडे वादकांचा एक गुणी संच होता. ‘हकिकत’ या चित्रपटापासून आपली अभिनय आणि गाण्याची कारकीर्द सुरू करणारे भूपेंद्र सिंग हे उत्तम गिटार वादक होते. राहुल देव बर्मन यांच्याकडे अनेक चित्रपटात त्यांनी गिटारचे वादन केले आहे. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सिनेमातील ‘दम मारो दम’ या गाण्यातील गिटारचा पीस भूपेंद्र सिंग यांनीच वाजवला होता. ते उत्तम पार्श्व गायक होते. ‘परिचय’ या चित्रपटातील’ बीती ना बिताई रैना ‘ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
नासिर हुसेन यांच्या ‘यादों की बारात’ (१९७३) या चित्रपटातील ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ या गाण्यात गिटारचा पीस भूपेंद्र सिंग यांनी वाजवला आहे. या गाण्यातील सुरुवातीचा ग्लास आणि चमचा यांना घेऊन बनवलेला पीस अप्रतिम होता. ‘चुरा लिया है तुमने जो दिल को ‘ हे गाणं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलं होतं. गीताचे बोल मजरुह सुलतानपूरी यांनी लिहिले होते. या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला जेव्हा हे गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा पंचमने भूपेंद्र सिंगला सहज विचारलं, “आता आपणजे गाणे रेकॉर्ड केलं आणि ज्यामध्ये तू गिटारचा पीस वाजवला आहेस या गाण्याची ट्यून यापूर्वी तू कधी ऐकली आहेस का? तू नक्की ऐकलेली आहेस. जरा आठव. जर हि ट्यून तू बरोब्बर ओळखलीस तर मी तुला उद्या शंभर रुपये बक्षीस देईन.” भूपेंद्र सिंग ने हे आव्हान स्वीकारले. रात्रभर तो हि ट्यून पुन्हा पुन्हा ऐकत राहिला. त्याला लक्षात येत होते पण आठवत नव्हते. दुसऱ्या दिवशी जेव्हा पंचम आणि भूपेंद्र भेटले त्या वेळेला पंचम ने विचारले, “लक्षात आली का ट्यून?” तेव्हा भूपेंद्रने नाही म्हणून सांगितले.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
त्यावर पंचम म्हणाला ,” या गाण्याची ट्यून मी १९६९ साली ‘This must be beljium ‘ या सिनेमातील ‘ If it is Tuesday it must be beljium’ या गाण्यावरून घेतले आहे. तेव्हा भूपेंद्रच्या डोक्यात प्रकाश पडला. या गाण्यावरून इन्स्पिरेशन घेत पंचमदा यांनी यादोंकी बारात या चित्रपटातील चुरा लिया है तुमने जो दिल को हे गाणं बसवलं होतं. या दोन्ही गाण्याच्या युट्युब लक्स मी खाली देत आहे दोन्ही गाणी तुम्ही ऐकून पहा. पंचमने त्या गाण्यावरून इन्स्पिरेशन घेऊन पूर्णपणे भारतीय चित्रपट रसिकांना आवडेल अशी ट्यून बनवली होती!
https://youtu.be/iB16qJmJGA8?si=ML0U6DKsTw8LnAKj (If it is Tuesday it must be beljium’ )
https://youtu.be/seFeZOgyFsc?si=SdnQYjJG8GLqVh1S (चुरा लिया ही तुमने)