
‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितिज दाते सज्ज!
अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी ‘बोलविता धनी’ या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या ‘बोलविता धनी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे.
क्षितिजने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आपलं मनोगत व्यक्त करताना तो म्हणाला की, “या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे. नाटक दोन काळांमध्ये चालत राहतं आणि नाटकाच्या नावाप्रमाणे ‘बोलविता धनी’ या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नाटकात लागतो.” क्षितिजच्या मते, ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसली तरी, “बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो.”

विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत त्याने साकारलेल्या लोकमान्य टिळक, एकनाथ शिंदे यांसारख्या नेतृत्वादी व्यक्तिरेखांच्या तुलनेत या नाटकात त्याची भूमिका कनिष्ठ पदाची आहे, पण एक अभिनेता म्हणून हेच आव्हान अधिक रंजक असल्याचं तो मानतो. हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवावर बोलताना क्षितिज म्हणाला, “मला हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं. त्यांची ‘नांदी’, ‘संयुक्त मानअपमान’ ही सगळी नाटकं मी पाहिली आहेत. शिवाय आता सुरू असलेल्या ‘मी व्हर्सेस मी’ या नाटकातही आम्ही दोघं एकत्र काम करतोय. त्यामुळे जेव्हा त्याने मला या नाटकासाठी फोन केला, तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो बोलून टाकलं. नाटक काय आहे, वाचन कधी आहे, असल्या कोणत्याही गोष्टीत मी पडलो नाही; त्याने विचारलं त्याच क्षणी मी हो बोललो.”
================================
हे देखील वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor यांनी नव्या घरात केला गृहप्रवेश!
================================
हृषिकेश यांच्या निवडक विनोदी शैलीमुळे हे नाटक सहकुटुंब पाहता येईल असं आहे. क्षितिज म्हणाला की, हृषिकेशचं हे कसब आहे की त्याने ही संपूर्ण टीम एकत्र आणली; त्याची कलाकार निवडीबाबतची पारख खूप चांगली आहे. या नाटकात विनोदाचं अंग खूप मोठं आहे. या नाटकात ओंकार कुलकर्णी, संग्राम साळवी, यांसारख्या कलाकारांसह एकूण १३ जण आहेत. महत्त्वाचे म्हणजे, “कोणाच्याही खिजगणतीत नाही अशा जुन्या नाटकांच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगावरती हे नाटक भाष्य करतं.”
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi