
व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत दिसणार Tamannaah Bhatia
भारतीय चित्रपटसृष्टीतील द ग्रेट दिग्दर्शक-निर्माते व्ही शांताराम (V Shantaram) यांच्या जीवनावर आधारित चित्रपती व्ही शांताराम हा पहिला बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) शांताराम बापूंची भूमिका साकारणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता व्ही शांताराम यांच्या एक्स पत्नी जयश्री यांची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे रिव्हील करण्यात आलं आहे. हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) जयश्री यांची भूमिका या बायोपिकमध्ये साकारणार आहे. व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. (Entertainment News)

दरम्यान, व्ही शांताराम या चित्रपटातील तमन्नाचा पहिला लूक प्रदर्शित झाला. या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत आणि कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवते. ‘जयश्री’ ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून, त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून कशा होत्या हे आपल्यासमोर उलगडणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे. (V. Shantaram Biopic)

याआधी प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदी यांच्या व्ही. शांताराम यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये अपार उत्सुकता निर्माण केली होती. आता तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’च्या पोस्टरमुळे त्या कथेतला भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचे समीकरण, त्यांचा सहप्रवास आणि त्यांच्या नात्यातील गुंफण पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली आहे.
================================
हे देखील वाचा : ठरलं!‘व्ही. शांताराम’ यांच्या बायोपिकमध्ये Siddhant Chaturvedi दिसणार प्रमुख भूमिकेत
================================
हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. ‘व्ही. शांताराम’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार असून, तो भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला नव्या पिढीसमोर आणणारा एक भव्य आणि भावस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi