VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Marathi Movie Review : प्रत्येक आई आणि तिच्या मुलाने पाहावा असा ‘उत्तर’
बघा… खरं सांगू तर आजची genZ पिढी ही नुसती फोनमध्ये बुडालेली असते. AIमुळे जरी ही पोरं इन्होवेटिव्ह होत असली तरी पण त्यांचं स्वतःच्या आईसोबतचं भावनिक नातं आजही तसंच टिकून आहे का? याचीच गोष्ट सांगितली आहे, क्षितीज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ या चित्रपटात… एक प्रेमळ स्वभावाची सोज्वळ आई आणि एक फ्रस्ट्रेट असलेला फटकळ मुलगा… यांची ही सुंदर इमोशनल राईड चित्रपटात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.. चला तर मग जाणून घेऊया AI VS आईचा सामना असलेला हा ‘उत्तर’ चित्रपट नेमका कसा आहे आणि तो का बघावा… (Uttar Marathi Movie Review)
प्रत्येकाची आई वेगळी असते… कोणाची राग राग करणारी आई असते, कोणाची आई शांत भोळी असते… तर कोणाची एन्टरटेनिंग मस्करी करणाऱ्या स्वभावाची… ‘उत्तर’मधल्या नन्या म्हणजेच निनादची (अभिनय बेर्डे) आईसुद्धा अशीच आहे… आपला मुलगा कितीही चिडचिड करत असला, आईकडे लक्ष देत नसला, तरीही ती त्याच्यावर अफाट प्रेम करते. त्याला दैनंदिन आयुष्यातल्या ४ गोष्टी शिकवते, ती आई आहे उमा (रेणूका शहाणे). नन्याचे वडील काही वर्षांपूर्वी वारलेले असतात, म्हणून आता एक आईच त्याच्याकडे उरलेली असते. बरं आई उमा ही एक रेडिओ निवेदिका असते आणि नन्या इंजिनिअरींग करणारा एआयच्या काळातला मुलगा… प्रोजेक्ट्सची भानगड त्याच्या मागेच लागलेली असते. त्यामुळे सतत त्यातच तो गुंतलेला असतो. कधी हसत नाही, कधी नीट उत्तर देत नाही. पण साधी भोळी कॉमेडी स्वभावाची आई नेहमीच त्याच्यासोबत प्रेमाने वागत असते. पण तरीही तिच्या आत तिने कोंडून ठेवलेलं वादळ सर्वांना माहिती नसतं. अगदी नन्यालाही नाही… नन्यासोबत कॉलेजमध्ये त्याची एकुलती एक मैत्रीण असते, क्षिप्रा… मैत्रीण कसली गर्लफ्रेंडचा म्हणा.. पण तो कधीही तिच्यासोबत गर्लफ्रेंडसारखा वागत नसतो. त्यामुळे तिचाही गोंधळ उडालेलाच असतो. बरं ज्या आईमुळे नन्या सतत वैतागलेला असतो, त्याच आईमुळे त्याला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी एक भन्नाट आयडीया सुचते… यासाठी आईची मदत घेतो. आईसुद्धा हवी ती मदत त्याला करते… पण याच दरम्यान एक अशी गोष्ट आईच्या आयुष्यात येते… ज्यामुळे सगळंच बदलतं. आणि इथेच चित्रपटसुद्धा वेगळं वळण घेतो. पुढे काय घडतं, यासाठी तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्येच जाऊन बघा…

बरं चित्रपटाचा प्लॉट जाणून घेतल्यानंतर आता चित्रपटातल्या कलाकारांनी अभिनय कसा केला आहे यावर एक नजर टाकूयात… तर रेणुका शहाणे या अक्षरशः उमा आणि आई हे दोन्ही पात्र जगल्या आहेत. मनातली घुटमळ सोबत ठेऊन सर्वांना नेहमीच आनंदी ठेवणारी आई त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे. दुसरीकडे नन्याचं पात्रसुद्धा मेकर्सनी सुंदर रंगवलं आहे. म्हणजे आजच्या युगातला सोशल मीडियामध्ये हरवलेला, आई असतानाही AI च्या जगात वावरणारा, फोटोहोलिक GENZ असा निनाद त्यांनी सुंदर उभा केला आहे. अभिनय बेर्डेनेही एक गोंधळलेला मुलगा म्हणून हा रोल सुंदररित्या निभावला आहे. फक्त इमोशनल सिन्सवर आपल्या अभिनयात त्याला अजून आपली पकड बनवावी लागेल. उदा. रडताना… हृता दुर्गुळे AS युज्युअल उत्तम अभिनेत्री… आणि हे वर्ष हृताचच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आधी ‘आरपार’ आणि आता ‘उत्तर’… दोन्ही चित्रपटांमधूनही ती एक तोडीची कलाकार आहे, हे तिने दाखवून दिलं आहे.
तर, निर्मिती सावंत यांचीही मावशी ही कमी स्क्रिनटाईम असणारी पण उत्कृष्ट व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीची १५ मिनिटे Character Building केलं आहे. यानंतर मुव्हीने चांगला पेस पकडला आहे. आणि तोच पेस शेवटपर्यंत ठेवला आहे. चित्रपटाच्या पूर्वार्ध तुम्हाला खऱ्या आईचं भावनिक विश्व दाखवतो तर उत्तरार्ध तुम्हाला एआयवाल्या आईचं भावनिक विश्व दाखवतो. विशेष म्हणजे यात दोन पिढ्यांचे दोन काळसुद्धा दाखवले आहेत. म्हणजे एकेकाळी पत्राद्वारे आपला संवाद व्हायचा आणि आता त्याची जागा सोशल मीडिया APPS मधल्या मेसेजेसनी घेतलेली आहे. यामध्ये एक डायलॉगसुद्धा आहे की, ‘आया जगातल्या बेस्ट डायलॉग रायटर्स असतात’… आणि हे तसं खरंही आहे. हा असा चित्रपट आहे की तुम्ही प्रत्येक डायलॉग आणि Moment शी कनेक्ट होऊन जाता.
================================
हे देखील वाचा : Dhurandhar ने धुरळा केलाय; पण तरीही…
================================
बरं आता विषय संवादाचा आहे.. तर संवाद सुंदर, इमोशानल आहेत. भावनेच्या भरात वाहून गेलेले अतिशयोक्ती असे डायलॉग ‘उत्तर’मध्ये नाहीत. म्युझिक एकदम परफेक्ट! गाणी उत्तम… ‘असेन मी’ आणि ‘हो आई’ ही दोन्ही गाणी तुम्हाला वेगळ्या विश्वातच घेऊन जातात. शिवाय, या चित्रपटातून I-पॉप स्टार या कार्यक्रमात सहभागी झालेली राधिका भिडे हिने पार्श्वगायिका म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.. तसेच, इमोशनल सिन्सच्या वेळी background म्युझिक खूप जबरदस्त खिळवून ठेवतं. स्क्रीनप्लेसुद्धा तुम्हाला खेळता ठेवतो. कोणत्याही क्षणाला बोअर करत नाही. त्यात चित्रपटातला अखेरचा पूर्ण पार्ट हा इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलांनाच समर्पित आहे, असं वाटतं. पण तरीही काही प्रेक्षकांना थेट AI, टेक्नोलॉजी, रोबोटिक्स या गोष्टी थेट कळणार नाहीत. त्यासाठी या गोष्टी थोड्या सुटसुटीत करून सांगायला हव्या होत्या. या गोष्टीचा अभाव इथे जाणवतो.

आता आपण येऊया, या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार क्षितीज पटवर्धनकडे ! महत्त्वाचं म्हणजे क्षितीज पहिल्यांदाच दिग्दर्शनात उतरलाय आणि पहिल्याच बॉलवर त्याने सिक्सर मारला आहे. आपल्या उत्कृष्ट रायटिंग स्किल्स प्रमाणेच डिरेक्शनमध्येही उत्तम काम क्षितीजने केलं आहे. आईच्या जगण्यातलं सौंदर्य त्याने ‘उत्तर’मध्ये खुलवलं आहे. एकंदरीत काय तर या कपल्सच्या लव्ह स्टोरीजच्या काळात आई आणि मुलाची ही युनिक लव्ह स्टोरी आपण सर्वांनी पाहिली पाहिजे. आपण नेहमी म्हणतो आई सगळं कळतं… पण आईला नेमकं काय काय कळतं याचं उत्तर शोधायला तुम्हाला थिएटरला जाऊनच हा चित्रपट पाहिला पाहिजे.
कलाकृती मीडिया ‘उत्तर’ला देत आहे पाचपैकी चार स्टार्स!
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi