
Jabrat Marathi Movie: छोट्या पडद्यावरील आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण करणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि ती उत्सुकता आता मराठी चित्रपट ‘जब्राट’मधून पूर्ण होणार आहे. तारा करमणूकच्या बॅनरखाली तयार झालेल्या आणि प्रगती कोळगे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या ‘जब्राट’ या चित्रपटात आयुष आणि अनुष्का अनुक्रमे प्रिन्स आणि निशा या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तरुणाईच्या भावविश्वाला स्पर्श करणारी ही प्रेमकथा कॉलेजच्या पार्श्वभूमीवर घडते. प्रेम, मैत्री, संगीत, नृत्य आणि मस्ती यांचा मनमोकळा अनुभव देणारा हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.(Jabrat Marathi Movie)

चित्रपटाचा पहिला पोस्टर आणि ‘तू आणि मी’ हे रोमँटिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यातून आयुष आणि अनुष्काची सहज, हसरी आणि तरुणाईला भावणारी केमिस्ट्री दिसून येते, जी चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढवते. या चित्रपटात मुख्य जोडीसोबतच वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट आणि प्रगती कोळगे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

याशिवाय संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांसारखे अनुभवी कलाकार चित्रपटाला भक्कम साथ देतात.‘जब्राट’चे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे असून छायांकनाची जबाबदारी अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन चार्ल्स गोम्स यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांचे असून वेशभूषेची आखणी युगेशा ओमकार यांनी केली आहे.(Jabrat Marathi Movie)
===================================
हे देखील वाचा: Dashavatar World Television Premier: ‘या’ दिवशी टेलिव्हिजनवर ‘दशावतार’ पाहता येणार !
===================================
चित्रपटातील संगीत डॉ. जयभीम शिंदे यांनी दिले असून बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर आणि स्वाती शिंदे यांच्या आवाजाने गाणी सजली आहेत. प्रेमकथा, तरुणाईची ऊर्जा आणि संगीताचा ठेका यांचा संगम असलेला ‘जब्राट’ हा चित्रपट नव्या वर्षात मराठी प्रेक्षकांसाठी एक फ्रेश आणि हलकाफुलका मनोरंजनाचा अनुभव ठरणार आहे.