
Actress Priyadarshini Indalkar ने गुपचुप लग्न उरकलं? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण
‘Maharashtrachi Hasyajatra’ या लोकप्रिय कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priydarshani Indalkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि प्रभावी कॉमिक टायमिंगमुळे तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. विविध व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांना मनमुराद हसवणारी प्रियदर्शिनी केवळ छोट्या पडद्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही स्वतःचा ठसा उमटवला आहे. ‘सोयरीक’ (2022), ‘फुलराणी’ (2023) आणि ‘नामदेव बी.एस्सी. अॅग्री’ (2024) या चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी विशेष लक्षात ठेवल्या. विशेषतः ‘फुलराणी’मधील तिच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाच्या या प्रवासात प्रियदर्शिनी सातत्याने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसली आहे.(Priyadarshini Indalkar)

दरम्यान, सध्या प्रियदर्शिनी अभिनयामुळे नव्हे, तर एका खास फोटोमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती नवरीच्या पारंपरिक मराठमोळ्या वेशात दिसत आहे. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हिरव्या रंगाचा ब्लाउज, कपाळावर मुंडावळ्या, हातावर मेंदी, हिरवा चुडा आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेला तिचा हा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. हा फोटो समोर येताच चाहत्यांमध्ये प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे. प्रियदर्शिनीचं खरंच लग्न ठरलं आहे का? तिचा होणारा जोडीदार कोण आहे? की हा केवळ एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी तयार केलेला लूक आहे? काहींनी तर सोशल मीडियावर “कोण आहे तो नशीबवान?” अशा कॅप्शनसह अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी प्रियदर्शिनीचं नाव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील तिचा सहकलाकार ओमकार राऊत याच्यासोबत जोडलं गेलं होतं. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती आणि त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्यांचे फोटोही या चर्चांना खतपाणी घालत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा “रिअल लाइफ पार्टनर कोण?” असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.(Priyadarshini Indalkar)
=============================
==============================
मात्र, या व्हायरल फोटोबाबत प्रियदर्शिनी इंदलकरकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हा फोटो खाजगी आयुष्याशी संबंधित आहे की एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहे, हे स्पष्ट होण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, प्रियदर्शिनी अलीकडेच ‘दशावतार’ या मराठी चित्रपटात झळकली होती. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत होते. प्रियदर्शिनीने ‘वंदू’ ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. ‘दशावतार’ हा सिनेमा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला. एकीकडे करिअरमध्ये यशाची शिखरं गाठणारी प्रियदर्शिनी, तर दुसरीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत निर्माण झालेली उत्सुकता या दोन्ही गोष्टींमुळे सध्या ती चर्चेचा विषय ठरत आहे. आता तिच्याकडून अधिकृत खुलासा कधी होतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.