
Mi Savitribai Jotirao Phule मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न!
काट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत असतानाही ज्या स्त्रीने भविष्याच्या स्वप्नांना जपलं, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष, धैर्य आणि विचारांची ज्योत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहवरील आगामी ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ (Mi Savitribai Jotirao Phule) च्या सेटचं भव्य अनावरण नुकतंच पार पडलं आणि या सोहळ्याने इतिहासाच्या एका जाज्वल्य पर्वाला नव्यानं उजाळा दिला. या विशेष प्रसंगी मालिकेचे निर्माता तसेच महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe), सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणाऱ्या मधुराणी गोखले (Madhurani Gokhale), स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे (Satish Rajwade)आणि मालिकेशी संबंधित संपूर्ण टीम उपस्थित होती. हा सोहळा म्हणजे केवळ सेटचं उद्घाटन नव्हतं, तर महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला दिलेली एक सशक्त मानवंदना होती. (Mi Savitribai Jotirao Phule Serial )

या मालिकेसाठी उभारलेला सेट त्या काळातील सामाजिक वास्तवाचं जिवंत दर्शन घडवतो. स्त्री शिक्षणासाठी चाललेली झुंज, समाजातील विषमता, अपमान, वेदना आणि तरीही उज्ज्वल उद्याची आशा या सगळ्याच भावना सेटच्या प्रत्येक तपशिलातून प्रकर्षानं जाणवतात. अभ्यासपूर्ण संशोधन आणि कलात्मक दृष्टिकोनातून हा सेट कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांनी साकारला असून तो प्रेक्षकांना थेट इतिहासाच्या काळात घेऊन जाण्याची ताकद ठेवतो.

आपल्या भावना व्यक्त करताना मधुराणी गोखले म्हणाल्या,“सावित्रीबाई फुले या केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नव्हत्या, तर त्या एका युगाचं प्रतीक होत्या. अशा महान स्त्रीचं व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारणं ही माझ्यासाठी सन्मानाची आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो, त्यामागे सावित्रीबाईंनी दिलेलं बलिदान आहे. ही भूमिका करताना मनात अभिमानासोबतच एक दडपणही आहे. प्रेक्षकांनी या प्रवासात आम्हाला साथ द्यावी, हीच अपेक्षा.”तर डॉ. अमोल कोल्हे यांनीही आपल्या भावना मनमोकळेपणाने मांडल्या. ते म्हणाले की, “महात्मा जोतीराव फुले हे विचारांची जिवंत मशाल होते. समाजाला प्रश्न विचारायची हिंमत त्यांनी दिली. अशा थोर समाजसुधारकाची भूमिका साकारणं हे कलाकार म्हणून मोठं आव्हान आहे. स्टार प्रवाहसोबतचं माझं नातं खास आहे आणि अनेक वर्षांनंतर या वाहिनीसोबत निर्माता म्हणूनही काम करताना मला विशेष आनंद होतो. सावित्रीबाई फुले यांचं योगदान शब्दांत मांडणं अशक्य आहे. आज प्रत्येक स्त्री जी आत्मविश्वासाने उभी आहे, तिच्या पाठीशी सावित्रीबाईंची प्रेरणा आहे. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे.” (Mi Savitribai Jotirao Phule Serial )
===================================
===================================
स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी झगडलेल्या एका असामान्य स्त्रीची ही असामान्य कहाणी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ५ जानेवारीपासून, दररोज सायंकाळी ७.३० वाजता, स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.