
Maharashtrachi Hasyajatra: नव्या वर्षात, नव्या जोमाने सरु होणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा नवा सिझन!
नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्रातील घराघरात हसण्याची लाट आणणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra)पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांच्या अफाट प्रेमामुळे हा शो केवळ एक कार्यक्रम न राहता अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आता हा आवडता शो नव्या जोमात आणि नव्या कल्पनांसह परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी २०२६ पासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता, सोनी मराठीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सीझन प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात हास्य, सकारात्मकता आणि धमाल विनोदांनी करण्याचा हा एक उत्तम योग ठरणार आहे.(Maharashtrachi Hasyajatra New Season)

या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत पूर्णपणे नवीन संकल्पनांवर आधारित स्किट्स, ताज्या व्यक्तिरेखा आणि अनेक अनपेक्षित ट्विस्ट. मराठमोळ्या विनोदाची खास शैली जपत, आजच्या काळाशी जोडलेले विषय आणि लोकजीवनातून घेतलेली प्रहसने या सीझनचे मुख्य आकर्षण असणार आहेत. प्रेक्षकांचा लाडका कलाकार ओंकार भोजने (Onkar Bhojane) याचे पुनरागमन ही या सीझनमधील खास बाब ठरणार आहे. नव्या विषयांसह आणि नव्या अंदाजात ओंकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या नव्या प्रहसनांची उत्सुकता चाहत्यांमध्ये आधीपासूनच पाहायला मिळत आहे.

दिवसभराच्या धावपळीने थकलेल्या मनाला हलकं करणं, ताणतणाव विसरायला लावणं आणि कुटुंबासोबत निवांत हसण्याचा क्षण देणं – हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. कलाकारांमधील जबरदस्त केमिस्ट्री, अचूक टाइमिंगचे पंचेस आणि भावनांना स्पर्श करणारा विनोद यामुळेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवात. याच भावनेला साजेसा असा हा नवा सीझन प्रेक्षकांसाठी दुप्पट मनोरंजन घेऊन येणार आहे. (Maharashtrachi Hasyajatra New Season)
==================================
==================================
५ जानेवारीपासून दर सोम–मंगळवार रात्री ९ वाजता, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’आपल्याला फक्त सोनी मराठीवर पाहता येणार आहे. नव्या वर्षात हसण्याचं नवं कारण शोधायचं असेल, तर हास्यजत्रा नक्कीच तुमच्यासाठी आहे.