२०२५ मध्ये ११० Marathi Movies; पण कमाई फक्त ९९ कोटी… काय गंडतय?
२०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक सिनेमे आले, जसे ‘आता थांबायचं नाय’, ‘दशावतार’, ‘साबर बोंडं’, ‘गोंधळ’, ‘उत्तर’ आणि बरेच… पण बाकीचे नेहमीप्रमाणे आपटले. २०२५ या वर्षात ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण या सर्व चित्रपटांची एकत्रित मिळून कमाई फक्त आणि फक्त ९९ कोटी ४६ लाख रुपये इतकीच झाली. त्यातसुद्धा फक्त दहा चित्रपटांनी म्हणजे ९ टक्के चित्रपटांनी जवळपास ७५ टक्के म्हणजे ७४.४६ कोटी रुपये कमाईचा वाटा उचलला. त्यामुळे हिंदी आणि साऊथच्या चित्रपटसृष्टीशी कमाईच्या बाबतीत आपली तुलना होऊच शकत नाही.
परंतु, प्रादेशिक सिनेमाच्या तुलनेत फक्त महाराष्ट्रात तरी मराठी सिनेमाने चांगली कमाई करणं अपेक्षित होतं, जे होत नाही. दुसरीकडे ‘पुष्पा-२’ सारखा सिनेमा एकट्या मुंबई सर्किटमध्ये तब्बल २०० कोटींची कमाई करू शकतो, पण ११० मराठी चित्रपट मिळून अख्ख्या महाराष्ट्रात साधा १०० कोटींचा आकडा सुद्धा पार करून शकत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रमुख भारतीय भाषांच्या तुलनेत ९९ कोटींची सर्वात कमी बॉक्स ऑफिसवरील कमाई ठरली आहे. पण तेच दुसरीकडे साउथच्या कुठल्याही मग तो तमिळ तेलुगु, कन्नड, मल्याळम कोणताही असो त्यांच्या एका चित्रपटाची कमाई जितकी असते, तितकी रक्कम अक्ख्या मराठी सिनेसृष्टीला संपूर्ण वर्षभरात मिळते, ही वस्तुस्थिती फार भयानक आणि दुर्दैवी आहे.

आता म्हणायचं झालं तर, मुंबई ही भारतातली सर्वात मोठी फिल्मसिटी आहे. सगळ्याच इंडस्ट्रीची लोकं आपला चित्रपट मुंबईत चालावा, याला प्राधान्य देतात. त्यातच मुंबई हे बॉलीवूडचं घर असल्यामुळे ही गोष्ट मराठी इंडस्ट्रीला मागे खेचायला कारणीभूत ठरतेच… पण यासोबतच आणखी काही कारणं ज्यामुळे मराठी चित्रपटांना आपल्याच घरात कमाई करायला स्ट्रगल करावं लागतं त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातलाच मराठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात हिंदी सिनेमाकडे वळला आहे. एकंदरीत मराठीमध्ये कंटेंट ड्रिव्हन चित्रपटांची परंपरा आहे. तर, दुसरीकडे ऐतिहासिक, लव्हस्टोरी, कॉमेडी सामाजिक विषय… असा मराठी सिनेमाचा कल आहे. (Bollywood)

मात्र, प्रेक्षकांना आवडणाऱ्या अॅक्शन, सस्पेंस थ्रिलर यामध्ये मराठीने कधीही हात घातला नाही. हेसुद्धा कारण असू शकतं की मराठी प्रेक्षकांची चव बदलली आहे. त्यांनाही अॅक्शन, सस्पेंस थ्रिलर, मोठमोठे सेट्स… मराठीत बघायचं असावं, पण ते मिळत नसल्याने मराठी प्रेक्षक साउथ आणि हिंदीकडे वळत असावा. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी सिनेमांचं प्रमोशन मर्यादित, त्यातच बजेट कमी आणि थिएटरमध्ये शो मिळण्याची लढाई आता आणखी कठीण होत चालली आहे. त्यामुळे मराठी सिनेमाने आतातरी आपला झोन बदलायला हवा. आता एक उदाहरण जाणून घेऊयात.. गेल्या वर्षी मल्याळममध्ये दोन चित्रपट आले होते, ‘थूडारम’ आणि ‘लोका’… ‘थूडारम’चं बजेट २८ कोटी आणि ‘लोका’चं बजेट ३० कोटी… या दोन्ही चित्रपटांचा कंटेंट, कथेची मांडणी एकदा तरी पाहाच, तुम्हाला प्रचंड आवडेल. तर, सांगायटा मुद्दा हा की इतकं कमी बजेट असूनही ‘थूडारम’ने २३५ कोटी आणि ‘लोका’ने ३०४ कोटी कमावले. इतकंच नाही तर,…या दोन्ही सिनेमांनी ८० टक्के कलेक्शन एकट्या केरळमधून कमावलं होतं. (South Indian Movies)

मराठी सिनेमात आणखी एक घोडचूक होते, ती म्हणजे विनाकारणचे Clash ! म्हणजे डोक्यावर हिंदी आणि साऊथचं भूत असताना मराठी फिल्म मेकर्स चांगले चित्रपट आणूनही clash करतात आणि त्याचं नुकसान दोन्ही फिल्म मेकर्ससोबत मराठीलाही भोगावं लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर ७ फेब्रुवारी २०२५ला ‘स ला ते स ला ना ते’ आणि ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटांनी clash केलं होतं आणि त्याच दिवशी बॉलीवूडचे ४ चित्रपट रिलीज झाले होते. त्यानंतर २५ एप्रिलला ‘झापुक झुपुक’ आणि ‘देवमाणूस’ यांचं clash… त्या दिवशीसुद्धा ४ बॉलीवूडचे चित्रपट रिलीज झाले होते. नंतर १ मे ला महत्वाच्या दोन मराठी चित्रपटांनी clash केलं… ते म्हणजे ‘आता थांबायचं नाय’ आणि ‘गुलकंद’… दोघांचा कंटेंट चांगला असूनही कलेक्शन १० कोटींच्या वरती गेलं नाही.

१२ सप्टेंबर हा दिवससुद्धा मराठीच्या इतिहासातला clash डे ठरला… म्हणजे ‘दशावतार’, ‘आरपार’, ‘बिन लग्नाची गोष्ट’… तिन्ही मोठे चित्रपट… त्यात दिवशी बॉलीवूडचे ५ चित्रपट रिलीज झाले होते. पण ‘दशावतार’ने आपली होडी तरुन ठेवली… तितकचं नाही तर बॉक्स ऑफिसवर २८ कोटींची कमाईसुद्धा केली. पुढे सात दिवस उलटले नाहीत की पुन्हा १९ सप्टेंबरला चार मराठी चित्रपट एकाच दिवशी आले… म्हणजे आधी ‘दशावतार’, ‘आरपार’, ‘बिन लग्नाची गोष्ट’ थिएटरमध्ये सुरूच होते. त्याला जोड मिळाली ‘आतली बातमी फुटली’, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’, ‘अरण्य’ आणि ‘साबर बोंड’ची… म्हणजे सात मराठी सिनेमे एकाच दिवशी झांगडगुत्ता घालून होते. पण इतक्या गोष्टी डोळ्यांसमोर असतानाही clash चं भूत मराठी चित्रपटसृष्टीच्या डोळ्यावरून अजूनही उतरलं नाही. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीने आधी स्वत:सोबत सुरु असलेली लढाई मिटवून नंतर हिंदी आणि साउथवाल्यांशी लढा द्यायला हवा. (Entertainment News)
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत ग्रुपिज्म मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. म्हणजे ठराविक कलाकार फक्त ठराविक फिल्ममेकरसोबतच तुम्हाला काम करताना दिसतात. त्यामुळे मराठीत अंतर्गत clash सुद्धा आहेत हे कळतं. त्यामुळे निर्मात्यांसाठी निश्चितच या सर्व गोष्टी आर्थिक नुकसानीच्याच आहेत. आणि निम्म्या निर्मात्यांना त्यांनी लावलेला पैसा मिळतच नाही. त्यातच मराठीत सुपरस्टार हा कल्चरच नसल्यामुळे एकही कलाकार इथे सुपरस्टार हा tag मिळवू शकलेला नाही.
================================
हे देखील वाचा : फक्त Lata Mangeshkar नव्हे तर ‘या’ मराठी माणसामुळे ‘ए मेरे वतन के लोगों’ गाजलं!
================================

मराठी चित्रपटसृष्टीत एक एरा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी गाजवला होता. बॉलिवूडलाही टक्कर देतील असे एकापेक्षा एक बेस्ट विनोदी चित्रपट या जोडीने मराठीला दिले. पण आता मार्केटमध्ये हवा करेल असा एकही कलाकार आपल्याकडे नाही, हे दुर्दैव. आता २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात हेमंत ढोमेच्या क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम या चित्रपटाने जोरदार केली आहे. शिवाय, यात वर्षात दोन महत्त्वाचे आणि मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. ते म्हणजे ‘राजा शिवाजी’ आणि ‘खाशाबा’. त्यामुळे आतातरी मराठी इंडस्ट्री तग धरेल का? हे महत्त्वाचं ठरणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi