
Mirzapur 4 कधी येणार? श्रिया पिळगावकरने खास फोटो शेअर करत दिली गुडन्यूज!
Mirzapur च्या रक्तरंजित आणि सत्तेने भरलेल्या विश्वात प्रेक्षकांना पुन्हा एकदा खेचून नेण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘मिर्जापूर’ (Mirzapur) या वेब सीरिजने आपल्या पहिल्या दोन सीझनमधून प्रेक्षकांच्या मनावर गडद छाप उमटवली होती. गुन्हेगारी राजकारण, सत्तेची हाव, सूडाची आग आणि हिंसक संघर्ष यांचं प्रभावी चित्रण करत या मालिकेने भारतीय डिजिटल मनोरंजनाला वेगळी दिशा दिली. आता हीच कथा नव्या रूपात, मोठ्या पडद्यावर साकारली जाणार असून, या चित्रपटाचं नाव आहे ‘मिर्जापुर द फिल्म’(Mirzapur The Film).

या चित्रपटाबाबतची पहिली ठोस माहिती अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) हिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे, मिर्जापूरच्या पहिल्या सीझनमध्ये मृत्यू पावलेलं एक महत्त्वाचं पात्र पुन्हा कथेत परतणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. श्रियाने साकारलेली स्वीटी गुप्ता ( Sweety Gupta) ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. मात्र, तिच्या लग्नातच मुन्ना भैय्याच्या गोळीबारात तिचा मृत्यू दाखवण्यात आला होता. आता मात्र स्वीटीच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे कथा कोणत्या वळणावर जाणार याबाबत प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.(Mirzapur The Film)

श्रिया पिळगांवकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन छायाचित्रे आहेत. एका फोटोमध्ये ‘मिर्जापुर द फिल्म’चा क्लॅपबोर्ड दिसतो, तर दुसऱ्या फोटोमध्ये अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल यांच्यासह संपूर्ण कलाकार आणि टीम एकत्र दिसते. या पोस्टसोबत तिने दिलेलं कॅप्शन मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. “आठ वर्षांनंतर… अंदाज लावा, कोण मृत्यूच्या दारातून परत आलंय? मिर्जापुर फिल्म. शूटिंग सुरू आहे. लवकरच भेटू,” असं तिने लिहिलं आहे. या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा पूर आला आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्समध्ये प्रश्नांचा भडिमार केला आहे. त्यातील सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विक्रांत मैसी ( Vikrant Massey) या चित्रपटात दिसणार का? पहिल्या सीझनमध्ये बबलू या भूमिकेत त्याचाही मृत्यू दाखवण्यात आला होता. त्यामुळे स्वीटीसोबत बबलूचंही पुनरागमन होणार का, यावर सध्या तर्कवितर्क रंगले आहेत.
पहिल्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) , अली फजल (Ali Fazal) , दिव्येंदु शर्मा, विक्रांत मैसी, श्रिया पिळगांवकर, रसिका दुग्गल, हर्षिता गौर आणि कुलभूषण खरबंदा यांसारख्या कलाकारांनी मालिकेला भक्कम पाया दिला होता. दुसऱ्या सीझनमध्ये काही बदल झाले असले, तरी कथानकाची धार कायम राहिली. नव्या कलाकारांच्या एन्ट्रीमुळे मालिकेचा विस्तारही अधिक भव्य झाला होता. दरम्यान, श्रिया पिळगांवकर सध्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी ‘हैवान’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार असून, त्यामुळे हा प्रोजेक्टही विशेष चर्चेत आहे.(Mirzapur The Film)
=========================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: ८०० खिडक्या ९०० दारं; बिग बॉस मराठीच आलिशान घर पाहिलं का?
=========================
‘मिर्जापुर द फिल्म’ची अधिकृत रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी शूटिंग सुरू झाल्यामुळे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मिर्जापूरच्या दुनियेत पुन्हा एकदा शिरण्याची संधी मिळणार असल्याने, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.