
Lagnacha Shot Movie Trailer: नात्यांचा गोंधळ आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या सिनेमाचा धमाल ट्रेलर लॉन्च !
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा सोहळा नसून तो आनंद, गोंधळ, भावना आणि अनपेक्षित घटनांचा मेळ असतो. हाच रंगीबेरंगी अनुभव मोठ्या पडद्यावर सादर करण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ (Lagnacha Shot). या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि लक्षवेधी पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पारंपरिक कार्यक्रम न ठेवता चक्क खऱ्या लग्नसमारंभाच्या वातावरणात साकारण्यात आला होता. ढोल-ताशांच्या निनादात अभिनेता अभिजीत आमकर ( Abhijit Amkar) याची घोड्यावरून वरात आली, तर अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिचं आगमन पालखीतून करण्यात आलं. त्यामुळे उपस्थितांना हा केवळ ट्रेलर लॉन्च न वाटता प्रत्यक्ष लग्नघरात आल्याचा अनुभव मिळाला. या खास प्रसंगी लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी ( Swapnil Joshi) यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात अधिकच रंगत आली. संपूर्ण वातावरणात लग्नाची घाई, उत्साह, गोंधळ आणि धमाल पाहायला मिळाली, जी अगदी चित्रपटाच्या संकल्पनेला साजेशी होती. (Lagnacha Shot Movie Trailer)

ट्रेलरमध्ये लग्नाच्या तयारीपासून सुरू होणारी गोष्ट पुढे कशी वेगळी दिशा घेते, याची रंजक झलक दिसते. चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज आणि त्यातून उभा राहणारा गोंधळ हे सगळं विनोदी आणि हलक्याफुलक्या शैलीत मांडण्यात आलं आहे. अभि आणि कृतिका यांच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांचा प्रवास अनपेक्षित वळण घेतो. या प्रवासात प्रेक्षकांना हसवणारे प्रसंग जितके आहेत, तितकेच काही भावनिक क्षणही अनुभवायला मिळतात.

चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात की, “लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय खास आणि भावनिक टप्पा असतो. त्या एका दिवसासाठी अनेक स्वप्नं आणि अपेक्षा गुंफलेल्या असतात. मात्र अनेकदा या आनंदाच्या क्षणांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात, ज्या संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण देतात. ‘लग्नाचा शॉट’ची कथा अशाच घटनांवर आधारित आहे. या चित्रपटातून आम्ही केवळ विनोद नाही, तर नात्यांमधील गोंधळ, गैरसमज आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रवासही हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.” (Lagnacha Shot Movie Trailer)
==================================
==================================
६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकर, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव आणि संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.