
“माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांना नेहमीच…”; अजित पवारांच्या निधनानंतर Riteish Deshmukhची भावूक पोस्ट
२८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी ठरली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून विविध क्षेत्रातील लोकं अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहात आहेत. अशातच कलाक्षेत्रातील कलाकारमंडळी देखील अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अशातच, अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मिडियावर अजितदादांना श्रद्धांजली वाहात खास पोस्ट केली आहे. (Ajit Pawar Death)
रितेश देशमुखने (Riteish Deshmukh Post) अजित पवार आणि विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे की, “एका दुःखद अपघातात आपण अजित दादांना आपण गमावलं आहे, हे कळल्यावर मला मोठा धक्का बसलाय. मला प्रचंड दु:ख झालंय. महाराष्ट्राच्या सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक असलेल्या अजित दादांना कामात कुचराई अजिबात मान्य नव्हती आणि ते आपल्या सभोवतालच्या लोकांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सतत प्रेरित करत असत. ते स्पष्टवक्ते होते, त्यांची विनोदबुद्धी अतुलनीय होती आणि संपूर्ण राज्यात ते सर्वांचे लाडके होते. त्यांच्या अकाली निधनामुळं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून येणार नाही. मला त्यांच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली, आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांना नेहमीच स्मरणात ठेवीन. पवार कुटुंब, त्यांचे प्रियजन आणि लाखो समर्थकांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना”. (Entertainment News)

तर, अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग याने लिहिलं आहे की, “महाराष्ट्राचं राजकारण तुमच्याशिवाय अपूर्ण आहे… महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमची अत्यंत गरज होती.. तुमचा मिश्किल पण तितकाच थेट स्वभाव यामुळे सगळेच तुमचे चाहते होते. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे खुप धक्कादायक आहे. अजितदादा भावपूर्ण श्रद्धांजली. मोठा नेता गेला”. (Pushkar Jog)

दरम्यान, ज्या विमानात अजित पवार यांचा अपघात झाला त्यात अजून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मुंबईतून बारामतीला जाताना त्यांचा हा भीषण अपघात झाला असून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची पोकळी कधीही भरुन निघणार नाही हे निश्चित.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi