Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी
Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी ‘फुला’!
अस्सल मराठी संस्कृतीच्या पायाभूत परंपरांमध्ये खोलवर रुजलेली वाघ्या-मुरळी प्रथा आणि त्यातून घडणारे आयुष्याचे चटके मोठ्या पडद्यावर आणण्याचे धाडस ‘फुला’(Phula) या आगामी मराठी चित्रपटाने केले आहे. जेजुरीतील खंडेरायाच्या साक्षीने चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले आणि याच वेळी या कथानकाच्या सामाजिक आशयाची झलक रसिकांना मिळाली. १७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा चित्रपट ग्रामीण वास्तव आणि लोककलेच्या जगात डोकावण्याची संधी देणार आहे. ‘फुला’ ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची कहाणी आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ आणि लोककलेच्या पारंपरिक रंगमंचावर वाढणाऱ्या तिच्या आयुष्याला समाजाच्या चौकटींचा वेढा असतो. कलेचा गौरव केला जातो; पण कलाकार स्त्रीच्या आयुष्याकडे मात्र उपेक्षेने पाहिले जाते याच विसंगतीवर चित्रपट भाष्य करतो.(Phula Marathi Movie Poster)

दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी या कथेबद्दल बोलताना सांगितले की, हा चित्रपट केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही; तर पारंपरिक लोककलांमध्ये गुंतलेल्या स्त्रियांच्या जगण्याचा आरसा आहे. त्यांच्या स्वप्नांना, हक्कांना आणि सन्मानाला समाज किती वेळा नाकारतो, याचे वास्तव चित्रण यातून पाहायला मिळेल.या चित्रपटाची निर्मिती पै. अजित शिवाजी जाधव यांनी केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांची असून संगीताची जबाबदारी समाधान ऐवळे यांनी सांभाळली आहे. ग्रामीण मातीत वाढलेल्या टीमनेच हा चित्रपट साकारला आहे, ही त्याची खास जमेची बाजू.

छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे, संकलन राहुल प्रजापती यांनी केले आहे. वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील यांनी साकारली असून रंगभूषा समाधान भोरे यांची आहे. गायनात वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत यांसारख्या गायकांनी स्वर दिले आहेत. चित्रपटात प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर यांसह नवोदित कलाकारांची फळी आहे. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील कलाकार व तंत्रज्ञांनी एकत्र येऊन हा पहिलाच चित्रपट उभा केला आहे.(Phula Marathi Movie Poster)
===============================
हे देखील वाचा: The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६ सीन्समध्ये केले मोठे बदल…
===============================
‘फुला’ हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही; तो एका सामाजिक वास्तवाकडे बोट दाखवतो. परंपरेच्या नावाखाली चालत आलेल्या रूढी आणि त्यातून होणारे स्त्रियांचे शोषण यावर तो थेट प्रश्न उपस्थित करतो. लोककलेचा वारसा जपत असताना कलाकाराच्या मानवी हक्कांचा विचार करणे किती गरजेचे आहे, हे या चित्रपटातून प्रकर्षाने जाणवते. १७ एप्रिलला प्रदर्शित होणारा ‘फुला’ प्रेक्षकांना केवळ कथा सांगणार नाही, तर विचार करायला भाग पाडणार आहे. महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली ही कथा अनेकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळेल, यात शंका नाही.