
Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!
मराठी संगीतसृष्टीला सातासमुद्रापार नेत जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण करुन देणारे सर्वोत्कृष्ट संगीतकार जोडी आहे ती म्हणजे अजय आणि अतुल गोगावले (Ajay & Atul Gogavale). घरात डबे वाजवून संगीताची सुरुवात करत थेट जगातील अत्याधुनिक वाद्यांवर आपली पकड मजबूत करणाऱ्या अजय-अतुलने आता आणखी एक मोठी झेप घेतली आहे. विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या आगामी ‘राणाबाली’ (Ranabaal या तेलुगु चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. मराठी आणि हिंदीनंतर आता साऊथ चित्रपटसृष्टी काबिज करण्याचा या भावांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल आणि अजय-अतुलच्या संगीतप्रवासाबद्दल…. (Ranabaali Telugu Movie 2026)

अजय-अतुल यांनी घरात कलेचा वारसा नसूनही आपल्यातील संगीताची आवड ओळखली, जपली आणि तिला मोठी केली. महत्वाचं म्हणजे संगीताचं कुठलंही शिक्षण न घेता या जोडीने संगीतक्षेत्रात आपलं नाव मोठं केलं. २००४ मध्ये आलेल्या ‘अगं बाई अरेच्चा!’ या चित्रपटाला संगीत देत अजय-अतुलने फिल्मी दुनियेत पहिलं पाऊल टाकलं. या पूर्वी म्युझिक अल्बम ते करत होतेच पण चित्रपटामुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली. विशेष म्हणजे २००४ मध्येच अजय-अतुलने ‘गायब’ या हिंदी चित्रपटाला संगीत देत बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली. त्यानंतर २००९ मध्ये ‘जोगवा’ (Jogawa) चित्रपटाला संगीत देत या जोडीने थेट राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आणि यानंतर अजय-अतुलने कधी मागे वळून पाहिलंच नाही. (National Award Winner Music Composers)

२०१६ मध्ये आलेल्या ‘सैराट’ (Sairaat) चित्रपटाचं संगीत लॉस एॅंजलिसच्या सोनी एमजीएम या जगातील सर्वात अत्याधुनिक साऊंड स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं होतं. हॉलिवूडमध्ये रेकॉर्ड होणारा हा पहिला चित्रपट होता. जितकं या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना सैराट केलं तितकंच अजय-अतुलच्या संगीताने लोकांना ‘याड लावलं’. मराठीत तर अजय-अतुलचं गाणं ज्या चित्रपटात असणार तो हिट होणार हे समीकरण फिक्स होतं आणि आजही आहेच. मराठीसह या जोडीने हिंदीतही ब्लॉकबस्टर गाणी प्रेक्षकांना दिली. ‘पानिपत’, ‘तानाजी’, ‘राम सेतु’, ‘झुंड’, ‘आदिपुरुष’, ‘मडगाव एक्सप्रेस’, ‘अग्नीपथ’ अशा हिंदी चित्रपटांचं संगीत कंपोझ केलं. तसेच, २००६ मध्ये त्यांनी ‘शॉक’ या तेलुगु चित्रपटालाही संगीत दिलं होतं. आणि आता पुन्हा एकदा ‘राणाबाली’च्या निमित्ताने त्यांनी तेलुगु इंडस्ट्रीत पुनरागमन केलं आहे. ग्लोबली मराठी संगीतसृष्टीला बहुमान मिळवून देणारी ही जोडी नक्कीच नवनवीन गाण्यांमुळे तरुन राहील यात शंका नाही. (Ajay-Atul Movies)

तसेच, रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या मराठीतील पहिल्या बिग बजेट चित्रपटाला देखील अजय-अतुल यांचंच संगीत असणार आहे. एकीकडे रितेश देशमुख, सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, जिनिलिया देशमुख, भाग्यश्री, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी अशी तगडी स्टारकास्ट असताना दुसरीकडे अजय-अतुलचं संगीत म्हणजे राजा सिवाजी हिट होणार यात दुमत नाहीच. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा आणि मल्याळम भाषेत ‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे २०२६ रोजी देशभरात रिलीज होणार आहे. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : रॉकिंग स्टार यशच्या Toxic ची रिलीज डेट बदलली; ‘धुरंधर २’ला रान मोकळं मिळणार?
================================
तर, ‘राणाबाली’ या त्यांच्या आगामी तेलुगु चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा लग्नानंतर हा पहिला एकत्रित चित्रपट असणार आहे. ‘राणाबाली’ ही फक्त एक प्रेमकथा नसून १८५४ ते १८७८ या काळातील रायलसीमा भागाच्या इतिहासावर चित्रपटाचं कथानक आधारित आहे. या चित्रपटात ब्रिटीश काळातील संघर्ष आणि शोषण दाखवण्यात आलं असून विजय फ्रीडम फायटर राणाबाली यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका राणाबाली यांच्या पत्नी जय्यमा यांच्या भूमिकेत झकणार आहे. राहूल संस्कृत्यान यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड वोस्लू खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट देशभरात तेलुगू सह तमिळ, मल्याळम, हिंदी आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. (Vijay Devarkonda & Rashmika Mandanna Marriage)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi