मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
नवाजुद्दीन सिद्दीकी: वॉचमन बनला ‘मस्ट वॉच’ अभिनेता
बॉलीवूड… मायानगरी मुंबईची लखलखती दुनिया… या बॉलीवूडवर भाळून कित्येक हौशी चित्रपटवेडे मुंबईकडे धाव घेतात. सर्वप्रथम घड्याळाच्या काट्यावर पळणाऱ्या या महानगराशी आपला वेग जुळवायचा प्रयत्न करतात. त्यानंतर सुरु होतो संघर्ष, इथं काम मिळवण्याचा. हा संघर्ष सुरु झाल्यावर या चकाकत्या जगाला लागलेली गंज दिसू लागते. नेपोटीझम, फेवरेटीझम, कास्टिंग काऊचसारख्या अडथळ्यांची शर्यत पार पाडताना नाकी नऊ येतात. जे ही शर्यत पार करतात, ते सगळेच आपले अंगभूत कलागुण दाखवून कुठलं ना कुठलं काम मिळवून घेतात. बहुतांश कलाकार ही शर्यत पार पडेपर्यंत अल्पसंतुष्टी हेच सुख मानू लागतात. पण काहीजण आपली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रतिभेच्या जोरावर या इंडस्ट्रीत ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळपद प्राप्त करतात. भारतीय चित्रपटसृष्टीच्या नभांगणात अढळपद मिळवलेला असाच एक स्वयंप्रकाशित ध्रुवतारा – नवाजुद्दीन सिद्दीकी! (Nawazuddin Siddiqui Career)
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एकापेक्षा एक हिट भूमिका सिनेरसिकांच्या हृदयात घर करून आहेत. एखाद्या चित्रपटात, वेबसिरीजमध्ये नवाज आहे म्हणल्यावर प्रेक्षक त्या कलाकृतीच्या दर्जाबद्दल अगदीच निर्धास्त होऊन जातात. आज भारतातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये नवाजचंही नाव आवर्जून घेतलं जातं. पण हे चित्र एका रात्रीत निर्माण झालेलं नाही, त्यामागे नवाजने साकारलेल्या कित्येक दुर्लक्षित भूमिकांचा मोठा वाटा आहे.
कधी बनला वॉचमन, तर कधी भाजीवाला!
शेतमजुरी करणाऱ्या नवाजच्या आईवडीलांना एकूण अकरा मुलं आणि त्यांत नवाज सर्वांत मोठा! साहजिकच भावंडांची सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. गावातल्या रामलीलेमध्ये मित्राला रामाची भूमिका करताना त्याने पाहिलं आणि ही भूमिका आपणही उत्तमरित्या साकारू शकतो, असं त्याला वाटलं. त्यानंतर अभिनयाचं खूळ डोक्यात घेऊन नवाजने सर्वप्रथम दिल्लीचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) गाठलं. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने इतरांप्रमाणेच मुंबई गाठली. घरची परिस्थिती हलाखीची होती. नवखा असल्यामुळे इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी दररोज नवनव्या अडचणींचे डोंगर चढावे लागत होते. त्या दिवसांत आपला खर्च भागावा आणि उधारी चुकती व्हावी यासाठी त्याने वॉचमनचं काम स्वीकारलं. फावल्या वेळेत तो कोथिंबीरीच्या जुड्याही विकत फिरू लागला. (Nawazuddin Siddiqui Career)
‘सरफरोश’ ठरला पहिला चित्रपट!
NSDचा विद्यार्थी असलेला नवाज सुरुवातीला कुठल्याही चित्रपटात कोणतीही भूमिका करायला तयार होता. जवळपास शंभरेक चित्रपटांसाठी त्याने ऑडिशन्स दिल्या होत्या पण पदरी अपयशच येत गेलं. १९९७ला आलेल्या जॉन मॅथ्यू मथान दिग्दर्शित ‘सरफरोश’मध्ये त्याला एक छोटी भूमिका मिळाली आणि हेच त्याचं बॉलीवूडमधलं पदार्पण ठरलं. ‘सरफरोश’ सुपरहिट झाला पण नवाजची ती छोटीशी भूमिका फारशी कुणाच्या लक्षात राहिली नाही. पुढच्याच वर्षी आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शीत ‘शूल’मध्येही त्याला अश्याच एका छोट्या भूमिकेत पाहण्यात आलं.
पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’!
मनोजचा ‘सत्या’ हिट झाला होता आणि त्याच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील भूमिकेचाही त्यावेळी बोलबाला होता. त्यामुळे मोठा पडदा नाही तर छोटा पडदाच सही, असा विचार करून नवाजने बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये काम शोधायला सुरुवात केली. त्यादरम्यान ‘मुन्नाभाई MBBS’मध्ये पाकीटमाराची भूमिका आणि इरफान खान सोबत ‘द बायपास’ नावाची एक शॉर्टफिल्म वगळता त्याला कुठेही आपल्या अभिनयाचं प्रदर्शन करता आलं नव्हतं. खर्च भागवण्यासाठी तो अभिनयाचे धडे देणाऱ्या कार्यशाळा आयोजित करू लागला पण त्यातून येणारं उत्पन्नही कमीच पडत होतं. जेव्हा घराचे भाडे देण्यासाठीही पैसे पुरेनात, तेव्हा तो NSDमधल्या त्याच्या सिनीयरच्या फ्लॅटवर राहू लागला; आणि तेही त्याच्या फ्लॅटमेट्सला जेवण बनवून देण्याच्या अटीवर! (Nawazuddin Siddiqui Career)
======
हे देखील वाचा – गुल्लक : सुखदुःखाची मध्यमवर्गीय झलक
======
‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधून मिळाली खरी ओळख!
‘मुद्दा’, ‘मनोरमा’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’सारख्या फ्लॉप आणि सेमीहिट फिल्म्सबरोबरच दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या काही फिल्म्समध्येही नवाजला भूमिका मिळत होत्या पण त्या फार मोठ्या लांबीच्या नव्हत्या. त्यातल्या त्यात ‘देव डी’मधलं ‘तेरा इमोसनल अत्याचार’ या गाण्यातला त्याचा कॅमिओ लक्षात राहिला. त्यानंतर ‘पिपली लाईव्ह’, ‘पतंग’, ‘न्यूयॉर्क’, ‘देख इंडियन सर्कस’सारख्या चित्रपटांमध्येही तो दिसला. २०१२ला आलेल्या सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी’मध्ये त्याला इंटेलिजन्स ऑफिसर खानची भूमिका मिळाली. त्याच वर्षी आलेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ (Gangs of Wasseypur) ने फैजल खानच्या भूमिकेतील नवाजला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. याच्याच सिक्वेलमध्ये नवाजने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत त्याचं या इंडस्ट्रीतलं स्थान पक्कं केलं. यानंतर मात्र नवाजने आजतागायत कधीही मागे वळून पाहिलं नाही. (Nawazuddin Siddiqui Career)
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही!
कधीकाळी मुंबईत काम शोधत वणवण फिरणाऱ्या नवाजला २०१९ मध्ये चक्क मुंबईच्या बापमाणसाची, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें’ची भूमिका साकारता आली. रमण राघव, दशरथ मांझी, सआदत हसन मंटो या भूमिकाही त्याने आपल्या अभिनयाने अजरामर केल्या. नेटफ्लिक्सच्या ‘सॅक्रेड गेम्स’मध्ये गणेश गायतोंडेच्या भूमिकेतून त्याने चित्रपटांप्रमाणेच वेबसिरीजेसच्या विश्वातही आपला दबदबा निर्माण केला. इतक्या वर्षांच्या अथक मेहनतीच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव आता भारतीय चित्रपटसृष्टीतलं चलनी नाणं बनलं आहे. प्रत्येक फिल्मगणिक त्याच्या अभिनयाचा उंचावत जाणारा दर्जा आणि लोकप्रियता बघून “कभी कभी लगता है ‘नवाज’ईच भगवान है..” (Nawazuddin Siddiqui Career)
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, फैजल खान!!