दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘महाराष्ट्राचे शेक्सपिअर’ राम गणेश गडकरी
श्रेष्ठ नाटककार, कवी, विनोदकार अशा तिन्ही भूमिका अत्यंत चोख बजावण्यासाठी हवी उत्तुंग प्रतिभा. अशा प्रतिभेचं लेणं लाभलेले मराठी सारस्वत म्हणजे राम गणेश गडकरी (Ram Ganesh Gadkari). महाराष्ट्राचे शेक्सपिअर म्हणून त्यांचा सार्थ उल्लेख होतो. गोविंदाग्रज या नावाने कविता लेखन, बाळकराम नावाने विनोदी लेखन करणा-या गडक-यांच्या जन्मदिनानिमित्त उजाळा देऊया काही आठवणींना.
त्यांचा जन्म गुजरात राज्यातील नवसारी इथे झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर संस्कारक्षम वयातच पडला. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी ‘मित्रप्रीती’ नावाचे नाटक लिहिले काव्यलेखानाच्या बाबतीत ते स्वतःस केशवसुतांचे ‘कट्टे चेले’ म्हणवीत. त्यांची काव्यशैली मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. ‘अल्लड प्रेमास’ (१९०९) ही गडकऱ्यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. (Ram Ganesh Gadkari)
प्रेमसंन्यास (१९९३) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतरची त्यांची पुण्यप्रभाव (१९१७). एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) व राजसंन्यास (१९२२, अपूर्ण) अशी नाटक रंगभूमीवर आली. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. (Ram Ganesh Gadkari)
वाग्वैजयंती (१९२१) ह्या नावाने त्यांच्या कविता संग्रहीत केलेल्या आहेत. त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम (१९२५) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. याशिवाय गडकऱ्यांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी (१९६२) ह्या नावाने प्रल्हाद केशव अत्रे यांनी संपादित केले आहे. चिमुकली इसापनिती हे त्यांचे सर्वात छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. (Ram Ganesh Gadkari)
राम गणेश गडकरी त्यांच्या हजरजबाबीपणाबद्दल ओळखले जात. अत्रे गडकऱ्यांना गुरुस्थानी मानत. आपला पहिला काव्यसंग्रह ‘फुलबाग’ लिहून झाल्यावर त्याची वही घेऊन अत्रे, राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले. काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं कशी काय वाटली फुलबाग? वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले “फुलबाग चांगली आहे. कुंपण तेवढ नीट घाला!”
अशा या थोर साहित्यिकाचा मृत्यू क्षयरोगाने वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी झाला. काही नाटककार काळाच्या ओघात कधीच विस्मृतीत जात नाही. त्यांची नाट्यकला, शब्दसंपदा पेलणं नव्या पिढीलाही आव्हानात्मक वाटतं. गडक-यांची नाटकं म्हणूनच आजच्या पिढीलाही खुणावतात. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आठवताना त्यांचं कालातित असणं अधोरेखित होत रहातं.