‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मायबापा विठ्ठला: अजय- अतुलच्या शब्द -स्वरांनी पाणावले डोळे!
वारी! वारी म्हटलं की महाराष्ट्राच्या तमाम विठ्ठल भक्तांच्या मनात प्रेमाचं भरतं येतं. वारी म्हणजे निस्सीम भक्तीचा प्रवास, वारी म्हणजे अभंग, वारी म्हणजे ग्यानबा-तुकारामचा गजर, वारी म्हणजे कित्येक पिढ्यांची अढळ निष्ठा आणि अखंड चालत आलेली परंपरा! पण गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे वारीच्या परंपरेलाही ‘स्थगिती’ देण्यात आली. अर्थात नाईलाज होता. परिस्थितीच अशी होती की, सगळेच हतबल होते.
कोरोना नावाच्या अभूतपूर्व संकटामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातही अनेक बदल घडले. आपण सर्वांनी ते स्वीकारले. पण दरवर्षी विठ्ठल भेटीची आस घेऊन वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मात्र ‘वारी नाही’ हे पचवणं थोडं अवघड गेलं. ‘युगे अठ्ठावीस’ चालू असणारी वारी परंपरा थांबल्याचे शैल्य आणि विठ्ठलभेटीची आस वारकऱ्यांना जिवंतपणीच मरणयातना देत होती.
संकर्षण कऱ्हाडे या गुणी कवीने आपल्या कवितेतून मांडलेली वारकऱ्यांची व्यथा वाचून मन हेलावून गेलं आणि त्यानंतर आलेल्या “मायबापा विठ्ठला” या गाण्यामधील अजय अतुल यांच्या शब्द-स्वरांनी डोळ्यातलं पाणी नकळत गालांवर ओघळलं.
कोरोनामुळे गेल्या कित्येक वर्षात जे घडलं नाही, ते घडत होतं. माणासासकट देवही ‘लॉक’ झाले होते. गाभाऱ्याला लागलेलं कुलूप बघून देवळाच्या पायरीवर हताशपणे बसलेले भक्त, खेळायच्या वयात घरातच बंदिस्त झालेली मुलं आणि जगण्याची लढाई लढणारे कित्येकजण हतबल झाले. एरवी सुट्टी मिळाल्यावर खुश होणाऱ्या मुलांचे उत्साही चेहरे काही काळातच काळवंडून गेले. शाळेच्या आठवणीत मुलं सुट्टी विसरून गेली.
सगळ्यांनाच ही न केलेल्या गुन्हयाची शिक्षा म्हणजेच लॉकडाऊनच्या रुपात मिळालेला हा तुरुंगवास नकोसा झाला. तरीही देवाची इच्छा म्हणून माणसाने हे सारं स्वीकारलं. पण जसजसा लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला, तसतसा माणसाचा संयम सुटत गेला आणि हतबल झालेला माणूस परिस्थितीबद्दल चक्क परमेश्वरालाच जाब विचारू लागला.
वारी नसल्यामुळे विठ्ठल भेटीसाठी झालेली जीवाची तगमग, वारीच्या आठवणी, परिस्थितीमुळे आलेली अगतिकता आणि एकूणच लॉकडाऊनच्या काळातील मानसिकता याचा प्रत्यक्ष अनुभव अजय -अतुल यांच्या “मायबाप विठ्ठला” या गाण्यातून मिळतोय.
तुळशीमाळ ही श्वासांची, तुटे धाव विठ्ठला
जीव झाला कासावीस, रूप दाव विठ्ठला
गाण्याच्या सुरुवातीचे हे शब्द ऐकूनच मन गहिवरून येतं आणि गाणं संपलं तरी आपण मात्र त्या गाण्यामध्येच अडकून राहतो. मुकुंद भालेराव यांनी लिहिलेलं हे गाणं गायलं आहे अजय गोगावले यांनी तर, गाण्याच्या शेवटी अतुल गोगावले यांच्या आवाजात प्रत्यक्ष परमेश्वराने केलेलं सांत्वन ऐकताना ऊर श्रद्धेनं भरून येतं.
सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन?
आता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो
बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो…
रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गस्त घालणारे पोलीस, जीवाचं रान करून रुग्णांना वाचवणारे आणि त्यांची सेवा करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि एकूणच सर्व क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांच्या रुपात मी तुम्हाला भेटतोय, हे संकटही जाईल फक्त थोडा काळ सरायला हवा, तोपर्यंत मात्र धीर धरून घरट्यातच राहा. अशा शब्दात भक्तांना आश्वस्त करणारी विठू माऊली शेवटी म्हणते-
साथीत या साथ द्याया मी इथेच राहीन
सारे निवारून मग पंढरीस जाईन
बाळा चंद्रभागे तीरी तुझी वाट मी पाहीन…