‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सुमन कल्याणपूर: संगीताच्या क्षेत्रामधलं एक सुरेल नक्षत्र
अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस. आजच्या बांगलादेशमधील भवानिपूर येथे २८ जानेवारी १९३७ रोजी त्यांचा जन्म झाला. सुमन कल्याणपूर यांचे माहेरचे आडनाव होते हेमाडी. लग्नापूर्वी ती सुमन हेमाडी नावानेच गात असे. घरातील वातावरण एकदम कलासक्त/रसिक आणि धार्मिक असल्यामुळे तिच्या लहान वयातच तिच्यावर चांगले संस्कार झाले होते.
लहानपणी ती खूप छान चित्र काढायची. पुढे मुंबईत आल्यावर तिने चक्क जे. जे. स्कुलमध्ये काही काळ चित्रकलेचे धडे गिरवले. घरात रेडीओ अव्याहतपणे चालू असायचा. सैगल, नूरजहान, खुर्शीद, सुरैया यांच्या अप्रतिम गाण्यांनी धुंद झालेला तो काळ होता. सुमन सदैव गाणी गुणगुणत असे. नाटककार मो. ग. रांगणेकर, केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे या कलावंत मंडळीची त्यांच्या घरी उठबस होती. अशा या अस्सल जोहारींकडून सुमन सारखा हिरा गवसला नसता तर नवलच होते.
तिच्या संगीताच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला तो यशवंत देव यांच्याकडे. देवांनीच तिला पहिल्यांदा चित्रपटकरीता गाण्याची संधी दिली. हा सिनेमा कधी आलाच नाही. पण या गाण्याच्या ध्वनी मुद्रणाच्या वेळी हिंदी चित्रपटाचे संगीतकार महंमद शफी तिथे हजर होते. त्यांना सुमनचा आवाज आवडला व लगेच त्यानी त्यांच्या ‘मंगू’ सिनेमाकरीता तिला साईन केले.
“कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे” हे तिचं रूपेरी पडद्यावरच पाहिलं गीत. सुमनच्या कंठाची मूळ प्रकृती नाजूक आणि तरल असल्याने अतिरेकी रियाज तिच्या गळ्याला मानवायचा नाही. म्हणूनच कदाचित ती शुद्ध शास्त्रीय आणि नाट्य संगीताच्या फारशी वाट्याला गेली नसावी.
सुमन गायकीच्या क्षेत्रात आली (१९५४) त्यावेळी लताचा स्वर आसमंतात संपूर्ण तेजाने चमकत होता. आशाचा देखील तो उमेदवारीचा कालखंड होता. शमशाद, गीतादत्त, सुरैया या लताला सिनियर असलेल्या गायिका कार्यरत होत्याच. स्पर्धा जबरदस्त मोठी होती. अशा या वातावरणात सशाचं काळीज असलेल्या सुमनला आपलं अस्तित्व टिकवणं हेच मुळात महाकठीण होतं. पण तिने एक केलं, तन्मयतेनं आपलं काम करीत राहिली.
तिच्या वाट्याला गाणी येणार तरी कोणती? या सर्व गायिकांनी नाकारलेली किंवा त्याचं मानधन न परवडू शकणारी. ‘ए’ ग्रेडचे संगीतकार, चित्रपट तिच्या वाट्याला फारसे आलेच नाहीत.आले ते बी किंवा सी ग्रेडचे मारधाड, जादूटोणा ,धार्मिक,पोशाखी सिनेमे.
याही परिस्थितीत सुमनच्या स्वरातील माणिकमोती रसिकांना मिळत गेले. यामध्ये विशेष उल्लेखनीय गाणी म्हणजे- परबतो के पेडो पर शाम का बसेरा है (शगुन), गरजत बरसात सावन आयोरे (बरसात की एक रात), ये मौसम रंगीन समा (मॉडन गर्ल), न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने (बात एक रात की),कहती है झुकी झुकी नजर (जिंदगी और ख्वोब), ठहरीये होश मे आलू तो चले (मोहब्बत इसको कहते है),जबसे हम तुम बहारो मे (मैं शादी करने चला), तुम जो आओ तो प्यार आजाये जिंदगी मे बहार (सखी रॉबिन), जुही कि कली मेरी लाडली (दिल एक मंदिर), अगर तेरी जलवा नुमायी न होती (बेटी बेटे), तुझे प्यार करते है करते रहेंगे(एप्रिल फूल), हाले दिल उनको सुनाना था सुनाया न गया (फरियाद),अजहून आये बालमा सावन बीता जाय (सांज और सवेरा), ना ना करते प्यार तुम्ही से (जब जब फूल खिले), इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार (सूरज), तुमसे ओ हसीना कभी मुहोब्बत न मैने करनी थी (फर्ज), आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर (ब्रह्मचारी), मेरा प्यार भी तू है ये बहार भी (साथी), मेरे मेहबूब न जा आज की रात न जा (नूर महल), चले जा चले जा चले जा (जहां प्यार मिले), मन मेरा तुझको मांगे दूर दूर भागे (पारस).
=====
हे देखील वाचा: …आणि पं. भीमसेन जोशी यांनी दोन तासात सादर केला नवा अभंग!
=====
सुमन-रफी ने गायलेल्या “मन मोहन मन मे हो तुम्ही (कैसे कहू)” या गीताला तर मानाचा तानसेन पुरस्कार लाभला. हिंदीत विशेषतः १९६५ नंतर लता-रफी यांच्यात काही काळ वितुष्ट आल्याने रफी-सुमनची बरीच गाणी आली पण त्या दोघांमध्ये पुन्हा एकोपा निर्माण झाल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! पण सुमनने कधीच याबाबत खंत बाळगली नाही. त्यामुळे एक समाधानाची तृप्त छाया नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.
तिच्या समकालीन गायिकांचा विचार करता मंगेशकर भगिनींच्या पुढे टिकून स्वतः ला सिद्ध करणारी ती एकमेव गायिका ठरली. सुमनचे चाहते आजही देश विदेशात पसरलेले आहेत. देश विदेशात तिच्या गाण्याचे भरपूर कार्यक्रम झाले. बी.बी.सी.वर मुलाखत देणारी ती पहिली कलावंत ठरली. त्यांचा स्नेह, आप्त स्वकीयांची आत्मीयता आणि रसिकांचे प्रेम यात आज २८ जानेवारी २०२२ रोजी सुमन ८६ व्या वर्षात तृप्त म`नाने प्रवेश करते आहे. सच्च्या कलावंताला आणखी काय हवं असतं?