‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
ती फुलराणी- मंजुळा कालची आणि आजची
“तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकवीन चांगलाच धडा!”
‘ती फुलराणी’ म्हटलं की, हमखास डोळ्यासमोर येतो तो भक्ती बर्वे – इनामदार यांचा करारी चेहरा. मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर २५ पेक्षा जास्त नाटकांमध्ये भूमिका करणाऱ्या भक्ती बर्वे यांच्या कारकिर्दीमधला ‘माईलस्टोन’ म्हणजे ती फुलराणी हे नाटक. अर्थात आई रिटायर होतेय, रंग माझा वेगळा, गांधी विरुद्ध गांधी अशी त्यांची इतर नाटकंही गाजली. परंतु, त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती ‘ती फुलराणी’ या नाटकामधील मंजुळेच्या भूमिकेमुळे.
२९ जानेवारी १९७५ रोजी म्हणजेच तब्बल ४६ वर्षांपूर्वी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे लिखित व दिग्दर्शित ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला होता. मुळात हे नाटक म्हणजे ती ‘जॉर्ज बर्नार्ड शॉ’ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.
भक्ती बर्वे हयात असेपर्यत ‘मंजुळा’ हे पात्र त्यांनी साकारलं. मंजुळा म्हणजे भक्ती बर्वे असं जणू एक समीकरणच रसिकांच्या डोक्यात पक्कं बसलं होतं. या नाटकाचे ११११ पेक्षा जास्त प्रयोग करत मंजुळाची भूमिका त्या अक्षरश: जगल्या होत्या. पुढे २००१ साली त्यांचे अपघाती निधन झाल्यावर, काही काळ प्रिया तेंडुलकर यांनी मंजुळाची भूमिका साकारली.
दुर्दैवाने २००२ साली प्रियाजींचे निधन झाले. त्यांनतर सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी मंजुळा साकारली. प्रत्येकीने आपल्या कसदार अभिनयाने मंजुळाच्या भूमिकेमध्ये जीव ओतला, पण रसिकांच्या मनात अजरामर राहिल्या त्या भक्ती बर्वेच! मंजुळाच्या भूमिकेत दुसऱ्या अभिनेत्रीला स्वीकारणं रसिकांना काहीसं अवघडच गेलं. म्हणूनच तर भक्ती यांच्या निधनानंतर एकापेक्षा एक उत्कृष्ट अभिनेत्रीनी ही भूमिका उत्तमरीत्या साकारुनही आजही “ती फुलराणी” म्हटल्यावर रसिकांच्या मनात फक्त आणि फक्त भक्ती बर्वे यांचेच नाव येते. नाही म्हणायला अमृता सुभाषने साकारलेली मंजुळा रसिकांनी काही प्रमाणात स्वीकारली, पण तरीही भक्ती बर्वे यांच्या आठवणी काही त्यांना पुसता आल्या नाहीत.
ती फुलराणी या नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरची एक अजरामर कलाकृती आहे. या नाटकासोबत रसिकांच्या सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या पुलंचं लिखाण म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असते. खुद्द सुनीताबाई देशपांडे यांनी पुलंच्या सर्व नाटकांच्या प्रयोगाचे हक्क कलाकारांसाठी खुले केले आहेत. त्यामुळे ‘ती फुलराणी’ या नाटकाला कॉपीराइट कायदा लागू होत नाही.
एवढं सगळं असताना ‘ती फुलराणी’ सारख्या अजरामर कलाकृतीला वाद-विवाद किंवा नाराजीचा डाग लागायलाच नको होता. तरीही तो लागलाच! पु लं देशपांडें यांनी या नाटकासाठी काही अटी लिहून ठेवल्या होत्या. त्यातली प्रमुख अट म्हणजे, “नाटकातला संवाद हा कवितेच्या ओळीसारखा असायला हवा.” त्यामुळे जरी नाट्य निर्माते व कलाकारांना कॉपीराइटचा प्रश्न नसला तरी त्यांनी या अटींचे पालन करावे, ही माफक अपेक्षा होती.
एखाद्या सुंदर कवितेच्या ओळीतले शब्द जसे बदलता येत नाहीत, तसे चांगल्या संवादातले शब्दही बदलता येत नाहीत. खरंतर ते बदलू नयेत कारण तसं केलं, तर त्या संवादाची धार बोथट होते. परंतु, असे असूनही दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकामध्ये काही बदल केले. या बदललेल्या नाटकात मंजुळाची भूमिका हेमांगी कवी या अभिनेत्रीने साकारली होती. परंतु, या बदलामुळे नाट्यरसिक नाराज झाले.
“आम्ही जी फुलराणी बघायला आलो होतो ‘ती फुलराणी’ ही नाही, असे भाव रसिकांच्या चेहऱ्यावर उमटले.” या नवीन प्रयोगासह सादर करण्यात आलेलं नाटक प्रेक्षकांना स्वीकारणं कठीण गेलं. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकच नाहीत, तर पुलंचे मानसपुत्र आणि जागतिक कीर्तीचे गणितज्ञ दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांनी जेव्हा हे नाटक पाहिलं तेव्हा या नाटकाच्या नवीन पद्धतीने करण्यात आलेल्या सादरीकरणावर आक्षेप घेतला. याचबरोबर डॉ. जब्बार पटेल, साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यासारख्या दिग्गजांनीही सादरीकरणातील बदलाबद्दल नाराजी व्यक्ती केली.
दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर याबद्दल आपली नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, ‘फार्सिकल’ करण्याच्या नादामध्ये नाटकाचा तोल बिघडला आहे. हे नाटक मूळ संहितेनुसार होत नसल्याचे समजले तेव्हा जाणीवपूर्वक हा प्रयोग पाहिला. हेमांगी कवी या अभिनेत्रीची भूमिका चांगली आहे. मात्र, विक्षिप्तपणा करून टाळ्या मिळविण्याचे प्रकार खटकतात. हे नाटक शब्दांवरचे आहे. पण, पुलंचे शब्द काढून काही ठिकाणी वेगळेच संवाद घुसडण्यात आले आहेत. गरज नसलेले संवाद आल्यामुळे ज्यांना शब्दांचे महत्त्व समजते त्यांचा विरस होतो. तुम्हाला पुलंचे शब्द नको असतील, तर नव्याने नाटक लिहून घ्या आणि ते करा. मात्र, फुलराणी नाटकाबाबत जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे.”
‘ती फुलराणी’ या नाटकाच्या सादरीकरणातील बदलावरून काही प्रमाणात नाराजीची नामुष्की ओढवली हे जरी खरं असलं तरीही, हेमांगी कवीने मात्र मंजुळाच्या भूमिकेला न्याय दिला, ही गोष्ट नाकारून चालणार नाही. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.
हे ही वाचा: अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
मायबापा विठ्ठला: अजय- अतुलच्या शब्द -स्वरांनी पाणावले डोळे!
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकतरी भूमिका अशी असते जी त्या कलाकाराची ओळख बनते. प्रिया तेंडुलकर यांची रजनी, सुकन्या कुलकर्णी – आभाळमाया, अमृता सुभाष – आसावरी (अवघाचि संसार). या कलाकारांव्यतिरिक्त इतर कोणालाही त्या भूमिकेत प्रेक्षक सहजी स्वीकारत नाहीत. याचा अर्थ इतर कलाकारांकच्या सादरीकरणाला मर्यादा असतात असा होत नाही. कारण कितीही उत्कृष्ट पद्धतीने भूमिका सादर केली तरी त्या ‘ठराविक’ कलाकाराची रसिकांच्या मनात तयार झालेली ‘छबी’ दूर करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे.
भक्ती बर्वे यांच्यानंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष आणि आता हेमांगी कवी या प्रत्येक अभिनेत्रीने आपल्या कसदार अभिनयाने मंजुळा सादर केली. भक्तीजींची मंजुळा अजरामरच आहे आणि राहील, पण या सर्व गुणी अभिनेत्रींनी आपल्या समृद्ध अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये ‘ती फुलराणी’ कायम जागी ठेवली. ही गोष्ट विसरून चालणार नाही.