‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
मैफिलीत जेव्हा भीमसेन जोशी यांचा स्वर लागला नाही तेव्हा नेमकं काय घडलं?
आपल्याकडे एखाद्याच्या गुणगौरवाची एकदा का लाट आली की, त्यात खरं काय आणि खोटं काय याचा पत्ता लागू नये आणि तो गुणगौरव उत्सव संपला की, काल आपण कुणाचं एवढं कोडकौतुक करत होतो याची आठवणही राहत नाही. कारण पाठोपाठ दुसऱ्या कोणाची तरी गुणगौरव लाट येते तरी वा आणली जाते. एकूण काय उत्सवामागून उत्सव येतचं असतात. ह्याला जबरदस्त अपवाद म्हणजे स्वरभास्कर भीमसेन जोशी!
भीमसेन जोशी यांच्या फसलेल्या मैफिलाचा जसा मी साक्षीदार आहे पण त्याच ठिकाणी परत दामदुपटीने एखाद्याचं देणं परत करावं या त्वेषाने भीमसेन यांनी जी मैफिल जमवली त्याचं वर्णन म्हणजे ज्याचं नाव ते असंच करावं लागेल. भीमसेन जोशी यांनी हे जे भरभरून दिलं आहे त्यापुढे त्याचं अधुरेपण कुठल्या कुठे गेलं म्हणजे त्याची आठवण सुध्दा राहिलेली नाही. विशेषत: त्यांचं भारतरत्न पण आणि जन्मशताब्दी वर्षात (जन्म ४ फेब्रुवारी १९२२) जी गुणगौरव गाथा आठवली. ती जणू न विसरण्यासाठीच त्यात कुठल्याही क्षिणपणाला, किंतूला, संशयाला जागाच नाही.
एक काळ होता भीमसेन यांच्या अतिरक्त मद्यपानामुळे अनेक मैफिल काळवटून गेल्या. त्याचं त्यांच्या चाहत्याना मनस्वी दुःख होत असे. ह्याचा शेवट असाच होणार का, ह्या चिंतेने जीव व्याकुळ होत असे. पण हा चक्रव्युह भीमसेन यांनी प्रयत्नपूर्वक भेदला आणि जणू एका नव्या भीमसेनचाच जन्म झाला तो झळाळत गेला. ती कीर्ती ध्वजा फडफडती राहिला ती शेवट पर्यन्त असं दुसरं उदाहरण – टोकाचं जगणं आणि त्यातनं सावरणं हे एकमेव भीमसेन जोशी यांचच!
उदारणाने बोलतो –
भीमसेन यांचा मुलगा जयंत जोशी मुंबईला जे. जे. आर्ट स्कुलमध्ये होता. त्यामुळे जे. जे. मध्ये त्यांची एक मैफिल ठरली. तत्पूर्वी ठरल्याप्रमाणे भीमसेन बांद्राच्या साहित्य सहवासमध्ये डोकावले. आधी मधुसुदन कालेकरांकडे बैठक करायची आणि मग वरती राजाराम हुमणेकडे, हे ठरून गेल होतं. राजाराम हुमणे तर म्हणायचे खाली तीर्थ घ्यायचं वरती प्रसाद, आमच्याकडे असा सत्यनारायण आम्हाला पावायचा.
तर, साग्रसंगीत समाचार घेऊन भीमसेन जे.जे.त दाखल झाले. मुलं तर केव्हापासून वाट पाहत होती. भीमसेन बैठकीवर विराजमान झाले. पण आवाज लागेचना! खूप वेळा प्रयत्न करूनही लागेना… अगोदरच्या तीर्थप्रसादाचा तो परिणाम होता. आता रागरंग पाहून खुद्द भीमसेनच म्हणाले, “मुलांनो मला तासदीड तास द्या मग पहाच…!”
अर्थात, मुलांपुढे दुसरा मार्गच नव्हता. भीमसेन उठले. एका खोलीत जाऊन ते आडवे झाले. आडवे होता होता म्हणाले तासाने मला उठवायचं मी जर उठलो नाही तर…! एकंदर काळजी कारण्यासारखीचं परिस्थिती होती. पण बरोबर तासाने खरोखरंच ते आपणहून उठले. (पुढे कळलं ते तीन तीन दिवस सतत मैफिल करू शकत असत तसेच तीन-तीन दिवस झोपू देखील शकत होते. मध्ये जेवणाखाण्यासाठी उठणं हाच तेवढा व्यत्यय.)
भीमसेन उठले. बाथरूमध्ये जाऊन डोक्यावर थंड पाण्याच्या बादल्या बदाबदा ओतल्या. बाहेर येऊन पांढरे फेक कपडे केले आणि आता बैठकीवर आले आणि उंच टिपेचा असा स्वर लावला की पांगलेली जे.जे.ची जी मुले आधी फिदीफिदी हसत पांगलेली होती, कुजबुजत होती- “काय हा गायक…”ती एका आलापामुळे जणू हाकेसारावी चमकून स्थानापन्न झाली. त्यानंतर एकामागून एक भीमसेन आपली स्वरकिमया उलगडून दाखवत राहिले.
सर्व श्रोते मंत्रमुग्ध! सकाळच्या सुर्याची किरणे प्रांगणात उतरली तेव्हा सगळ्यांना कळलं उर्वरीत रात्र भीमसेन यांनी जागवली सुरेल गाजवली! हे रेकॉर्ड आजतागायत कोणी मांडू शकले नाही.
कुठल्या मोहात पडायचं आणि कुठल्या नाही ह्याचं भीमसेन जोशींच गाणित असलं पाहिजे. राजीव गांधीना भीमसेन यांनी दिल्लीत यावे, अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांना राज्यसभेची सीट द्यायची तयारीही त्यांनी दाखवली. तसे निरोप गेले. तसा हा एक प्रकारे सरकारने कलवंताचा केलेला सन्मानच होता. त्यात वावगे काहीचं नव्हते.
पण भीमसेन जोशी यांनी नम्रपणे कळवले. “तुमच्या सदिच्छा मिळाल्या आभारी आहे. पण मी दोन तंबोऱ्याच्या मध्ये गायला बसतो तेव्हा डाव्या बाजूचा तंबोरा ही माझी लोकसभा असते आणि उजव्या बाजूचा तंबोरा राज्यसभा असते. सबब तेथे मी आणि अनभिषिक्त राजा असतो. कुणाच्या मेहरबानी ने नाही.”
=====
हे देखील वाचा: …आणि पं. भीमसेन जोशी यांनी दोन तासात सादर केला नवा अभंग!
=====
आणखी एक त्यांची आठवण,
भीमसेन घरातून पळून गेले. गायनाचे शिक्षण घेतलं ह्याचं कोडकौतुक फारच होऊ लागलं तेव्हा ते एकदा म्हणाले, “माझ्या पळून जाण्याचं कौतुक कसलं करताय? मी जणू सर्व काही सोडून गाण्याचा ध्यास घेतला म्हणून आज मी येथपर्यंत येऊन पोचलो आहे. मी जर वाया गेले असतो, तर तुम्ही माझ कौतुक केलं असतं काय?”
भीमसेन ह्याचं सर्वकश भानहोतं ते असं. त्यांच्या गाण्याबरोबर ह्या आठवणी देखील खूप काही सांगणाऱ्या आहेत. सुदैवाने त्याची खूप गाणी आता उपलब्ध आहेत. पण आठवणी, त्या ज्यांच्या कडे आहेत त्यांनी जागवल्या पाहिजेत. त्यातलाच हा थोडासा प्रयत्न!
– रविप्रकाश कुलकर्णी
(जेष्ठ लेखक/ पत्रकार)