पांघरूण: अ’व्यक्त’ प्रेमाचा फुटलेला बांध
प्रेक्षकांच्या मनाला अबोल प्रेमाची सुमधुर हाक, हा ‘पांघरूण’ सिनेमा देतो. मेकर्सनी दावा केल्याप्रमाणे ‘एक विलक्षण प्रेमकहाणी’ त्यांनी आपल्या समोर मांडली आहे. त्या प्रेमकहाणीचे पैलू व्यक्तिनुरूप, प्रेक्षकांच्या बुद्धीच्या आकलन क्षमतेनुसार बदलतील. पण, हा सिनेमा समजून किंबहुना उमजून घेण्यासाठी काहीसा अवजड असला, तरी त्यातील सुमधुर संगीत मनाचा ठाव घेते. परिणामी सिनेमा; त्यातील पात्र, कथानक आणि महत्वाचं म्हणजे तो ‘संदेश’ आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही.
साठच्या दशकातील काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी ही विलक्षण प्रेमकहाणी आपल्याला ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘पांघरूण’ चित्रपटातून उमगते. ज्येष्ठ लेखक बा. भ. बोरकर यांच्याच ‘पांघरूण’ या मूळ कथेवरच मांजरेकरांनी हा सिनेमा लिहायला आणि गणेश मतकरी याने त्यावर मर्मपूर्ण संवादांचा साज चढवला आहे, तर त्यावर कळस चढवण्याचे काम; गौरी इंगवले, रोहित फाळके, अमोल बावडेकर, सुलेखा तळवलकर या कलाकारांनी त्यांच्या अभिनयकौशल्यानं करुन दाखवलंय. त्या देवळावर गगनाला भेदून फडकत असलेला झेंडा आणि पताका या गायक, संगीतकार आणि गीतकाराने रोवल्या आहेत. या अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या देवळाची अनुभूती आपल्याला ‘पांघरूण’ सिनेमा पाहताना होते. पण, या देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पाचही ज्ञानेंद्रीयांना सक्रिय करावं लागेल.
सिनेमाची कथा एका सतरा अठरा वर्षाच्या मुलीची असून वडिलांच्या वयाच्या माणसासोबत लग्न झाल्यावर तिचा जीवनप्रवास कशा प्रकारे होतो, यावर सखोल प्रकाश टाकणारा आहे.
‘लाटा सुखाच्या उठती मनी
काहूर जागे हळव्या क्षणी
अजाणता जसा तोल जावा
वार खोल जावा’….
ही काव्यरचना त्या लक्ष्मीच्या (गौरी इंगावले) मनातील ‘व्यक्त’ आणि ‘अव्यक्त’ भावनांना मार्ग मोकळा करून देणारी आहे. कारण, वरवर सिनेमाची ही गोष्ट आपल्याला हिरमुसलेल्या विधवा मुलीची वाटली, तरी ती गोष्ट आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या सोबत भूतकाळात घडलेल्या किंवा भविष्यात कदाचित घडू पाहणाऱ्या घटनांचा ‘वर्तमान’ आणि त्यांचा ‘परिणाम’ आहे. त्यामुळे हा सिनेमा आपल्या अशा अनेक आरश्यांसमोर उभा करतो; ज्यात आपण स्वतःच प्रतिबिंब पाहू शकतो. जरी आपण आरशा समोर डोळे मिटले तरी मनाला सत्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
विधवा असलेल्या लक्ष्मीचं दुसरं लग्न होऊन ती आता अंतू गुरुजी (अमोल बावडेकर) यांच्या घरी आली आहे. गुरुजींना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. लक्ष्मीने या मुलींचं संगोपन आणि घराचा सांभाळ करणं हेच गुरुजींना अपेक्षित होतं. म्हणूनच त्यांनी लक्ष्मीशी लग्न केलेलं असतं. पण, लग्न ही केवळ औपचारिकता नसते. त्यानिमित्तानं मन आणि शरीरही जवळ येत असतात. परंतु, अंतू गुरुजी हे त्यांच्या पहिल्या पत्नींच्या कोषातून बाहेर आलेले नसतात (पहिली पत्नी जानकी.. जिचं निधन झालं आहे.) जे ‘सुख’ लक्ष्मीला तिच्या नवऱ्यापासून अर्थात अंतू गुरुजीपासून अपेक्षित असते; ते ‘सुख’ तिला मिळत नसते. हा ‘सुखाचा’ मार्ग ती कसा? कुठे? कधी? शोधते किंवा परिस्थिती वा योगायोग ते जुळवून आणते की नाही? याची समर्पक गोष्ट सिनेमात आपल्याला पाहायला मिळते.
ही गोष्ट डोळ्यांना सुखावते आणि कानांना सुमधुर आवाजाने स्पर्श करते. हितेश मोडक, सलील कुलकर्णी, पवनदीप राजन, अजित परब यांची संगीत रचना; वैभव जोशी यांचे शब्द आणि विजय प्रकाश, पवनदीप राजन, आनंदी जोशी, केतकी माटेगावकर, सत्यम कुमार, आनंद भाटे, प्रथमेश लघाटे यांच्या आवाजाने सिनेमाला सुरेल सप्तसुरांची ‘पांघरूण’ ओढली आहे. जी आपल्या मनाच्या प्रेम भावनेनेची उब देते. ही भावनेची उब ज्याप्रमाणे प्रेक्षक म्हणून आपल्याला मिळते, तशीच ती कथारूपी प्रत्यक्ष कथानकात येणाऱ्या अभंगांच्या रूपाने कथानकातील पात्रांना देखील मिळते. परिणामी ही दृश्य आणि संगीताची सरमिसळ आपल्याला विलक्षण अनुभव देणारी ठरते.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शकीय पैलू या सिनेमात आपल्याला चहुबाजूंनी दिसतात. कथानकाचे बहुआयामी पैलू त्यांनी पडद्यावर उभे केले आहेत. ते पैलू आपल्याला कलाकारांच्या अभिनय कौशल्यात देखील दिसतात. कारण, तितक्याच ताकदीने सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका निभावल्या आहेत.
गौरी इंगावले हिची नृत्य आणि अभिनय प्रतिभा नक्कीच कौतुकास्पद आहे. तिने साकारलेली ‘लक्ष्मी’ सिनेमा संपल्यानंतरही आपल्या स्मरणात राहते. तर दुसरीकडे अमोल बावडेकर याने अंतू गुरुजी ही भूमिका अत्यंत शिताफीने साकारली आहे. उत्तरार्धातील त्यांचा अभिनय अवाक करणारा आहे.
माधवच्या भूमिकेत असलेल्या रोहित फाळके याने ही भूमिका साकारताना नक्कीच भूमिकेचा सखोल अभ्यास केल्याचे जाणवते. कारण, त्याची भूमिका कथानकात दिसायला काहीशी अप्रिय असली तरी त्या भूमिकेच्या मनातील भाव त्याने अचूक पकडले आहेत. त्या भूमिकेचा परिणाम प्रेक्षकांवर नक्कीच होतो. त्यामुळे असं नक्कीच म्हणायला हवं की, रोहित एक अभिनेता म्हणून.. ‘लंबी रेस का घोडा है..’ आता यापुढेही त्याला सिनेमात शीर्षक भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल.
सिनेमा अभिनयानुरूप परिपूर्ण करण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे. पण, सिनेमांचा संथ वेग पाहून प्रेक्षकांना कंटाळा येऊ शकतो. वेळोवेळो सिनेमातील गाणी आणि अभंग आपल्याला सिनेमाशी बांधून ठेवतात. परंतु, काही प्रसंगांकडे आपण दुर्लक्ष करतो. हे कदाचित चंचल प्रेक्षकांबाबत अधिक होऊ शकतं. पण, ज्यांना शास्त्रीय संगीताची गोडी आहे त्या प्रेक्षकांना हा सिनेमा ‘बासुंदी’च्या मेजवानी सारखा आहे. पण, आता असं समजू नका की, इतर सर्वसामान्य प्रेक्षकांनी या स्वादिष्ट मेजवानी आस्वाद घेता काम नये. प्रत्येकाने नक्कीच या सुमधुर सिनेमाचा आस्वाद नक्कीच घ्यावा.. मग बघा, “वाह!.. क्या बात है..!” हे उद्गार तुमच्या तोंडी येतील.
सिनेमा : पांघरूण
दिग्दर्शक : महेश वामन मांजरेकर
संवाद : गणेश मतकरी
कलाकार : गौरी इंगावले,अमोल बावडेकर, रोहित फाळके, सुलेखा तळवलकर
संगीत रचना: हितेश मोडक, सलील कुलकर्णी, पवनदीप राजन, अजित परब
गीतकार : वैभव जोशी
गायक : विजय प्रकाश, पवनदीप राजन, आनंदी जोशी, केतकी माटेगांवकर, सत्यम कुमार, आनंद भाटे, प्रथमेश लघाटे
दर्जा : चार स्टार
– आरमार