Writing with Fire: ऑस्करचे नामांकन मिळालेला हा माहितीपट नक्की कशावर आधारित आहे?
काल भारतातील सोशल मीडियावर बोलबाला होता, तो ‘रायटिंग विथ फायर (Writing with Fire) या माहितीपटाचा! मनोरंजन विश्वातील सर्वात मनाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’ पुरस्कार. काल ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली.
भारतीय चित्रपटांना काही निवडक अपवाद वगळता आजवर हा पुरस्कार सतत हुलकावणी देत आलेला आहे. तरीही दरवर्षी काही कलाकृतींना नामांकन मिळतं आणि नवीन आशा पल्लवित होतात. दुर्दैवाने यावर्षीच्या यादीमध्ये कोणत्याही भारतीय चित्रपटाला या नामांकन यादीत स्थान मिळाले नाही. परंतु, ‘रायटिंग विथ फायर (Writing with Fire)’ या माहितीपटाने मात्र या यादीत स्थान पटकावत भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
‘रायटिंग विथ फायर (Writing with Fire)’ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट (Documentary Feature) या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. यापूर्वी भारतातमधील दोन माहितीपटांनी सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ऑस्कर जिंकले आहेत – स्माइल पिंकी आणि पिरियड. एन्ड ऑफ सेन्टेन्स.
‘रायटिंग विथ फायर (Writing with Fire)’ या माहितीपटात दलित महिला पत्रकारांनी चालवलेल्या ‘खबर लहरिया’ या वृत्तपत्राची कहाणी दाखवण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातील ‘करवी’ नावाच्या एका छोट्याशा गावात सुरु झालेल्या या वृत्तपत्राने आता थेट डिजिटल क्षेत्रापर्यंत झेप घेतली आहे. हा संपूर्ण प्रवास कसा होता, हे या ९० मिनिटांच्या माहितीपटात दाखविण्यात आले आहे. ‘रायटिंग विथ फायरला ‘IMDB’ वर १० पैकी ७.८ रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड आणि ऑडियन्स अवॉर्ड यासह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
करवी नावाच्या एका छोट्याशा गावातील दलित महिलांनी एकत्र येऊन २००० साली ‘खबर लहरिया’ या वृत्तपत्राची स्थापना केली. २००० सालच्या मे महिन्यामध्ये या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता. एका साधारण गावातील दलित महिलांनी मिळून एक वृत्तपत्र प्रसिद्ध करण्याच्या आणि त्यातून अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा घेतलेला निर्णय ही गोष्ट अजिबातच सहज साधी नव्हती. या महिलांनी हे वृत्तपत्र केवळ सुरु केलं नाही, तर त्याचा विस्तारही केला. २०१२ साली महोबा, लखनऊ आणि वाराणसी शहरात वेगवेगळ्या भाषेत याची एक आवृत्तीही सुरु केली. अवघ्या आठ पानांच्या या वृत्तपत्राची कहाणी खरोखरच थक्क करणारी आहे.
====
हे देखील वाचा: राजा परांजपे यांच्या मराठी चित्रपटांवरून प्रेरित होते ‘हे’ हिंदी चित्रपट!
====
‘खबर लहरिया’ हे महिलांनी प्रकाशित केलेले भारतातील एकमेव वृत्तपत्र असून या वृत्तपत्राच्या संपादिका आहेत मीरा जाटव. मीरा यांच्यासह गुन्हे वार्ताहर संगीता यांचेही यामध्ये मोलाचे योगदान आहे. सर्वत्र फिरून माहिती गोळा करून शिक्षण, वर्णभेद, लिंगभेद, स्त्रीवाद यासारख्या ज्वलंत विषयांसह इतर सामाजिक समस्यांवरही या वर्तमानपत्रामधून आवाज उठविण्यात आला. ज्या विषयांविरुद्ध आवाज उठवायची हिम्मत कोणी करत नव्हतं अशा ज्वलंत विषयांवर भाष्य करण्याचे धैर्य या झाशीच्या राणीच्या लेकींनी दाखवले. यामध्ये त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्या मागे हटल्या नाहीत.
रायटिंग विथ फायरचे दिग्दर्शन, निर्मिती आणि संपादन सुष्मित घोष आणि रिंटू थॉमस यांनी केले आहे. तसेच सुष्मित घोषने करण थपलियालसोबत सिनेमॅटोग्राफर म्हणूनही काम केले आहे. ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राचा संपूर्ण प्रवास दाखविण्याचे आव्हान सुष्मित घोष आणि रिंटू थॉमस यांनी लीलया पेलले आहे. ऑस्कर नामांकनाच्या रूपाने याची पोचपावतीही त्यांना मिळाली आहे.
यावर्षीच्या ऑस्कर नामांकनामध्ये हॉलिवूडच्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजेच १२ नामांकनं मिळाली आहेत. या चित्रपटात बेनेडिक्ट कंबरबॅच याची मुख्य भूमिका आहे. रायटिंग विथ फायर ऑस्करची बाहुली भारतात घेऊन येणार का, तमाम भारतीयांना याची उत्सुकता आहे.
– मानसी जोशी