दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Badhaai Do Movie Review: ‘त्यांच्या’ प्रश्नांना ‘वाचा’ फोडणारा!
अनेक प्राचीन शास्त्रांमधील समलैंगिकतेचा अभ्यास करताना लेखक प्रामुख्याने तीन ग्रथांचा उल्लेख करतात. नारद स्मृती, सुश्रूत संहिता आणि वात्सायन लिखित कामसूत्र.
सुश्रृत संहितेनुसार समलिंगी पुरुष म्हणजेच ‘क्लिबा’ या लैंगिक संबंधाच्या प्रवृत्तीनुसार पाच प्रकार सांगितल्याचं लेखक लिहितात. असेक्य, सुगंधिका, कुंभिका, इर्षका आणि षंढ अशी वर्गवारी केली जाते. तर ‘नारद’ स्मृतीमध्ये मुखेभाग, सेव्यका आणि इर्षका असे तीन प्रकार सांगितलेले आहे. तसंच याप्रकारच्या पुरुषांना स्त्रियांशी लग्न करण्यास मनाई असल्याचं लिहिलंय. तर वात्सायनांनी समलिंगी पुरुषांसाठी ‘पांडा’ या शब्दाखाली चौदा वेगवेगळे प्रकारचे पुरुष नमूद केले आहेत.
ही सर्व प्राचीन ऐतिहासिक माहिती समजून घेण्यास सर्वसामान्यांना (समाजाला) अवघड होऊ शकते. पण, हा विषय आणि ही माहिती क्लिष्ट आहे, म्हणून समाजाने याकडे दुर्लक्षित करणे संयुक्तिक ठरणार नाही.
समाजाला एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी समाजाला शास्त्त्रोत्र दाखले दाखवावे लागतात. म्हणून हा प्राचीन शास्त्राचा प्रपंच इकडे वर लिहिला. (या विषयी तुम्ही स्वतः पुस्तक किंवा इंटरनेटच्या साहाय्याने अधिक माहिती शोधून वाचल्यास, उत्तम!) पण, हीच गोष्ट किंबहुना या घटकांचा सार आजच्या समाजाला सहजरित्या समजावा आणि उमजावा यासाठी हर्षवर्धन कुलकर्णी या दिग्दर्शकाने ‘बधाई दो’ या सिनेमाचा घाट घातला आहे. (Badhaai Do Movie Review)
सरळसोप्या भाषेत, घटनांमधून, गोष्टीतून दिग्दर्शकानाने ‘एलजीबीटी कम्युनिटी’ची सद्य-परिस्थिती आपल्यासमोर मांडली आहे.
आधुनिक भारतातील ‘अभिव्यक्ती’ची व्याख्या बदलणे गरजेचे आहे, हाच संदेश ‘बधाई दो’ हा सिनेमा देऊ पाहतो. आज भारतात समलैंगिक शारीरिक संबंधांना मान्यता आहे परंतु समलैंगिक विवाहाला अद्याप कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. या संदर्भातील याचिका माननीय न्यायालयाकडे विचाराधिन आहे.
कोणाशी विवाह करावा? हा निर्णय सर्वस्वी ‘तिचा’ किंवा ‘त्याचा’च असायला हवा. याच प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम हा सिनेमा करतो. मग हे लग्न मुलाचं मुलाशी, मुलीचं मुलीशी किंवा मुलाचं मुलीशी होवो. कायद्याने सांगितलेल्या वयोमानानुसार तो किंवा ती सुजाण वयात आल्यांनतर त्यांनी त्यांचा-त्यांचा निर्णय नक्कीच घ्यावा. मग ‘तो’ किंवा ‘ती’ कोणीही असो. याच चर्चेला समाजात वाचा फोडण्याचे काम ‘बधाई दो’ सारखे सिनेमे करतील.
यापूर्वी अभिनेता आयुष्मान खुराना याने ‘समलैंगिक विवाह’ या विषयाला घेऊन ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा सिनेमा केला होता. त्यावेळी तर स्वतः आयुष्मानने ऑनस्क्रिन पुरुष सहकलाकाराला चुंबन दिले होते. त्या ‘किस’ने तेव्हा ठिणगी पडली आणि आता ‘बधाई दो’ सिनेमाच्या निमित्तानं त्या ठिणगीचे रूपांतर बदलाच्या वणव्यात होऊ पाहतंय. (Badhaai Do Movie Review)
‘बधाई दो’ सिनेमांत मांडलेल्या प्रश्नांही पार्श्ववभूमी सांगायचं झाल्यास; १९५६ च्या हिंदू विवाह कायद्याअंतर्गत समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात यावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. गेल्यावर्षी या याचिकेवर केंद्र सरकारने आपली भूमिका मांडताना ‘समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यास विरोध दर्शवला.
“समलैंगिक विवाह कायदेशीर व्हावेत…”, अशी मागणी फक्त भारतातच होतेय का? तर नाही! मानवी हक्कांविषयी आवाज उठवणाऱ्या जगभरातील अनेक कार्यकर्त्यांची ही मागणी आहे की, समलैंगिक विवाह हे सगळीकडेच कायदेशीर व्हावेत.
‘प्रेम’ ही नैसर्गिक भावना व्यापक असेल, तर समलैंगिकांचं एकमेकांविषयीचं प्रेम हे बेकायदेशीर आहे. हे ठरवलं तरी कशावरून? निसर्गासमोर सगळेच समान असताना त्यांना मिळणारे हक्क देखील ‘समान’च हवेत. अशी भूमिका ‘एलजीबीटी कम्युनिटीची’ आहे. त्याचीच गोंडस गोड गोष्ट आपल्याला ‘बधाई दो’ सिनेमात वास्तविक स्वरूपात दिसते.
वयाच्या तिशीत असलेल्या शार्दूल (राजकुमार राव) आणि सुमन (भूमी पेडणेकर) यांची ही गोष्ट आहे. प्रथमदर्शी ही गोष्ट जरी त्यांची असली तरी ते देशभरातील अशा सर्व जोडप्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत; ज्यांना ‘समलैंगिक प्रेम’ आणि त्याच्याशी निगडित प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे.
शार्दूल हा पेशाने पोलीस अधिकारी असतो आणि सुमन ही शिक्षिका असते. वाढतं वय पाहता त्या दोघांच्या घरातून त्यांच्या लग्नासाठी आग्रह होत असतो. पण, त्या दोघांना लग्न करायचं नसतं. कारण, सुमन आणि शार्दूल दोघेही समलैंगिक असतात. शार्दुलला मुलींमध्ये आणि सुमनला मुलांमध्ये रस नसतो. अर्थात सुमनला मुलीच आवडत असतात तर शार्दुलला मुलं. पण, ही बाब इतर कोणालाही कुटुंबात ठाऊक नसते.
घरच्यांकडून होणारा आग्रह आणि स्वतःची खरी लैगिक ओळख आणि गरज लपवण्यासाठी शार्दुल-सुमन एकमेकांशीच लग्न करतात. हा सिनेमाचा निर्णायक क्षण आपण ट्रेलरमध्ये ही पाहिला असेल. पण, ‘पिक्चर अभी बाकी है…!’ ते एकमेकांशीच लग्न का करतात? त्यातून त्यांना काय साध्य होतं? याचा निर्वाळा आपलयाला सिनेमात होतो. सोबतच भारतात आजच्या तारखेला समलैंगिक संबंधांना मान्यता असतील तरी त्या जोडप्यांना ‘काही अधिकार’ देण्यात आलेले नाही. जे स्त्री-पुरुष जोडप्याला आहेत. पण, या कायदेशीर पेजातून शार्दूल-सुमन कसा मार्ग काढतात? हे सिनेमात पाहणं निर्णायक आहे. सोबतच बदल हा सर्वात आधी स्वतःमध्ये मग कुटुंबात आणि मग समजात होत असतो. याची शिकवण देखील हा सिनेमा जाताजाता आपल्याला देऊन जातो.
या सिनेमांची ट्रीटमेंट दिग्दर्शकाने ‘कॉमेडी’ ठेवली आहे. परिणामी सिनेमा प्रेक्षकांना समजायला सोयीस्कर जातो. सिनेमा काहीस संथ आहे. पण, ही पटकथेची गरज आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी संयम बाळगून हा सिनेमा पाहणं अपेक्षित आहे. सिनेमाचा विषय हा काहीसा चौकटी बाहेरील आहे. पण, तरी देखील दिग्दर्शकाने प्रेक्षकांना ‘स्पून फिडींग’ केलेलं नाही. (Badhaai Do Movie Review)
प्रेक्षकांनी पडद्यावरील काही घटना, दृश्य, प्रसंग तपशीलपूर्वक पाहिल्यास त्या प्रसंगांमधील छुपा अर्थ प्रेक्षकांना समजून घेता येईल. जी सद्य-परिस्थिती समाजात आजच्या तारखेला आहे; तीच ‘बंधना’ची परिस्थिती दिग्दर्शकाने सिनेमात मांडलीय.
राजकुमार आणि भूमी हे सिनेमात आपल्याला जेवढं हसवतात तितकाच ते ‘बोध’ ही देतात. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं नवा चर्चेला वाचा फोडली आहे. सुमन, अक्षत आणि हर्षवर्धन यांनी केलेले सिनेमांचे लेखन मार्मिक आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर आणि इतर सर्वच कलाकारांनी त्यांच्या भूमिका उत्कृष्टरित्या वटवल्या आहेत. (Badhaai Do Movie Review)
सिनेमा ग्लॅमरस देखील आहे. यासाठी सिनेमातील गाणी भरुन काढतात. चकचकीत छायाचित्रण आणि संगीत सिनेमांची उंची वाढवण्यात यशस्वी ठरतं. सहकुटुंब आणि सहपरिवार हा सिनेमा जरूर बघायला हवा आणि घरी जाऊन त्यावर या विषयावर नक्कीच चर्चा करायला हवी. जेणेकरून सिनेमाचा मूळ उद्देश साध्य होईल.
निर्मिती : विनीत जैन
दिग्दर्शक : हर्षवर्धन कुलकर्णी
कलाकार : राजकुमार राव, भूमी पेडणेकर
छायांकन : स्वप्नील सोनावणे
संकलन : कीर्ती नाखवा
दर्जा : साडे तीन स्टार