Movie Review Soyrik (2022): लग्न जुळवण्याचा विचार करणाऱ्या आजचा पिढीची गोष्ट – सोयरीक!
लग्न हा कुटुंब व्यवस्थेचा कणा समजला जाणतो. लग्न हे केवळ एका जोडप्याचं एकत्र येणं नसतं, तर दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं. लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि निभावण्याच्या ठरलेल्या पारंपरिक चौकटी मोडून आपल्या पसंतीला प्राधान्य देत लग्न जुळवण्याचा विचार करणाऱ्या आजचा पिढीतील ही ‘सोयरीक’ गोष्ट आहे. (Movie Review Soyrik 2022)
जातीयवादाचा चष्मा घातलेल्या समाजासाठी ही सोयरीक प्रतिष्ठेची असते. आजही महाराष्ट्रात किंबहुना भारतात आंतरजातीय विवाह केला म्हणून संबंधित मुला-मुलीचे कुटुंबीय रक्ताचा सडा पाडताना मागे-पुढे पाहत नाही. आपल्या कुटुंबाची, जातीची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. हाच अट्टाहास मुला-मुलीच्या जीवाशी खेळही करतो. याचीच रंजक पण वास्तविक कहाणी दिग्दर्शक मकरंद माने याने त्यांच्या ‘सोयरीक’ सिनेमात मांडली आहे. (Movie Review Soyrik 2022)
‘नातं’.. ! म्हणायला जेवढा सोपा शब्द आहे, तेवढाच जपायला कठीण. मग तो जपताना त्यात सुरू होते ती स्वार्थ अन् निस्वार्थची लढाई. ह्यात एक हलकी धूसर रेष असते, त्यावर तुम्ही कसे उभे आहात, हे महत्वाचे? मग हे नातं नवरा-बायकोतील असो, आई-मुलीचं, आई-मुलाचं, वडील-मुलीचं, वडील-मुलाचं किंवा भावा-बहिणीचं. या सर्व नात्यांमधील किल्ष्ट आणि स्वार्थी भावनेचे दर्शन देखील ‘सोयरीक’ सिनेमा आपल्याला घडवतो.
समाजात जे घडते तेच सिनेमात दाखविले जाते. मुलगी दुसऱ्या कोणत्यातरी वरच्या किंवा खालच्या जातीतील (समाजाच्या नजरेत वरच्या/ खालच्या जातीतील) मुलासोबत कुटुंबियांच्या विरुद्ध पळून लग्न करते. आणि मग दोन कुटुंबीयांमध्ये, जातीमध्ये, समजातील दोन घटकांमध्ये आपसी क्लेश वाढतो. हीच तळागातील सध्य-परिस्थिती आपल्याला ‘सोयरीक’ सिनेमात दिसते. (Movie Review Soyrik 2022)
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे यथार्थ चित्रण व्हावे या हेतून दिग्दर्शकाने सिनेमात उत्कृष्टपणे पटकथेत सिम्बॉलिज्मचा वापर केला आहे. सिनेमांच्या पटकथेत अनेक अर्थ लपलेले आहेत; जे आपण उघड डोळ्याने पाहिल्यास आपल्याला समजतील आणि उमजतील देखील. पण, ‘समाज’ म्हणून आपणच आपल्या श्रीमुखात यावेळी मारायला हवं. कारण, आपण समाज म्हणून कमी पडत आहोत, या ‘जातीयवादी’ व्यवस्थेला संपवण्यासाठी!
आंतरजातीय विवाहामुळे होणाऱ्या समाजातील हिंसेचा विरोध आपण सुज्ञ समाज म्हणून करावयाला हवा? हीच शिकवण ‘सोयरीक; हा सिनेमा देऊ पाहतो. त्यामुळे कथानकाची गरज दिग्दर्शकाने ‘स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून पटकथेचे लेखन केले आहे.
विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने यांनी या सिनेमांची निर्मीती केली आहे. यापूर्वी आंतरजातीय विवाहाशी निगडित सिनेमे निर्मिली गेले आहेत. पण, तरी देखील नव्या नजरेतून एक सत्य परिस्थिती समाजासमोर मांडण्याचे धाडस या तिघांनी केलं आहे.
सिनेमात कोणताही ग्लॅमरस चेहरा नाही. प्रेक्षकांना आकर्षित करेल असा मुलामा नाही. पण, तरी देखील सिनेमाचा विषय आणि ही कथा लोकांपर्यंत पोहोचावी या धडपडीतूनच हा सिनेमा त्यांनी निर्मिला असावा; असं म्हणावं लागेल. त्यामुळे प्रत्येकाने समाजाचा किंबहुना स्वतःचा आरसा म्हणून हा सिनेमा जरूर पाहावा. (Movie Review Soyrik 2022)
=====
हे देखील वाचा: Badhaai Do Movie Review: ‘त्यांच्या’ प्रश्नांना ‘वाचा’ फोडणारा!
=====
नितीश चव्हाण, मानसी भवाळकर, शशांक शेंडे, किशोर कदम, छाया कदम, उमेश जगताप, राजश्री निकम, शंतनू गंगणे, विराट मडके, प्रियदर्शनी इंदलकर, विनम्र भाबल, निता शेंडे, योगेश निकम, अतुल कासवा, संजीवकुमार पाटील, अपर्णा क्षेमकल्याणी आदी सर्वच कलाकारांनी त्यांच्या छोट्या-मोठ्या भूमिकांना पडद्यावर योग्य न्याय दिला आहे. उत्तम संहिता, दर्जेदार अभिनय आणि वेगळी दिग्दर्शकीय शैली यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे.
माझ्या माहितीनुसार सिनेमांचे चित्रीकरण हे कथनाकच्या क्रमशृंखले प्रमाणेच झाले आहे. अर्थात ज्या क्रमात सिनेमातील प्रसंग आपल्याला पडद्यावर दिसतात, त्याच क्रमात ते चित्रित झाले आहेत. तसेच कलाकरांना देखील सिनेमांची पूर्ण कथा पूर्वीपासून ठाऊक नव्हती. परिणामी सिनेमातील सर्वच कलाकार आणि त्यांचा अभिनय वास्तवाशी मेळ खाणारे आहे.
सिनेमांच्या कथानकाविषयी सांगायचं तर; एक जोडपं लग्न करुन थेट गावच्या पोलीस ठाण्यात येतं. पळून जाऊन त्यांनी लग्न केलेलं असतं. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि कुटुंबियांच्या रागापासून वाचण्यासाठी ते पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावर येतात. कायदा आणि सुव्यस्था राखणारे पोलीस प्रशासनाची भूमिका काय असते? हा सिनेमांच्या पटकथेतील एक प्रभाव मार्मिक आहे. तर पोलीस अधिकारी प्रथमदर्शी मुला-मुलीच्या कुटुंबियांना ठाण्यात बोलावून घेतात. पण, त्या मागे त्याचा छुपा अजेंडा काय असतो? याचं चित्रण सिनेमात समर्पकपणे झालं आहे. (Movie Review Soyrik 2022)
=====
हे देखील वाचा: आनंदघन – लता मंगेशकर यांची अविस्मरणीय आठवण
=====
उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे अशा सोयरीकमध्ये कुटुंब स्वतःच्या घरातील जीवाचाच जीव घेऊ पाहते. अशा निर्णायक क्षणी पुढे कथानकात नेमकं काय होतं? हे पाहणं ‘रंजक’ आणि ‘बोधपूर्ण’ आहे. लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवना विषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकल विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता खरंच आली आहे का? याच उत्तरही हा सिनेमा आपल्याला देतो.
निर्माते : विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने
दिग्दर्शक/लेखक : मकरंद मान
कलाकार : नितीश चव्हाण, मानसी भवाळकर, शशांक शेंडे, किशोर कदम, छाया कदम, उमेश जगताप, राजश्री निकम, शंतनू गंगणे, विराट मडके, प्रियदर्शनी इंदलकर
छायांकन : योगेश कोळी
संकलन : मोहित टाकळकर
दर्जा : तीन स्टार