‘या’ म्युझिक अल्बम्सच्या ‘१२ लाख’ कॅसेट्सची झाली होती विक्रमी विक्री!
नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. तरुणांसाठी हा दिवस म्हणजे नव्याने नातं जोडण्याचा दिवस तर लग्न करून आयुष्यात सेटल झालेले ‘nostalgic’ होत जुन्या आठवणींमध्ये रमतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी त्याकाळी गुलाब, चॉकलेट्स, टेडी यापेक्षाही जास्त महत्वाची होती, ‘डेडिकेटेड सॉंग्ज’! त्या काळी चित्रपटांमधील गाण्यांइतकेच किंबहुना त्यापेक्षाही लोकप्रिय असणारे म्युझिक अल्बम (Music Album) आजही कित्येकांच्या प्लेलिस्टमध्ये असतील.
हिंदुस्थानी संगीताचे चाहते जगभर पसरलेले आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत, चित्रपट गीते, वाद्यसंगीत, इत्यादी अनेक प्रकारच्या गाण्यांचा स्वतंत्र श्रोतेवर्ग आहे. याचबरोबर काहींना ‘पॉप म्युझिक’ प्रचंड भावतं. नव्वदच्या दशकाच्या अखेरीस या सर्व गायन प्रकारांना न्याय देत ‘म्युझिक अल्बम’ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते.
चित्रपटांमध्ये नसणारी हिंदी, इंग्लिश किंवा मिश्र भाषिक गाण्यांनी तेव्हा रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. ऑडिओ कॅसेट्सच्या त्या जमान्यात म्युझिक अल्बमच्या लाखो कॅसेट्स विकल्या जात होत्या.
म्युझिक अल्बम (Music Album) ही संकल्पना तशी फार जुनी आहे. म्युझिक अल्बमचा इतिहास शोधायचा तर पार १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जावं लागेल. ‘अल्बम’ म्हणून ओळखला जाणारा सर्वात पहिला संगीतसंग्रह म्हणजे तचैकोव्स्कीचा ‘नटक्रॅकर स्वीट’. हा म्युझिक अल्बम एप्रिल १९०९ मध्ये ओडियन रेकॉर्ड्सने सेट केलेला एक फोर-डिस्क म्हणून प्रकाशित केला होता.
भारतामध्येही तसं पाहिलं तर म्युझिक अल्बम (Music Album) हा प्रकार सुरुवातीपासूनच अस्तित्वात होता. परंतु केबल चॅनेलच्या प्रसारानंतर खऱ्या अर्थाने म्युझिक अल्बम्सना सुगीचे दिवस आले. त्याआधी काही म्युझिक बँडस प्रसिद्ध होते, भक्तिगीते किंवा काही पॉप म्युझिकच्या कॅसेटही प्रसिद्ध होत्या. पण त्यांची प्रसिद्धी ‘ठराविक’ श्रोते वर्गापुरतीच मर्यादित होती.
१९९० च्या उत्तरार्धात भारतीय पॉप संगीतामध्ये बाबा सहगल, उषा उत्थूप, शेरोन प्रभाकर अशा बँडच्या आगमनाने पॉप म्युझिकची जादू रसिकांना मोहिनी घालू लागली. एम टीव्ही, व्ही टीव्ही सारख्या म्युझिक चॅनेल्सच्या आगमनाने मात्र ‘म्युझिक अल्बम’ची (Music Album) एक वेगळीच दुनिया तयार झाली. त्यावेळी काही अल्बम्स केवळ लोकप्रियच झाले नाहीत तर, त्यांनी म्युझिक इंडस्ट्रीला चांगले गायक मिळवून दिले. इतकंच नव्हे तर अल्पावधीत या म्युझिक अल्बम्सची लोकप्रियता एवढी वाढली की नामांकित गायकांनाही याचा मोह आवरता आला नाही.
कर्णमधुर संगीत, मनाला भावणारी शब्दरचना, अवघ्या तीन ते आठ मिनिटाच्या गाण्यात संपणारी एक कहाणी, आकर्षक पिक्चरायझेशन यासारख्या अनेक कारणांमुळे हे अल्बम्स केवळ श्रवणीय नाही तर, प्रेक्षणीयही झाले.
बाबा सहगल यांचा ‘थंडा थंडा पानी'(१९९२), अलिशा चिनॉयचा ‘बॉम्बे गर्ल’ (१९९३), अली हैदरचा नॉस्टॅल्जिक करणाऱ्या गाण्यांचा ‘संदेसा’ (१९९३) या अल्बम्सना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. संदेसा मधील ‘पुरानी जीन्स और गिटार’ आज २०२० मध्येही तरुणाईच्या पसंतीस उतरत आहे.
१९९५ साली ‘दलेर मेहेंदी’ नावाच्या नवेदीत पंजाबी गायकाने काढलेला पंजाबी लोकसंगीत म्हणजेच भांगडा गाण्यांचा ‘बोलो तारा रा रा’ या अल्बमला केवळ पंजाबमध्येच नाही तर अख्ख्या भारतभर लोकांनी उचलून धरलं. इतकंच नाही तर, बॉलीवूडचा बादशहा अमिताभ बच्चन यांच्या ‘मृत्यूदाता’ या चित्रपटात दलेर मेहेंदीना गाण्याची संधी मिळाली आणि “ना ना ना ना ना रे..” म्हणत दलेर मेहेंदी यांची बॉलिवूडच्या संगीत जगतात दिमाखात ‘इन्ट्री’ झाली.
१९९५ साली अलिशा चीनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या अल्बमपासून भारतीय संगीत जगतात खऱ्या अर्थाने पॉप संगीताचे (indipop) आगमन झाले. याच अल्बममुळे मॉडेलिंग जगतात ‘मिलिंद सोमण’ नावाच्या मराठी ताऱ्याचा उदय झाला. गाण्याइतकीच किंबहुना थोडी जास्तच लोकप्रियता मिलिंद सोमणलाही मिळाली आणि तो ‘ड्रीम बॉय’ म्हणून सौंदर्यवतींच्या मनावर राज्य करू लागला.
यानंतर मात्र म्युझिक अल्बम्सची (Music Album) घोडदौड जोमाने चालू झाली. पंकज उदास यांचा ‘और आहिस्ता…’ , आर्यन्सचा ‘आँखों में तेरा ही चेहरा..’, युफोरिया बँडचा ‘माएरी.. याद ओ आएरी’ व ‘धूम पिचक धूम’, फाल्गुनी पाठकचा ‘मैने पायल हैं छनकाई’, शानचा ‘तनहा दिल तनहा सफर’, भुपेन हजारीकांचं ‘पिया बसंती रे, काहे सताए आजा’, इत्यादी एकापेक्षा एक सरस अल्बम्सनी संगीत जगतातला संपन्न केलं. तसं लिहायला गेलं, तर अजून कित्येक अल्बम्सची भर पडेल. या सर्व अल्बम्सच्या कॅसेट्सची विक्रमी विक्री तर झालीच पण यासोबत बॉलिवूडलाही नवीन गुणी गायक मिळाले.
====
हे देखील वाचा: मैफिलीत जेव्हा भीमसेन जोशी यांचा स्वर लागला नाही तेव्हा नेमकं काय घडलं?
====
एकीकडे हिंदी गाण्यांचे म्युझिक अल्बम्स (Music Album) संगीतप्रेमींना सुखद अनुभव देत होते. त्याचवेळी प्रादेशिक भाषांमध्येही काही अल्बम संगीत जगतामध्ये इतिहास घडवत होते. मराठीमध्ये मिलिंद इंगळे यांच्या ‘गारवा’ अल्बमला इतकी लोकप्रियता मिळाली की त्यामधील गाण्यांच्या चालीवर ‘ये हैं प्रेम’ नावाचा हिंदी गाण्यांचा अल्बम प्रकाशित करण्यात आला. ‘छुईमुई सी तुम लगती हो…’ या गाण्याने व त्यातल्या ‘इटूकल्या टेडीने’ सगळ्या भारतभर प्रसिद्धी मिळवली. त्यांनतर अवधूत गुप्तेची ‘मेरी मधुबाला..’ व इतर रिमिक्स गाणी, वैशाली सामंतचे ‘ऐका दाजीबा’, गारवाचा पुढचा भाग ‘सांज गारवा’ अशा अनेक अल्बम्सनी रसिकांच्या मनाची पकड घेतली.
म्युझिक अल्बमचा विषय निघाल्यावर एक नाव आवर्जून घ्यायलाच हवं ते म्हणजे ”सोनू निगम’. “दिवाना तेरा, तुझेही बुलाए…” म्हणत सोनू निगमने रसिकांच्या मनावर घेतलेली पकड आजही कायम आहे. १९९९ साली आलेल्या या अल्बमच्या कॅसेट्सची १२ लाख इतकी विक्रमी विक्री झाली. या अल्बममध्ये काम केलेल्या संदली सिन्हा, राकेश बापट व प्रियांशू चॅटर्जी या कलाकारांना घेऊन अनुभव सिन्हा यांनी २००१ साली ‘तुम बिन’ हा सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केला.
म्युझिक अल्बम्स लोकप्रियतेचा कळस गाठत असताना केवळ नवेदीत गायकच नाही तर, अनेक नामवंत गायक या दुनियेचा भाग बनले होते. आशजींसारख्या प्रतिभासंपन्न गायिकेने “जानम समाझा करो…” म्हणत या दुनियेत प्रवेश केलाच होता. तसंच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ‘ब्रेट ली’ सोबत केलेल्या गाण्यामुळे क्रिडारसिकही नकळतपणे या अल्बमच्या दुनियकडे ओढले गेले.
सन २००० मध्ये आलेल्या ‘दिल कही होश कही…’ या म्युझिक अल्बमचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जगजीत सिंग, आशा भोसले आणि लताजी यासारख्या दिग्गजांच्या स्वरांनी आणि एकत्रित गायकीने सजलेली गाणी. रसिक प्रेक्षकांनी या म्युझिक अल्बमला अक्षरश: डोक्यावर घेतलं. श्रवणीय आणि प्रेक्षणीय अशी ही गझल/गाणी आधुनिक आणि शास्त्रीय संगीत आवडणाऱ्या प्रत्येकालाच भावली होती.
म्युझिक अल्बमच्या दुनियेत सुरांचा साज सजविणारा म्युझिक अल्बम (Music Album) म्हणजे २००० साली आलेला ‘सनसेट पॉईंट’. गुलजार साहेबांचे काळजाला स्पर्श करणारे शब्द, भूपिंदर सिंग व चित्राच्या आवाजामधली कर्णमुग्ध गाणी आणि हिमाचलमधल्या निसर्गसौंदर्याचा नेत्रसुखद अनुभव देणारं सुरेख चित्रण, यामुळे या अल्बमने रसिकांच्या मनावर घातलेली मोहिनी आज वीस वर्षांनंतरही कायम आहे. या अल्बमबद्दल लिहायचं तर त्यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
सन २००५ मध्ये ‘यु ट्यूब’ चे झालेले आगमन व त्याचबरोबर २००६ नंतर ‘रिमिक्स’ या संकल्पनेला मिळालेली लोकप्रियता यामुळे म्युझिक अल्बमचे सगळे नियम बदलत गेले. आजच्या घडीला यु ट्यूब वर अनेक ब्रँड्स / गायक आपले अल्बम्स प्रसिद्ध करत असतात. त्यातील ‘सनम’ सारखे यु ट्यूब चॅनेल जुनी गाणी नव्या रुपात अतिशय सुरेख पद्धतीने सादर करत आहे. सनम व्यतिरिक्त अनेक म्युझिक बँड्स यु ट्यूब वर लोकप्रियही झाले आहेत, पण त्यामध्ये नाईनटीज / ट्वेन्टीज मधील अल्बम्सची मजा नाही हेदेखील तितकेच खरं आहे.
सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींमध्ये फारसं नावीन्य उरत नाही. कधीही, कुठेही आणि कोणतीही गाणी ऐकवणारा मोबाईल तसंच एकूणच वाढत चाललेलं रिमिक्सचे व स्वतंत्र अल्बम्सचे प्रस्थ यामुळे नव्याने तयार होणारे म्युझिक अल्बम्स लोकप्रिय झाले तरी त्यांची जादू फार काळ टिकत नाही. अर्थात यालाही काही अपवाद आहेतच.
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
जाता जाता आवर्जून उल्लेख करावा असा अलीकडच्या काळात म्हणजेच २०१६ साली प्रदर्शित झालेला म्युझिक अल्बम (Music Album) म्हणजे ‘गुलजार इन कॉनव्हरसेशन विथ टागोर’. गुलजार यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या काही निवडक कवितांच्या केलेल्या हिंदी अनुवादाला शंतनू मोईनत्रा यांनी संगीतबद्ध केलं असून श्रेया घोषल आणि शान यांच्या जादुई सुरांनी सजलेल्या गाण्यांचा अल्बम म्हणजे संगीतप्रेमींसाठी पर्वणीच आहे.