The Kashmir Files Movie Review – काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
आपलं घर! एक अत्यंत जिव्हाळ्याचा शब्द! आपलं गाव! मनामधला एक हळवा कप्पा. आपलं घर कसंही असलं तरी ते आपल्याला प्रिय असतं. परंतु, समजा काही लोकांनी तुमच्या घरात घुसून तुम्हाला तुमच्या घरातून इतकंच नव्हे तर गावातून हाकलून लावलं, तुमच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, तर काय वाटेल तुम्हाला? नेमकं हेच घडलंय काश्मिरी पंडितांच्या बाबतीत! आणि विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून हेच दाखवायचा प्रयत्न केला आहे. (The Kashmir Files Movie Review)
सुरुवातीपासूनच या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द काश्मीर फाईल्स’ आधी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु, कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकण्यात आले. आता जवळपास ७ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाची कहाणी सुरु होते एका लहान मुलावर झालेल्या हल्ल्यापासून. या मुलावर फक्त एकाच कारणासाठी हल्ला होतो, ते कारण म्हणजे, हा मुलगा सचिन तेंडुलकरचा फॅन असतो आणि भारताचा जयजयकार करत असतो. सतत दहशतीखाली जगणाऱ्या काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
कथानकाबद्दल बोलायचं तर, ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. ‘द ताशकंद फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कथेचा प्लॉट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास अगदी बारकाईने करून त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. (The Kashmir Files Movie Review)
चित्रपटातील काही दृश्ये थरकाप उडवणारी आहेत. तांदूळ भरून ठेवलेल्या बॅरलमध्ये लपलेल्या टेलीकॉम इंजिनिअरला गोळ्या घालून त्याची केलेली हत्या, तांदुळाच्या डब्यात पसरलेला रक्ताचा सडा आणि त्याच्या पत्नीला जबरदस्तीने खायला लावलेले रक्ताने माखलेले तांदूळ, हे दृश्य डोकं सुन्न करतं. तसंच २००३ सालच्या नादीमार्ग हत्याकांडाचा प्रसंगही यामध्ये दाखवण्यात आला आहे.
या हत्याकांडात २४ काश्मिरी पंडितांना मिलिटरीचा गणवेश घालून आलेल्या अतिरेक्यांनी अत्यंत क्रूरपणे ठार मारले होते. तरुण मुली आणि महिलांवर झालेले अत्याचार, बलात्कार, अपमान हे सारे प्रसंग पाहून मनात दुःख, चीड आणि संताप या तिन्ही भावना एकत्रितपणे दाटून येतं. (The Kashmir Files Movie Review)
चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी आपलं काम चोख बजावलं आहे. अनुपम खेर यांनी साकारलेला काश्मिरी पंडित जीव हेलावून टाकतो. राधिका मेनन (पल्लवी जोशी) आणि कृष्ण पंडित (दर्शन कुमार) यांच्यामधील काही दृश्ये सुंदर जमून अली आहेत.
राधिका मेननचं काश्मीसंबधातील भाषण चित्रपट संपल्यानंतरही डोक्यातून जात नाही. या साऱ्यामध्ये आवर्जून कौतुक करायला हवं ते चिन्मय मांडलेकर या मराठमोळ्या अभिनेत्याचं. त्याने ‘फारुख मलिक बिट्टा’ या गुन्हेगाराच्या भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे. ही भूमिका त्याने ज्या सहजतेने आणि आत्मविश्वासपूर्वक निभावली आहे, त्याला तोड नाही.
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो समाज प्रबोधनाचा एक प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे निव्वळ मनोरंजन हा उद्देश घेऊन तुम्ही चित्रपट बघणार असाल तर, इथे तुमची घोर निराशा होऊ शकते. कारण हा चित्रपट तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. हा चित्रपट तुम्हाला त्या काळात घडलेल्या वास्तववादी परिस्थितीचे दर्शन घडवतो.
काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार बघून मनाचा थरकाप उडवत हा चित्रपट तुमचा मेंदू आणि मन दोन्हीचा ताबा घेतो आणि तुम्ही चित्रपट संपल्यावरही कित्येक काळ त्यामधून बाहेर येऊ शकत नाही. (The Kashmir Files Movie Review)
वास्तववादी चित्र उभं करण्याचा नादात चित्रपट काहीसा संथ झाला आहे. मुळात सेन्सिटिव्ह आणि सत्यघटनेवर आधारित चित्रपट बनवताना स्पीड आणि लांबी यावर विशेष लक्ष देणं खूप महत्वाचं असतं. परंतु, द काश्मीर फाईल्स इथे कमी पडतोय. पूर्वार्धात काही काळ चित्रपट रटाळ वाटू शकतो, पण उत्तरार्धात मात्र चित्रपट पुन्हा आपल्या मनाची पकड घेतो. (The Kashmir Files Movie Review)
थोडक्यात, इतिहास अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट नक्की बघा. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार समजून घ्यायची इच्छा असेल, तर हा चित्रपट नक्की बघा. एक चांगली कलाकृती बघायची असेल, तर हा चित्रपट आवर्जून बघा. पण ज्यांना केवळ छप्पडतोड करमणूक हवी आहे, अशांनी शक्यतो या चित्रपटाच्या वाट्याला जाऊ नका.
चित्रपट: ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files)
दिग्दर्शक: विवेक अग्निहोत्री.
कलाकार: अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर
दर्जा: चार स्टार