जेव्हा मराठी गाणं गाताना ‘मन्ना डे’ यांना मराठी शब्दांचे उच्चार जमत नव्हते तेव्हा …
मन्ना डे म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातलं सुवर्णपान. हिंदी चित्रपटसृष्टीत तर मन्ना डे (Manna Dey) लोकप्रिय होतेच. परंतु, याचबरोबर त्यांनी अन्य प्रादेशिक भाषांमध्ये ३५०० हुन अधिक गायली आहेत. त्यांनी बंगाली, भोजपुरी, पंजाबी, आसामी, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा विविध भाषांमध्ये गायलेली आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पार्श्वगायक म्हणून तमन्ना (१९४२) या चित्रपटातील ‘जागो आयी उषा’ या गाण्यापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरवात झाली. अगदी अलीकडे २००६ सालापर्यंत संगीत क्षेत्रात सक्रिय होते. त्यांना सिने आणि संगीत क्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्कारांसह पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, जीवनगौरव पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
मन्ना डे (Manna Dey) एक गायक म्हणू सर्वश्रुत होतेच, परंतु, त्याचबरोबर ते उत्तम कुस्तीपटूही होते. सुप्रसिद्ध कुस्तीपटू गोबर गुहा यांच्याकडून त्यांनी कुस्तीचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं. अखिल भारतीय चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. अर्थात, असं असलं तरी संगीतावर त्यांचं खूप मनापासून प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी संगीत क्षेत्रातच आपली कारकीर्द घडवली. अगदी वयाच्या ९० व्या वर्षीही दररोज तीन तासांचा रियाज करत असत.
संगीत क्षेत्रात आल्यावरही मन्ना डे (Manna Dey) यांनी रियाजासोबतच आपल्या शारीरिक ‘फिटनेस’चीही काळजी घेतली. वयाच्या ९० व्या वर्षीही ते दररोज किमान अर्धा तास व्यायाम करत असत. इतकंच नाही तर स्वतःच्या खाण्या -पिण्याचीही विशेष काळजी घेत असत. रेकॉर्डिंग दरम्यान, ते घरून निघतानाच सँडविच आणि कॉफी सोबत नेणे पसंत करत.
कोणतंही गाणं गाताना केवळ सूर, ताल, लय या गोष्टींसोबतच ज्या अभिनेत्यासाठी पार्श्वगायन करायचं आहे, त्याची स्टाईल आत्मसात करून गात. म्हणूनच त्यांची गाणी थेट काळजाला भिडत असत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘एक चतुर नार’ हे गाणं. या गाण्यासाठी त्यांनी ‘मास्टरजी’ या काहीशा विनोदी धाटणीच्या व्यक्तिरेखेसाठी पार्श्वगायन केलं होतं. ते इतकं सुंदर जमून आलं होतं की, लोक आजही ते गाणं आवडीने ऐकतात आणि बघतातही.
हिंदीसोबत इतर प्रादेशिक भाषेत गाणी गाणाऱ्या मन्ना डे यांनी आपल्या मराठी भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. पण गंमत म्हणजे बंगाली, हिंदी वगळता त्यांना इतर प्रादेशिक भाषा बोलता येत नसत, मराठी तर नाहीच नाही. अर्थात सुर-संगीताला भाषेचा अडसर कधीच नसतो. त्यामुळे मन्ना डे (Manna Dey) यांची गाणी प्रादेशिक भाषेतही आवडीने ऐकली जात.
याबाबतीत घरकुल चित्रपटातील “नंबर ५४ हाऊस ऑफ बॉंबे डोअर” या गाण्याच्या वेळचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. हे गाणं गाताना मन्ना डे यांना गाण्यातल्या मराठी शब्दांचे उच्चार करणं कठीण जात होतं. खूप प्रयत्न करूनही रिटेक वर रिटेक होत होते. अखेरीस मन्ना डे (Manna Dey) वैतागले आणि संगीतकार सी.रामचंद्र यांना म्हणाले, “अरे यार, काय तुझा तो मराठी? बांबूचा घर, बांबूचा दार. आय कान्ट सिंग.” तेव्हा मन्ना डेंचा आवेश, वैताग आणि मुख्य म्हणजे त्यांचं मराठी ऐकून उपस्थितांना हसू आवरलं नाही.
सी.रामचंद्र हे हुशार संगीतकार होते. त्यांनी मन्ना डे (Manna Dey) यांची समजूत घातली आणि त्यांना सांगितलं, “गायक हा फक्त गायक असतो आणि गायकासाठी गाणं हे गाणं असतं. त्यामुळे तिथे भाषेचा अडसर येता कामा नये. गाण्याचा संबंध सूर, ताल, लय यांच्याशी असतो. तुला गाणं समजलं आहे. त्यातला भाव समजला आहे. आता भाषा हा मुद्दा गौण आहे आणि तो जमवणं कठीण नाही.”
====
हे देखील वाचा: किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!
====
सी.रामचंद्र यांनी समजूत काढल्यावर मन्ना डे यांनी प्रयत्नपूर्वक गाण्याचे शब्द आत्मसात केले आणि नंतर हे गाणं मस्त जमून आलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. यानंतर मन्ना डे यांनी तब्बल ५५ मराठी गाणी गायली आणि ती अजरामराही झाली.
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
या सर्वांमध्ये विशेष उल्लेख करण्यासारखं गाणं म्हणजे शास्त्रीय संगीताचा साज असलेलं ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ हे गाणं. या गाण्यामध्ये अत्यंत अवघड शब्द असूनही त्यांनी ते गाणं इतकं सुंदर गायलं आहे की, हे गाणं गाणाऱ्या व्यक्तीला मराठी बोलताही येत नाही यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मराठीमध्ये अमराठी गायकांमध्ये सर्वात जास्त गाणी गायली आहेत ती महेंद्र कपूर आणि त्यांच्याखालोखाल मन्ना डे यांनी.