Bollywood Upcoming Releases: एप्रिल महिन्यात मनोरंजनाची मेजवानी
कोरोना महामारीनंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतंय. शाळा ऑफलाईन सुरु झाल्या आहेत. शिवाय थिएटरही आता पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहेत. त्यात मार्च महिन्यात बहुतांश परीक्षा संपत असल्यामुळे येणाऱ्या महिन्यात चित्रपटगृहांवर गर्दी होण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर पावनखिंड, झुंड, द काश्मीर फाईल्स, RRR, बच्चन पांडे हे चित्रपट चांगली कामगिरी करत असताना एप्रिल महिन्यात मनोरंजनचा खजाना उपलब्ध होणार आहे. हे चित्रपट कोणते याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. (Bollywood Upcoming Releases)
१. रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
महिन्याच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शित होतोय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट “रॉकेट्री: द नंबी इफेक्ट”. या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन माधवन यांनी केलं आहे. या चित्रपटाचं कथानक शास्त्रज्ञ नारायणन प्रिन्स्टन यांच्यावर विद्यार्थी दशेत लावण्यात आलेले हेरगिरीचे खोटे आरोप व त्यानंतरचा त्यांचा प्रवास या सत्यघटनेवर आधारित आहे.
हा चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि तामिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये माधवन यांच्यासह सिमन बग्गा मुख्य भूमिकेत दिसतील.
२. अटॅक
जॉन अब्राहमचा बहुचर्चित अटॅक एक तारखेलाच प्रदर्शित होत असून हा एक ॲक्शन-ड्रामा आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद यांनी केले आहे. चित्रपटाची कथा काल्पनिक असून ती सत्य घटनेवरून प्रेरित असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
अटॅक मध्ये जॉन अब्राहम सोबत जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
३. कौन प्रवीण तांबे?
एक तारखलाच ‘कौन प्रवीण तांबे?’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. प्रवीण तांबे यांनी तब्बल वयाच्या ४१ व्या वर्षी सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये पदार्पण केले. आश्चर्य म्हणजे त्यापूर्वी कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा अगदी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेतही ते खेळले नव्हते.नियतीशी लढा देऊन कारकीर्द घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या खेळाडूचा चित्तथरारक प्रवास यामध्ये दाखविण्यात आला आहे. चित्रपटाचे दिगदर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे.
या चित्रपटात श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असून, परमब्रता चटर्जी आणि अंकुर दाबास यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
४. छत्रीवाली
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून, त्यावरून अनेक उलटसुलट चर्चा चालू झाल्या आहेत. छत्रीवाली हा कॉमेडी-ड्रामा असून याचे दिग्दर्शक आहेत तेजस प्रभा विजय देवस्कर. हा चित्रपट ५ एप्रिलला भारतभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत असून ती कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. पदवीधर असूनही नोकरी न मिळाल्यामुळे हताश होऊन कंडोम टेस्टर म्हणून नोकरी पत्करून ती करताना आणि लपवताना येणारी धमाल यामध्ये बघायला मिळणार आहे.
या चित्रपटात रकुल प्रीत सिंग सोबत सुमित व्यास, अतिश कौशिक, राकेश बेदी आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
५. दसवी
दसवी हा चित्रपट म्हणजे कॉमेडी ड्रामा आहे. यामध्ये अभिषेक बच्चन एका निरक्षर मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तुषार जलोटा.
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
दसवी मध्ये अभिषेक बच्चन सोबत यामी गौतम आणि निम्रत कौर यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसतील. (Bollywood Upcoming Releases)
६. लाल सिंग चढ्ढा
दिनांक १४ एप्रिलला आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट १९९४ साली आलेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे.
या चित्रपटात आमिर खान सोबतच करीना कपूर खान आणि नागा चैतन्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
याव्यतिरिक्त ८ एप्रिल रोजी कंगना रानौत आणि अर्जुन रामपालचा धाकड, सोनू सूदचा फतेह, १० तारखेला मिस रेणू मारिया, १४ तारखेला केजीएफ चॅप्टर 2, २४ एप्रिलला इति, २७ एप्रिलला तलवार 2, २९ एप्रिलला रनवे 34 आणि हिरोपंती 2 प्रदर्शित होत आहेत. (Bollywood Upcoming Releases)
=====
हे देखील वाचा: काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
=====
एकंदरीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी बघितल्यास एप्रिलच्या गर्मितही बॉक्स ऑफिसवर हाऊसफुलचे बोर्ड लागणार असं चित्र दिसू लागलं आहे.