‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
असे सुपरहिट चित्रपट जे आमिरने नाकारायला नको होते…
बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमीर खान. पण या मिस्टर परफेक्शनिस्टने चित्रपट निवडीबाबत मात्र काही ‘इम्परफेक्ट’ निर्णय घेतले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमिरने आयुष्यात असे काही चित्रपट नाकारले, जे त्याच्या करिअरमधले ‘माईलस्टोन’ ठरू शकले असते. कुठले होते हे चित्रपट? चला तर, त्याविषयी जाणून घेऊया. (Movies Rejected By Aamir)
१. डर
१९९३ मध्ये आलेला डर चित्रपट आठवतोय का? हा तोच क… क… क किरण वाला. त्या चित्रपटाने शाहरुख खानच्या करिअरला दिशा दिली. इतकंच नाही, तर त्याला त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठीचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळवून दिलं.
शाहरुखची भूमिका आधी आमिर खानला ऑफर करण्यात आली होती. परंतु, नकारात्मक भूमिकेमुळे आपल्या ‘चॉकलेट हिरो’च्या इमेजला धक्का लागू शकतो या विचाराने आमिर खानने ही भूमिका नाकारली आणि स्वतःसाठीच शाहरुख नावाचा तगडा स्पर्धक निर्माण केला. जरा विचार करा, शाहरुखच्या जागी आमिर कसा वाटला असता? तुम्हाला आवडला असता का? (Movies Rejected By Aamir)
२. साजन
लॉरेन्स डिसूझा यांना त्या काळातील दोन अत्यंत प्रतिभावान अभिनेत्यांना घेऊन चित्रपट बनवायचा होता. संजय दत्तला चित्रपटाची पटकथा आवडली आणि त्याने लगेचच त्यासाठी होकार दिला. परंतु, आमिर खानला मात्र पटकथा फारशी आकर्षक न वाटल्याने त्याने ही ऑफर नाकारली. त्यानंतर ही भूमिका सलमान खानला ऑफर करण्यात आली आणि हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.
३. १९४२ ए लव्ह स्टोरी
१९९४ साली आलेला म्युझिकल हिट “१९४२ ए लव्ह स्टोरी” या चित्रपटामधली अनिल कपूरची भूमिका आधी आमिर खानला ऑफर करण्यात आली होती. खरंतर विधू विनोद चोप्राने त्याला डोळ्यासमोर ठेवूनच हे स्क्रिप्ट लिहिलं होतं. परंतु, आमिर खानने ही भूमिका करण्यास नकार दिल्याने अनिल कपूरच्या खात्यात एका ‘म्युझिकल हिट’ आणि ‘बेस्ट रिव्ह्यूड’ चित्रपटाची भर पडली.
“रूठ ना जाना तुमसे कहू तो.. किंवा कुछ ना काहो गाण्यात आमिर बघायला जास्त आवडला असता. हा पण अनिल कपूरने या चित्रपटामध्ये खूप सुंदर काम केलं आहे यात काही शंकाच नाही. (Movies Rejected By Aamir)
४. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
बॉलिवूडमधील रोमँटिक ब्लॉकबस्टर हिट म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ). हा चित्रपट इतका प्रचंड लोकप्रिय झाला की, सलग १६ वर्षे थिएटरमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत होते. आमिर खान आणि शाहरुख यांच्यातील मतभेदाची सुरुवात याच चित्रपटापासून झाल्याचं बोललं जातं. या चित्रपटामुळेच आमिर खान आजपर्यंत कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहत नसल्याची चर्चाही इंडस्ट्रीमध्ये होत असते.
५. जोश
जर तुम्हाला वाटत असेल की, जोश चित्रपटातील शाहरुखची भूमिका आमिरने नाकरली, तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण जोश चित्रपटामधील शाहरुखची नाही, तर शरद कपूरची भूमिका आमिरला ऑफर करण्यात आली होती. परंतु, आमिर खानला भूमिका न आवडल्याने त्याने या चित्रपटाला नकार दिला आणि प्रेक्षकांचा शाहरुख – आमिरच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायचा दुर्मिळ योगही हुकला. अर्थात, आमिरचा हा निर्णय अगदीच चुकीचा म्हणता येणार नाही.कारण जोश मधली शाहरुखची भूमिका जास्त अपिलिंग होती. (Movies Rejected By Aamir)
====
हे देखील वाचा: मित्रांचा गोवा प्लॅन म्हणजे दिल चाहता है…
====
६. नायक
एका दिवसाचा मुख्यमंत्री ही अनोखी कन्सेप्ट घेऊन आलेला चित्रपट ‘नायक’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. यामध्ये राणी आणि अनिल कपूरची केमिस्ट्रीही सुंदर होती. यामधली अनिल कपूरची भूमिका आधी आमिर खानला ऑफर करण्यात आली होती. परंतु, आमिरला स्क्रिप्ट न आवडल्यामुळे त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला. आणि एक ब्लॉकबस्टर हिट हातातून गमावला.
====
हे देखील वाचा: चिरतारुण्य म्हणजे अनिल कपूर – बॉलिवूडचा एकदम “झक्कास” अभिनेता!
====
७. स्वदेस
२००१ साली आलेल्या गेम-चेंजर ब्लॉकबस्टर ‘लगान’ चित्रपटाच्या यशानंतर, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आमिरला त्यांच्या पुढील चित्रपटासाठी आमिरची निवड केली होती. हा चित्रपट म्हणजे सामाजिक विषयावर आधारित ‘स्वदेस’ हा चित्रपट. परंतु, काही कारणांमुळे आमिर हा चित्रपट करू शकला नाही.
‘स्वदेस’ हा बॉक्स ऑफिसवर पैसा आणि गर्दी खेचेल, असा चित्रपट नव्हता. परंतु या चित्रपटाचा विषय ‘क्लासिक’ प्रकारात मोडणारा होता. आमिर क्लासिक भूमिकांसाठी खरंतर सदैव तयार असतो. परंतु, स्वदेश चित्रपटाच्या वेळी मात्र तो योग आला नाही. आणि चित्रपट शाहरुखच्या खात्यात जमा झाला. हा चित्रपट शाहरुखच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हे भाग्य खरंतर आमिरच्या नशिबी आले असते. (Movies Rejected By Aamir)
तर, हे होते क्लासिकल आणि सुपरहिट चित्रपट ज्यामध्ये आपण आमिर खानला बघू शकलो असतो. यातल्या काही भूमिकांमध्ये आमिर खान आहे अशी कल्पना केल्यास तुम्हाला काय वाटतंय? आमिर या भूमिकांसाठीची योग्य निवड होती? आमिरने या भूमिका नाकारून चूक केली की, आमिरचा निर्णय योग्य होता?