मी वसंतराव: अवीट गोडीचा सुरेल प्रवास
संगीत! आजही भारतीय रसिकांना वेड आहे ते संगीताचं. महाराष्ट्राला तर संगीत साधनेची विशेष देणगी लाभलेली आहे. याच देणगीमधलं एक अनमोल रत्न म्हणजे पं. वसंतराव देशपांडे. पंडितजींच्या गाण्यांनी रसिकांना वेड लावले. नाट्यसंगीत असो वा भावगीत वसंतरावांचे स्वर रसिकांच्या मनावर राज्य करू लागले. याच वसंतराव देशपांडेच्या आयुष्यावर आधारित चित्रपट म्हणजे ‘मी वसंतराव’! (Me Vasantrao Review)
या चित्रपटात पं. वसंतराव देशपांडे यांचा नातू राहुल देशपांडे याने वसंतरावांची भूमिका केली आहे. हा, आता त्याला ही भूमिका जमली आहे किंवा नाही, हा विचार करायला प्रेक्षकांना वेळच मिळत नाही इतक्या सहज हा चित्रपट आणि पं. वसंतरावांचं आयुष्य रसिकांच्या मनात रेखाटलं जातं. आता ही राहुलच्या भूमिकेची पोचपावती आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर, कोणी काहीही म्हणो, पण ही भूमिका राहुल सोडून इतर कोणालाही इतक्या प्रभावीपणे साकारणं शक्य झालं नसतं.
एखादया व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट बनवत असताना सर्वात मोठं आव्हान असतं ते वेळेचं. हे आव्हान दिग्दर्शक निपुण अविनाश धर्माधिकारी यांनी समर्थपणे पेललं आहे. वसंतरावांचा बालपणापासूनचा जीवनप्रवास उलगडून दाखवताना चित्रपट कुठेही कंटाळवाणा होणार नाही, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. काही ठिकाणी चित्रपट काहीसा संथ झाल्यासारखा वाटू शकतो. पण रटाळ मात्र होत नाही. (Me Vasantrao Review)
पं. वसंतराव यांच्या आयुष्याचे पैलू उलगडून दाखवताना आयुष्यातील महत्वाचे प्रसंग आणि व्यक्तींना अधोरेखित करण्यात आलं आहे. नागपुरात गेलेलं बालपण, तारुण्यामधला पुण्यातील संघर्षाचा काळ, नोकरी सोडून स्वतःच्या स्वरांवर विश्वास ठेवण्याचा निर्णय आणि चाळिशीनंतर घडवलेली यशस्वी कारकीर्द, हे सर्व प्रसंग दाखवताना चित्रपट एक क्षणही ट्रॅक सोडत नाही. वसंतरावांचं आयुष्य दाखवताना दिग्दर्शक आणि कलाकारांनीही ‘त्या त्या’ काळाचं भान ठेवलं आहे. प्रत्येक काळातील भाषा, जीवनशैली दाखवताना दिग्दर्शक अजिबातच गोंधळलेला नाही.
कलाकारांच्या बाबतीत बोलायचं, तर मुळात कलाकारांची निवड अत्यंत ‘परफेक्ट’ आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत अनिता दाते यांनी जीव ओतून काम केलं आहे. अमेय वाघ याने साकारलेली दीनानाथ मंगेशकर यांची छोटी भूमिकाही लक्षात राहण्यासारखी. वसंतरावांच्या पत्नीचा (कौमुदी वालोकर) सहजसुंदर वावर आणि पाहुण्या भूमिकेतील बेगम अख्तर (दुर्गा जसराज) रसिकांच्या मनावर छाप पाडून जातात. (Me Vasantrao Review)
आवर्जून उल्लेख करायलाच हवा तो म्हणजे पुलंच्या भूमिकेचा. अभिनेता पुष्कराज चिरपुटकर याने ही भूमिका समर्थपणे निभावली आहे. त्याची आणि राहुलची (पुलं आणि वसंतराव) केमिस्ट्री भन्नाट जुळून आली आहे. (Me Vasantrao Review)
संगीताच्या बाबतीत बोलायचं तर, हा चित्रपट एका गायकाच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटात एकूण २२ गाणी आहेत. सर्वच गाणी छान जमून आली आहेत. पण विशेष आकर्षक आणि आश्चर्यकारक ठरली आहे ती राहूलने म्हटलेली लावणी. या व्यतिरिक्त ‘राम राम’ हे गाणं इतकं सुंदर जमून आलं आहे की, चित्रपट संपल्यानंतर रसिक प्रेक्षक हे गाणं गुणगुणतच घरी जातील.
थोडक्यात काय, तर सांगीतिक मेजवानी म्हणजे मी वसंतराव, चाळिशीनंतर घडलेल्या सुरेल कारकिर्दीची कहाणी म्हणजे मी वसंतराव, आलाप आणि तानांसोबत लावणीचा ठसका आणि आयुष्य घडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांची कहाणी म्हणजे मी वसंतराव!
चित्रपट: मी वसंतराव
दिग्दर्शक: निपुण अविनाश धर्माधिकारी
कलाकार: राहुल देशपांडे, पुष्कराज चिरपुटकर, अनिता दाते, कौमुदी वालोकर, अमेय वाघ, इ.
दर्जा: चार स्टार