‘या’ कारणामुळे शर्माजी नमकीन चित्रपटातील ऋषी कपूर यांची उर्वरित भूमिका रणवीर साकारू शकला नाही…
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटसृष्टीवर ५० वर्षांहूनही अधिक काळ राज्य करणाऱ्या कपूर खानदानामध्ये जन्मलेल्या या चॉकलेट बॉयने आपली कारकीर्द सुरु केली ती बॉबी या चित्रपटापासून. यानंतर त्यांची बनलेली ‘रोमँटिक हिरो’ ही इमेज पुढे कित्येक वर्ष कायम होती.
अर्थात बॉबी चित्रपटाच्या आधी ऋषी कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात काम केलं होतं. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. एके दिवशी राज कपूर यांनी जेवताना आपल्या पत्नीकडे ऋषी कपूरला मेरा नाम जोकर चित्रपटात भूमिका देण्याबद्दलचा विचार बोलून दाखवला. त्यावर त्यांच्या पत्नीने, “त्याच्या अभ्यासात अडथळा येत नसेल तर हरकत नाही”, असं म्हणून परवानगी दिली आणि ऋषी कपूर यांच्या बॉलिवूडमधल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला.
बॉबी चित्रपटानंतर रोमँटिक हीरोच्याच भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र त्यांना विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. अशीच एक भूमिका म्हणजे शर्माजी नमकीन या चित्रपटातील भूमिका. परंतु, दुर्दवाने हा चित्रपट अर्धवट सोडून ऋषी कपूर यांनी या दुनियेला अलविदा म्हटलं.
शर्माजी नमकीन या चित्रपटाचे शुटींग चालू असतानाच ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आलं. त्यांनतर ते कर्करोगावरील उपचारासाठी अमेरिकेला गेले. तिथून परत आल्यावर ३० एप्रिल २०२० रोजी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये त्यांचं निधन झालं.
ऋषी कपूर यांचं निधन झालं तेव्हा शर्माजी नमकीन या चित्रपटाचं बऱ्यापैकी शूटिंग झालेलं होतं. त्यामुळे निर्मात्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली. परंतु, निर्मात्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्यावर चित्रित झालेला भाग तसाच ठेवून उर्वरित भागासाठी परेश रावल यांची निवड केली व चित्रपट पूर्ण केला.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहेत की, परेश रावल यांच्या आधी निर्मात्यांनी रणवीर कपूरला उर्वरित भागाचे चित्रीकरण पूर्ण करण्याची विनंती केली होती. परंतु, त्याने यासाठी नकार दिला. यामध्ये काही तथ्य आहे की ही केवळ अफवा आहे?
याबाबत स्वतः रणबीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून खुलासा केला आहे. यामध्ये त्याने सांगितलं, “ही गोष्ट खरी आहे की, ‘शर्माजी नमकीन’च्या निर्मात्यांनी उर्वरित चित्रपट पूर्ण करण्यासाठी संपर्क केला होता. यासंदर्भात बोलणंही झालं होतं. त्यानंतर माझे काही फोटोग्राफ्स मी त्यांना दिले.
=====
हे देखील वाचा: ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन!
=====
त्या आधारे व्हीएफएक्स वापरून चित्रपट पूर्ण करता येईल का, यासाठी त्यांनी प्रयत्नही केला. पण ते शक्य होणार नव्हतं. तसंच, ही भूमिका साकारण्यासाठी त्यांनी प्रोस्थेटिक्स वापरण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्नही अयशस्वी ठरला. व्हीडीओमध्ये रणवीर कपूरने आपल्या वडिलांची अर्धवट राहिलेली भूमिका पूर्ण केल्याबद्दल आवर्जून परेल रावल यांचे आभार मानले.
एका चित्रपटातील एकाच भूमिकेसाठी दोन अभिनेत्यांनी काम करणं हे बॉलिवूडच्या इतिहासात प्रथमच घडलं आहे. परंतु, मराठी चित्रपटात मात्र हा प्रकार आधीही झाला आहे. २००६ साली आलेल्या ‘मातीच्या चुली’ या चित्रपटाच्या बाबतीतही असाच प्रसंग घडला होता. चित्रपटाचं बऱ्यापैकी चित्रीकरण पूर्ण होत आलं होतं आणि अचानक सुधीर जोशी यांचं निधन झालं. त्यामुळे सुधीर जोशी यांची उर्वरित भूमिका आनंद अभ्यंकर यांनी पूर्ण केली.
शर्माजी नमकीन हा चित्रपट ३१ मार्च रोजी अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ऋषी कपूरची शेवटची आठवण असणाऱ्या या चित्रपटाने रसिकांच्या मनाची चांगलीच पकड घेतली आहे. IMDB या प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला ८ पेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहेत.