दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे – हलक्या फुलक्या प्रेमकहाणीच्या पडद्यामागच्या रंजक कथा
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा असा चित्रपट आहे ज्याने इतिहास घडवला. राज आणि सिमरनची हलकी फुलकी टिपिकल प्रेमकहाणी, परदेशातील लोकेशन्स आणि पंजाबी तडका मारल्यामुळे ही रेसिपी एकदम भन्नाट जमून आली. या चित्रपटातील “जा सिमरन जा…जिले अपनी जिंदगी” हा डायलॉग तर आजही तितकाच लोकप्रिय आहे.
१९९५ साली आलेला हा चित्रपट एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट आहे. शाहरुख – काजोल ही सुपरहिट जोडी, जतीन – ललित यांचं संगीत आणि युरोपमधली लोकेशन्स अशी सगळी भट्टी उत्कृष्टरित्या जमून आल्यावर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लोकांना आवडला नसता, तर नवल होतं.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने शाहरुखला खऱ्या अर्थाने ‘रोमँटिक हिरो’ ही ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्याला बाजीगर, डर, अंजाम, कभी हा कभी ना अशा चित्रपटातील नकारात्मक आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्हिलनच्या इमेजमधून बाहेर पडणं आवश्यक होतं. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील राजच्या भूमिकेने त्याला ही संधी दिली आणि त्याने या संधीचं अक्षरश: सोनं केलं. हा चित्रपट बॉलिवूडमधला सर्वात जास्त काळ थिएटरमध्ये राहिलेला चित्रपट आहे.
त्या वर्षीच्या म्हणजेच ४१ व्या फिल्मफेअरची बहुतांश अवॉर्ड्स ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला मिळाली होती. दुर्दैवाने या म्युझिकल हिटला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचं अवॉर्ड मिळालं काही. कारण ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला तगडी स्पर्धा होती ती ‘रंगीला’ या चित्रपटाची. त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचं अवॉर्ड रंगीला या चित्रपटासाठी ए आर रहमान यांना मिळालं होतं.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट पडद्यावर पाहायला जितका रंजक आहे तितकेच रंजक या चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से आहेत. त्याबद्दलच आज जाणून घेऊया.
शाहरुख नाही आमिर होती पहिली पसंती
हो! राज या व्यक्तिरेखेसाठी दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी आधी आमिर खानची निवड केली होती. परंतु, आमिरने या भूमिकेला नकार दिल्याने ही भूमिका शाहरुखला मिळाली. डर आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ यामधील भूमिकांना दिलेला नकार ही आमिरच्या कारकिर्दीतली सर्वात मोठी चूक समजली जाते. या दोन्ही चित्रपटांनी शाहरुखला स्टारडम मिळवून दिलं.
=====
हे देखील वाचा : असे सुपरहिट चित्रपट जे आमिरने नाकारायला नको होते…
=====
शाहरुख ऐवजी राजच्या भूमिकेत सैफ अली खान दिसू शकला असता
आमिर खाननंतर शाहरुख खानलाही चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे त्याने नकार दिला होता. परंतु, दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी शाहरुखला विनंती केली आणि अखेर त्याने होकार दिला. जर शाहरुख तयार झाला नसता, तर दिग्दर्शकांची तिसरी पसंती होती सैफ अली खान.
मेरे ख्वाबों में जो आये गाण्याच्या शूटिंग आणि काजोलची अस्वस्थता
या चित्रपटातील ‘मेरे ख्वाबों में जो आये’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान काजोल अस्वस्थ झाली होती. परंतु, दिग्दर्शक आदित्य चोप्राने तिची समजूत काढली आणि पडद्यावर बघताना हे गाणं उत्कृष्टच वाटेल, हे पटवून दिलं आणि मग शूटिंग व्यवस्थित पार पडलं.
शाहरुखने शेतकऱ्यांशी साधला हरियाणवी भाषेत संवाद
चित्रपटातील ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे प्रसिद्ध गाणे गुरगावमधील मोहरीच्या शेतात शूट करण्यात आले. त्यावेळी तिथल्या शेतकऱ्यांनी गाण्याच्या शूटिंगला विरोध केला कारण शूटिंगदरम्यान त्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालं होतं. त्यानंतर शाहरुखने शेतकऱ्यांशी हरियाणवी भाषेत बोलून त्यांना शांत करून त्यांची समजूत घातली.
शाहरुखचे नाव आणि लेदर जॅकेट
या चित्रपटातील शाहरुखचे नाव ‘राज’ हे शोमन राज कपूरच्या नावावरून घेतले होते. तर, या चित्रपटात शाहरुख खानने परिधान केलेलं लेदर जॅकेट उदय चोप्राने बेकर्सफील्डमधील हार्ले-डेव्हिडसन स्टोअरमधून $400 ला खरेदी केले होते.
काजोलचे खरेखुरे ‘एक्सप्रेशन्स’
‘रुक जा ओ दिल दिवाने’ या चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान काजोलला हे माहिती नव्हते की, गाण्याच्या शेवटी शाहरुख खान तिला खाली टाकणार आहे. दिग्दर्शक आदित्य चोप्राने ही गोष्ट जाणीवपूर्वक तिला सांगितली नव्हती. कारण त्याला काजोलची खरी एक्सप्रेशन शूट करायची होती. आणि त्याचा हा प्लॅन यशस्वी झाला. गाण्यात शाहरुखने टाकल्यावर काजोलने दिलेलं एक्स्प्रेशन हे तिचं खरंखुरं एक्स्प्रेशन आहे.
=====
हे देखील वाचा: हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली…
=====
कुलजितची भूमिका मिळणार होती अरमान कोहलीला
आता याला अरमान कोहलीचे दुर्दैव म्हणा किंवा परमीत सेठीचे नशीब म्हणा, पण या चित्रपटात सिमरनचा मंगेतर कुलजीतच्या भूमिकेसाठी आधी अरमान कोहलीची निवड जवळपास निश्चित झाली होती. पण परमीत सेठी बूट, जीन्स आणि वास्कट परिधान करून ऑडिशनला आला आणि दिग्दर्शक आदित्य चोप्राला त्याच्या मनातला कुलजीत सापडला आणि ही भूमिका परमीतला मिळाली.
कोणताही चित्रपट तयार होत असताना पडद्यामागे अशा अनेक गोष्टी, अनेक किस्से घडत असतात. यामध्ये कोणाचं नशीब उजळतं, कोणाचं नशीब घडतं, तर कोणाचं बिघडतं. या शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात. असो.
बाकी काही म्हणा पण, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इतिहास घडवला. या चित्रपटानंतरच सिनेसृष्टीत अलवार प्रेमकथांची लाट आली. आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडत्या चित्रपटांच्या ‘लिस्टमध्ये’ असणार यात शंकाच नाही.