मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
रामायण – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!
तो काळच वेगळा होता. टेलिव्हिजन हा प्रकार तेव्हा घराघरात विराजमान झाला नव्हता आणि दूरदर्शन वगळता इतर कोणतंही चॅनेल अस्तित्वात नव्हतं. संध्याकाळी ७ च्या सुमारास कुटुंबातले सर्वजण घरात असायचे आणि शनिवार, रविवारकडे तेव्हा ‘विकेंड’ म्हणून नाही, तर सुट्टी म्हणून बघितलं जात असे.
त्यावेळी चाळ, सोसायटी, वाडा अशा ठिकाणी नांदणाऱ्या अनेक कुटुंबापैकी एखाद दुसऱ्या कुटुंबातच टीव्ही असायचा. मग आसपासच्या घरातील मुलं आणि वृद्ध माणसं बातम्या, क्रिकेट मॅच, चित्रपट बघायला तिथेच जमत असत. अर्थात तो काळ कोणाकडेही जाताना परवानगी घेऊन जायचा नव्हताच मुळी.
अशा वातावरणात २५ जानेवारी १९८७ साली रविवारी सकाळी दूरदर्शनवर ‘रामायण’ नावाची मालिका सुरु झाली आणि अल्पावधीतच लोकप्रियही झाली. त्यावेळी या मालिकेच्या प्रक्षेपणाच्या वेळेत रस्ते ओस पडू लागले आणि ज्या घरांत टीव्ही होते ती घरे ‘हाऊसफुल’ होऊ लागली, तर काही जणांच्या घरी नवीन टीव्हीची खरेदीही झाली.
“सीता – राम चरित अतिपावन…” या मधुर शीर्षक गीताने सुरु होणाऱ्या या मालिकेने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते यातील ‘कंटेंट’मुळे. मूळ वाल्मिकी रामायण जेव्हा राम रावणाचा वध करून, वनवास संपवून सीतेला अयोध्येत परत घेऊन येतो तिथेच संपते. परंतु, मालिकेची लोकप्रियता आणि लोकाग्रहास्तव तुलसीदास रामायणामध्ये लिहिलेला रामायणाचा उत्तरार्ध मालिकेला पुढे जोडून ‘उत्तर रामायण’ या नावाने प्रसारित करण्यात आला. केवळ ७८ भागांची ही मालिका म्हणजे मालिकाविश्वातली एक अविस्मरणीय कलाकृती ठरली.
उत्तर रामायणामध्ये लव – कुश यांच्या जन्मापासून सीतेच्या भूमिगत होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. मालिकेच्या शेवटच्या भागात “हम कथा सुनाए राम सकल गुण धाम कि…” या लव – कुश यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यामध्ये संपूर्ण रामायण दाखवण्यात आलं आहे. या गाण्याच्या वेळी तमाम महाराष्ट्रातील जनतेला गीत रामायणातील “स्वये श्री राम प्रभू ऐकती…” या गाण्याची तीव्र आठवण आली असेल. अर्थात दोन्ही गाण्यांच्या वेळी डोळे पाणवतातच.
या मालिकेबाबत एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कोणत्याही अतर्क्य गोष्टी न दाखवता फक्त आणि फक्त सत्य दाखविण्याची तळमळ मालिकेमधून दिसत होती. मालिकेतील काही भागांनंतर तर, रामानंद सागर स्वतः येऊन ग्रंथांमधील पान क्रमांकांचे दाखले देऊन ‘संदर्भासहित स्पष्टीकरण’ देत असत.
कोणत्याही कलाकृतीमध्ये ‘कंटेंट’ जितका महत्वाचा असतो तितकीच महत्वाची असते ती पात्रनिवड. रामायणामधील प्रत्येक पात्राची निवड अचूक होती. विशेष करून सीतेच्या भूमिकेमधील ‘दीपिका’, अरुण गोविल यांचा राम आणि दारासिंग यांनी साकारलेला हनुमान या भूमिका इतक्या लोकप्रिय झाल्या की, त्यांच्या भूमिका हीच त्यांची ओळख बनली. आजही लोकांच्या मनात याच चेहऱ्यांनी राम, सीता आणि हनुमानाचे मूर्त रूप धारण केले आहे. अयोध्या किंवा आसपासच्या ठिकाणी राम – सीता म्हटल्यावर अरुण गोविल – दीपिका यांचेच फोटो बघायला मिळतात. एवढी प्रचंड लोकप्रियता क्वचितच कोणाला मिळत असेल.
अरुण गोविल यांनी साकारलेला राम प्रेक्षकांना इतका आवडला की, लोक त्यांना ‘राम’ सोडून इतर कोणत्याही भूमिकेमध्ये स्वीकारायलाच तयार नव्हते. यामुळे या भूमिकेनंतर त्यांच्या ‘फिल्मी’ करिअरला कायमचा ब्रेक लागला.
या मालिकेपासूनच पौराणिक मालिकांच्या पर्वाला सुरुवात झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या मालिकेनंतर महाभारत, कृष्णा, ओम नमः शिवाय अशा पौराणिक विषयांवर आधारित अनेक मालिका येऊन गेल्या. या सर्व मालिकाही बऱ्यापैकी लोकप्रिय झाल्या होत्या.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये ‘रामायण’ मालिकेचं पुनःप्रसारण करण्यात आले. यावेळी तर आधीपेक्षाही कित्येक पटींनी जास्त लोकप्रियता या मालिकेला मिळाली. २५ जानेवारी १९८७ पासून ते २८ मार्च २०२० पर्यंत जगात बरीच उलथापालथ झाली होती. मनोरंजन विश्वात झालेल्या तांत्रिक सुधारणांसह अनेक चॅनेल्स दाखल झाली होती. दूरदर्शन फक्त नावालाच उरलं होतं. पण रामायणाच्या पुनःप्रक्षेपणाने दूरदर्शनला नवसंजीवनी दिली. विशेष म्हणजे या मालिकेच्या पुनःप्रसारणाची परवानगी देताना रामानंद सागर यांच्या कुटुंबीयांनी एक पैसाही घेतला नाही.
ज्या दिवशी मालिकेचे पुनःप्रसारण करण्यात आलं त्या दिवशी दूरदर्शनचा चॅनेल नंबर माहिती नसल्यामुळे लोकांनी दूरदर्शनच्या वेबसाईटवर जाऊन मालिका बघण्याचा प्रयत्न केला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आल्यामुळे दूरदर्शनची वेबसाईट क्रॅश झाली.
=====
हे देखील वाचा: रामायणावर आत्तापर्यंत अनेक मालिका येऊन गेल्या एमएक्स प्लेअरवर सुरु होणाऱ्या रामयुगमध्ये काय असणार नाविन्य??
=====
त्यावेळी गुगल सर्चवर ही मालिका ‘टॉप सर्च’ मध्ये आली. इतकंच नव्हे तर, सर्व रेकॉर्डस् मोडीत काढून जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला ‘टीव्ही शो’ म्हणून या मालिकेची नोंद झाली. मालिकेमधील सर्व कलाकार पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्धीच्या झोतात आले.
या मालिकेच्या पुनःप्रसारणाने अलीकडच्या काळात सोशल मीडियावर रावणाच्या उदात्तीकरणाबद्दल फिरत असणाऱ्या पोस्टना जणू एक प्रकारचं आव्हानच दिलं. कारण रामानंद सागर यांनी संपूर्ण अभ्यास करून आणि वेळोवेळी विविध ग्रंथांमधले पुरावे देऊन मालिका सादर केली होती. त्यामुळे त्यांची माहिती अधिकृत असणार यावर कोणाचेही दुमत होऊ शकत नाही.
नव्वदच्या दशकामध्ये कोणतेही स्पेशल इफेक्टस न वापरता तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कमी साधनसामुग्रीच्या उप्लब्धतेमध्ये बनलेली जी पौराणिक मालिका ३३ वर्षांनंतर पुनःप्रसारित होऊनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवते; यावरून ती मालिका किती उच्च दर्जाची कलाकृती असेल, याचा अंदाज येऊ शकतो.
या मालिकेच्या बाबतीत एवढंच सांगावंसं वाटतंय, झाले बहू, होतील बहू, पण या सम हीच!
4 Comments
मस्त लिहिलंय, मी या घटनेचा साक्षीदार आहे प्रचंड लोकप्रिय अशी मालिका!
मस्त लिहिलंय, मी या घटनेचा साक्षीदार आहे प्रचंड लोकप्रिय अशी मालिका!
अत्यंत सुरेख आणि नेमक्या शब्दात लेख लिहिला आहे . तो काळ आणि त्या काळचे कलाकार कुठेही बीभत्स, हिडीस वाटायचे नाही म्हणजे शुरपणाखा ही राक्षसी असल्याने तिची भीती वाटायची पण किळस नाही वाटली कधी. दिग्दर्शक त्यांच्या मर्यादा ओळखून होते आणि कायम मर्यादांचा मान राखत मालिका दिग्दर्शित करायचे. सोनेरी काळ होता तो आणि तुमच्या या सदरामुळे जुन्या सोनेरी काळाची नक्कीच आठवण येईल.
खूप छान लिहिलं आहे… वाचतांना सुद्धा मंगल भवन कानावर पडत होतं… तो पहिला काळही वेगळाच होता आणि पुनर्प्रसारणाचा काळ देखील काही औरच होता… यावेळी बघितलेलं रामायण हे अधिक लक्षात राहील.