दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Exclusive Interview: दिग्पाल लांजेकर सांगतायत शेर शिवराज चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे भन्नाट किस्से
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आठ चित्रपट (अष्टक) काढायचे ध्येय घेतलेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा या अष्टकामधला चौथा चित्रपट ‘शेर शिवराज (Sher Shivraj)’ हा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांचा सारांश –
१. ‘शेर शिवराज’ हा चित्रपट म्हणजे अफझल खान वधाची कहाणी आहे, हे तर आता समजलं आहे. पण, यामध्ये तुमच्या इतर चित्रपटांप्रमाणे वेगळी आणि सर्वसामान्यांना माहिती नसेलली कुठली गोष्ट बघायला मिळणार आहे?
दिग्पाल: ही कथा आपण सर्वानी लहानपणापासून वाचलेली आहेच. पण, शेर शिवराजमध्ये (Sher Shivraj) मी ही कथा वेगळ्या दृष्टिकोनातून मांडायचा प्रयत्न केला आहे. ही कथा दाखवताना मानसशास्त्रीय युद्ध म्हणजेच ज्याला आपण ‘सायकॉलॉजिकल वॉरफेअर’ म्हणतो, ते कसं होतं, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एवढं मोठं सैन्य घेऊन निघालेला अफझल खान महाराजांना शेवटी एकटा भेटला. या भेटीपर्यंत त्याला टप्प्याटप्प्याने कसं एकटं पाडलं गेलं, हे या चित्रपटामध्ये बघायला मिळेल.
२. या चित्रपटामध्ये तुम्ही स्वतः बहिर्जी नाईक यांची भूमिका करताय. आधीच्या प्रत्येक चित्रपटामध्ये ही व्यक्तिरेखा वेगवेगळ्या अभिनेत्यांनी रंगवली आहे. मग याचवेळी स्वतःहुन ही भूमिका करावी, असं तुम्हाला का वाटलं?
दिग्पाल: मला वाटलं म्हण्यापेक्षा मी प्राप्त परिस्थितीला सामोरं गेलो. कलाकारांची व्यस्तता तुम्हाला माहिती आहेच. एकाच वेळी कलाकार अनेक गोष्टी करत असतात. शिवाय ज्या वेगाने मी चित्रपट बनवतोय त्यामध्ये कलाकार उपलब्ध न होणं ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. परंतु, बहिर्जी नाईक हे तसं मुख्य पात्र असल्यामुळे ते कोणी साकारायचं, हा प्रश्न आमच्यासमोर होता. पण माझे सिनिअर मित्र चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृणाल ताई यांच्या सगळ्यांच्या आणि त्याचबरोबर निर्मात्यांच्या आग्रहाखातर ही भूमिका मी स्वतःच करायचा निर्णय घेतला.
३. दिग्दर्शक आणि कलाकार या दोन्ही भूमिका एकाचवेळी निभावणं आव्हानात्मक वाटलं का?
दिग्पाल: खूप मोठं आव्हान होतं कारण दोन्ही भूमिका मोठ्या आहेत. दिग्दर्शक म्हणून संपूर्ण चित्रपट सांभाळायचा होता आणि बहिर्जी नाईकांची भूमिकाही तशी मोठी आहे. भूमिका साकारताना मुळात त्या भाषेचा अभ्यास आधीपासूनच होता. तसंच ही भूमिका माहिती असल्याने बऱ्यापैकी तयारी होती.
दिग्दर्शक म्हणून यावेळी भूमिकेत एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे बहिर्जी नाईक यांच्यातला गमतीपणा कमी करून त्यांना जास्त स्ट्रॉंग दाखवलं आहे. परंतु, एक गोष्ट नक्की की, सर्व तंत्रज्ञ आणि सहकलाकारांच्या सहकार्याने या दोन्ही भूमिका मी निभावू शकलो.
४. आधीच्या चित्रपटांप्रमाणे शेर शिवराज (Sher Shivraj) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कुठला अनोखा, वेगळा असा अनुभव आला होता का?
दिग्पाल: प्रत्येक चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी छत्रपतींचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, असा अनुभव आम्हाला येतोच. तसाच तो याही वेळी आला. क्लायमॅक्सचा शेवटचा सिन आम्हाला रत्नागिरीमध्ये पूर्णगड किल्ल्यावर शूट करायचा होता. पण नेमका सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाला.
शेवटचा एक सिन फक्त बाकी होता आणि पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. आम्ही हवालदिल झालो होतो कारण हा सिन त्याच लोकेशनवर शूट होणं आवश्यक होतं. काय करायचं काहीच समजत नव्हतं. पण त्यावेळी चिन्मय मांडलेकर आणि समीर धर्माधिकारी यांनी संगितलं, “आपण तयार राहूया आणि पाऊस थांबला की, शूटिंग उरकून घेऊ.” त्याप्रमाणे आम्ही तयार राहिलो, पण ४ वाजले तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता.
आम्हाला हा सिन दिवसाच्या उजेडातच शूट करायचा असल्यामुळे आमच्या हातात फक्त १ तास उरला होता कारण नंतर काळोख व्हायला सुरवात झाली असती. शेवटी सगळ्यांनी मिळून महाराजांची प्रार्थना केली आणि अक्षरश: विश्वास बसणार नाही, पण १५ मिनिटांसाठी पाऊस थांबला. आणि त्या १५ मिनिटात २५० जणांच्या टीमने इतकं वेगाने काम केलं की, दिवसभराचा सिन त्या १५ मिनिटात शूट केला. असे खूप अनुभव येतात जिथे महाराज आपल्यासोबत आहेत, असं कायम वाटतं.
५. चित्रपटाची कथा लिहिताना तुम्ही रात्री- अपरात्री कधीही गड किल्ल्यांवर जाऊन ती लिहिता. तर अशावेळी कुठला अभूतपूर्व अनुभव आला आहे का?
दिग्पाल: खरं सांगायचं तर, ती एक अनुभूती असते. यामध्ये मला आवडलेली अनुभूती म्हणजे लिहिताना तंद्री लागते आणि त्यामध्ये अनेक गोष्टी सुचतात. अनेकदा तर लिहून झाल्यावर मला प्रश्न पडतो की, हे कधी लिहिलं आपण? असा खास अनुभव फर्जंद चित्रपटाच्या वेळेस आला होता. फर्जंद चित्रपट सोडल्यास बाकी चित्रपटांचे लेखन मी गड किल्ल्यावर जाऊन केलेलं नाही. पण त्यांचं चिंतन मात्र त्या ठिकाणी जाऊन केलं होतं.
===================================================================
हे ही वाचा: मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का?
====================================================================
६. या अष्टकामुळे दिक्पाल लांजेकर आणि ऐतिहासिक चित्रपट असं एक समीकरण बनलंय, तर हे समीकरण भविष्यात बदलावं, असं वाटतंय का?
दिग्पाल: नाही, काहीच गरज नाही. माझे अनेक मित्र मला काळजीने म्हणतात, “अरे तुझ्यावर शिक्का बसेल.” त्यावेळी मला वाटतं ठीक आहे ना, हा शिक्का काय वाईट आहे? अर्थात, या व्यतिरिक्त कराव्याशा वाटाव्यात अशा भरपूर गोष्टी आहेत, पण मी हे जे व्रत स्वीकारलंय, ते पूर्ण करणं हे इतिकर्तव्य आहे.
तुम्ही आयुष्यात नेहमी धावतच असता. मग ते पैसे मिळविण्यासाठी असो किंवा यश मिळविण्यासाठी. कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर, त्यांना नेहमी नाविन्याची आस असते. पण कराल तेवढं कमी असतं. “स्काय इज द लिमिट” त्यामुळे हे धावणं संपत नाहीच. पण, आपण एक ध्येय निश्चित करून आधी ते पूर्ण करूया मग पुढचं ध्येय ठरवूया, असा विचार मी करतोय.
७. कोरोनाच्या कारणामुळे पावनखिंड चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं. त्याच दरम्यान शेर शिवराज चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं होतं. त्यावेळी दोन्ही चित्रपटांचं प्रदर्शन एकाच वेळी करावं लागलं, तर काय करायचं ही काळजी वाटत होती का?
दिग्पाल: नाही. कारण मी ठरवलंच होतं की, पावनखिंडला प्राथमिकता द्यायची. कारण पावनखिंडच्या निर्मात्यांनी जवळपास दोन वर्ष वाट बघितली होती आणि सगळा ताण सहन केला होता. शेर शिवराजचा (Sher Shivraj) निर्माता मी स्वतः असल्यामुळे प्रदर्शनाच्या बाबतीत पावनखिंड चित्रपटालाच प्राधान्य द्यायचं निश्चित होतं.
८. पुढे जाऊन हे अष्टक शाळांमध्ये दाखवायचा विचार आहे का?
दिग्पाल: शाळा स्वतः पुढाकार घेऊन मुलांना पावनखिंड दाखवत आहेत. अगदी खेड्यापाड्यातल्या मोठ्या संस्थांच्या शाळाही ५ ते ६ हजार विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत. अनेकदा आम्ही विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात तिकिटं उपलब्ध करून दिली आहेत.
शेर शिवराजच्या बाबतीत कर्णबधिर मुलांकडून एक कमेंट समोर येतेय की, आम्हाला शेर शिवराज हा चित्रपट मराठी सब टायटलसह पहायचा आहे. त्यामुळे शेर शिवराज (Sher Shivraj) ओटीटी प्लॅटफॉर्मवर देताना यासाठी काही करता येईल का, हा विचार चालू आहे.
९. शाळांमध्ये अनेक मुलांना इतिहास कंटाळवाणा वाटतो. तो म्हणावं तेवढ्या प्रभावीपणे आणि रंजकपणे शिकवला जात नाही. तर इतिहासाचे अभ्यासक म्हणून तुमचं मत काय आहे?
दिग्पाल: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इतिहासाचा अभ्यासक किंवा इतिहासतज्ज्ञ नाही कारण या व्यक्तींना मी खूप जवळून अनुभवलं आहे. त्यामुळे इतिहासतज्ज्ञ किंवा इतिहास अभ्यासक काय असतो, हे मला चांगलं माहिती आहे. हा! या अष्टकाच्या निमित्ताने अभ्यास चालू आहे. पण मी तज्ज्ञ नाही. अजूनही वाचक किंवा विद्यार्थीच आहे. मुलांना आणि एकूणच समाजाला इतिहास सहज सोप्या पद्धतीने समजावा हाच या अष्टकाचा मूळ उद्देश आहे.
=====================================================
हे ही वाचा: सौदीमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली, हॉलिवूडसाठी मात्र पायघड्या
=====================================================
१०. अष्टक व्यतिरिक भविष्यात काही वेगळं करायची योजना आहे का?
दिग्पाल: अष्टक व्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर काही क्रांतिकारी चरित्रं मांडावीत असं डोक्यात आहे. पण सध्यातरी पहिला फोकस अष्टकच आहे.